बाळ्यामामाने हॅट्रिक रोखली! अदृश्य हातांची कमाल? पराभवाची कारणे? मित्रपक्ष, सांबरे आणि... कॉमन नव्हे वाचा काहीसे निकालामागे डोकावून; भिवंडी लोकसभेचा गाभा... प्रयत्न वेगळं मांडण्याचा...
-Kishor Gaikwad
एकूण २७ उमेदवार रिंगणात असलेल्या भिवंडी लोकसभेतून सुरेश म्हात्रे यांनी सुमारे ४०% मते एकट्याने मिळवून भाजपाचे कपिल पाटील यांचा पराभव केला आहे. यात अपक्ष उमेदवार निलेश सांबरे (Nilesh Sambare) यांची शिलाई मशीन तृतीय स्थानी राहिली.
भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या काळात शब्द मशालने प्रसारित केलेल्या बातम्या लोकसभा- 2024 च्या इतिहासात कायम नोंद राहतील. संपूर्ण निवडणूक काळात शब्द मशालने संविधानीक मार्गे लोकशाहीची मूल्ये जोपासली व याबाबत वाचकांकडून कौतुकाचा वर्षाव ही करण्यात आला. वृत्तांकनातील अनेक तर्क, अंदाज, संभाव्य बाबी विविध ठिकाणी खऱ्याही उतरल्याच्या प्रतिक्रिया प्राप्त झाल्या. मात्र आता लोकसभेच्या तोफा थंडावणार असल्या तरी शब्द मशाल वृत्तसेवा सातत्याने 'ऍक्टिव्ह' आहे.
पराभवाची कारणे? : नव्या तुतारीने कामलोदयाची हट्रिक रोखण्यामागे मविआ कार्यकर्ते यांची कामगिरी सोबतच काही अदृश्य हातांची कारागिरी देखील गुप्तपणे चर्चिली जात आहे. प्रचार, रॅली, मेळावे, बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद, बूथ नियोजन, आदी सर्वकाही ठीक असताना शिस्तबद्ध भाजपाला पराजयाच्या पारड्यात का बसावे लागले? संपूर्ण मतदारसंघ भाजपाकडून बांधला गेला असताना नेमकी उणिव कुठे राहिली? दगाबाजी की विश्वासू कार्यकर्त्यांचा आभाव? अशा विविध बाबींवर सर्वांवर भाजपा टीमने संशोधनाची गरज आहे.
विजय राष्ट्रवादीच्या बाळ्यामामांचा; मात्र स्टेटसला भाजपा आमदार..: या विजयात एक बाब प्रकर्षाने समोर आली असून लोकसभेत विजयी उमेदवार बाळ्यामामा म्हात्रें पेक्षा भाजपा आमदार किसन कथोरे (MLA Kisan Kathore) यांचेवरील व्हाट्सएप स्टेटस आणि फेसबुक पोस्ट अधिक प्रसारित होत आहेत. भाजपा उमेदवार यांचा दारुण पराभव झाला असतांना सुध्दा, सध्या मुरबाडच्या सोशियल मीडिया फ्लॅटफॉर्मवर अचानकपणे पाहायला मिळत असलेला भाजपा आमदार किसन कथोरेंचा बोलबाला नेमका कसली साक्ष देत आहे? हे संभ्रमित करणारे आहे.
करेक्ट कार्यक्रम : या निवडणूक कालखंडात मुरबाड-शिवळे येथील अंतिम पत्रकार परिषदेत कपिल पाटील यांनी नाव न घेता आमदार कथोरे यांचेवर आरोपांचा भडिमार करून 'करेक्ट कार्यक्रमाचा' इशारा दिला होता. दरम्यान, एका शेवटच्या धारदार प्रश्नाने भिवंडी लोकसभेला चर्चेच्या केंद्रस्थानी आणून ठेवले होते. तर भाजपा आमदार कथोरे यांनी भाजपा उमेदवार कपिल पाटील यांना "पराभूत" करण्यासाठी प्रयत्न केल्याचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील (Jagannath Patil) यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले असून कथोरेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी असे ही नमूद केले. यावरून भाजपात नेमकं अंतर्गत काय घडलं होत? मतदान पूर्व पार्श्वभूमी काय? आणि त्याचाच परिणाम निकालावर ही झाला का? असे प्रश्न उभे राहिले आहेत.
सांबरे : अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या शिलाई मशीनने भाजपाचा कुणबी बहुल मतदार रोखून ठेवल्याने दुपारपासून लोकसभेचा घसरता आलेख भाजपा समर्थकांच्या कपाळावरील घामाचे थेंब जमीनीवर पाडत असल्याची अनुभूती बोलली जात आहे. मविआ विरुद्ध भाजपाच्या द्वंद्व युद्धात कुणबी कॅन्डीडेटच्या नियोजनाने प्रभाव पाडून भाजपाचे स्पेस आकसले गेले का? अशा 'चिक्कार' शक्यता एकेमागे एक विश्लेषकांकडून वर्तविल्या जात आहेत.
एकंदरीत भिवंडी लोकसभेची निवडणूक अत्यंत तंत्रशुद्ध पध्दतीने, हजारोंचे अंदाज चुकविणारी ठरली. भूतो न भविष्य भिवंडी मतदारसंघ राष्ट्रवादीकडे (SP) आला आहे. मविआकडून काँग्रेसने भिवंडी लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीला (SP) विरोध दर्शविला होता. याबाबत त्यांनी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार देखील केला होता. किंबहुना काँग्रेसच्या एका गटाने प्रचार प्रक्रियेवर बहिष्काराची भूमिका देखील घेतली होती. बहुदा, यानंतर भिवंडी मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला मिळणार नाही? आणि हीच भीती काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये भासत आहे. त्यामुळे भिवंडी मतदारसंघातील नवपरिवर्तन पुढे विकासाच्या पथावरून अंतर्गत श्रेयवाद, नाराजी, फुटीरता, यांसारख्या संघर्षावर गेल्यास नवल वाटायला नको..?
(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)
-Kishor K Gaikwad
0 Comments