ब्रेकिंग : मुरबाडचा लॉकडाउन वाढलावाचा : कोणत्या गोष्टी राहतील चालू? नवीन ११ रुग्णांची सविस्तर माहिती ( किशोर गायकवाड )

 
मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचा आदेश (पान क्र. ४/१)

मुरबाड (दि. २) : मुरबाड नगर पंचायत हद्दीत राहणाऱ्या लोकांना आणि व्यापाऱ्यांना आता नवीन धक्का तथा दिलासा देणारी वार्ता समोर आली आहे. नुकताच ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी नवीन आदेश पारित केला आहे. यात आज पासून ते दि. ११ जुलै २०२० रोजी रात्री १२:०० वाजेपर्यंत अतिरिक्त प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. यापूर्वी मुरबाड नगर पंचायतने लागू केलेल्या कडकडीत बंदची उद्या ३ जुलैला समाप्ती होणार होती. मात्र आताच्या बंदमध्ये जीवनावश्यक वस्तूंना स्थान असल्याने काही अंशी नागरिकांना दिलासा ही मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील तरकारीची ब्लॅक मार्केटिंग थांबण्याची शक्यता आहे. मात्र काही कडक निर्बंध ही आता लादले आहेत. 

  सदर आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील मुरबाड नगर पंचायत व तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात सर्व प्रकारच्या बाजारपेठा, सर्व दुकाने व खाजगी आस्थापना [अत्यावश्यक किराणा सामान (Grocery), औषधांची दुकाने (Chemist Shops), जीवनावश्यक वस्तू (Essential commodities) अर्थात किराणा, औषधे, भाजीपाला, फळे, बेकरी व दुध तसेच टेक अवे/ पार्सल सर्व्हिस रेस्टॉरंट आणि वाईन शॉप इत्यादी वगळून सकाळी ०९:०० ते सायं. ०५:०० वा. पर्यंत] उपरोक्त नमुद कालावधीत पुर्णपणे बंद ठेवले जाईल.
मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचा आदेश (पान क्र. ४/२)

बंद मधील घटक आणि सूचना:-

  • औषधे व जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक आणि माल वाहतूक वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंदी लागू करणेत येत आहे. अधिकृत प्रवास परवाना / ई-पास धारक वाहनांची वाहतूक सुरु राहील.
  • अत्यावश्यक सेवेत कार्यरत शासकीय/निमशासकीय कर्मचारी वर्ग संबंधित कार्यालयात पोहचवणे यासाठी सर्व प्रकारची वाहतूक सूरु राहील.
  • खाजगी वाहनांचा उपयोग अत्यावश्यक वस्तू, आरोग्यसेवा व सुविधांसाठी (चालकाव्यतिरिक्त एक व्यक्ती) करता येईल. टॅक्सी सेवा (चालकाव्यतिरिक्त दोन व्यक्ती), रिक्षा सेवा (चालकाव्यतिरिक्त एक व्यक्ती) व दुचाकी प्रवास (फक्त एक व्यक्ती) या आदेशात नमुद बाबींकरीताच फक्त चालू ठेवण्यात येतील. तसेच अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी वाहतूक चालू ठेवता येईल.
  • प्रसारमाध्यमांची वाहने/बँका, एटीएम व त्याना सेवा पुरविणाऱ्या आस्थापना/टेलिफोन व इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या आस्थापना/ हॉस्पिटल्स व त्यांना सेवा पुरविणाऱ्या आस्थापना/अत्यावश्यक सेवेसाठी पुरक आयटी सेवा/पेट्रोलपंप, वीज (Electricity) व्यवस्था यासाठीची सर्व वाहतूक चालू राहील.
  • सर्व नागरिकांनी पूर्ण वेळ घरी राहणेचे आहे. केवळ तातडीच्या कारणांसाठी नागरीकांना बाहेर पडता येईल व त्यावेळी प्रत्येक दोन  व्यक्तीमधील अंतर किमान 6 फुट असणे आवश्यक आहे.
  • पाचपेक्षा अधिक लोकांना कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मज्जाव असेल.
  • सर्व प्रकारची दुकाने, वाणिज्य आस्थापना, खाजगी कार्यालये आणि कारखाने, वर्कशॉप, गोदामे इत्यादी बंद ठेवण्यात येत आहेत. तथापि, अखंडीत प्रक्रिया (Continuous Process) आवश्यक असलेले आणि औषधांची निर्मिती करणारे कारखाने, API इत्यादी चालू राहतील. जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे कारखाने जसे की, डाळ आणि राईस मिल, अन्न प्रक्रिया, दुग्ध उत्पादने, पशुखाद्य निर्मीती व त्यानुषांगिक कारखाने  व आस्थापना चालू ठेवण्यास परवानगी राहील.
  • शासकीय, निमशासकीय आस्थापनांनी शासन आदेश दिनांक २९ जून २०२० मधील सूचनांप्रमाणे आवश्यक मनुष्यबळ कार्यरत ठेवावे, साहित्याची वाहतूक सुरू ठेवावी व आपले कर्मचाऱ्यांची वाहतुक व्यवस्था सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी.  
 
मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचा आदेश (पान क्र. ४/३)
सुरू असलेले घटक:-

  a) दवाखाने, फार्मसी, चष्म्याची दुकाने, औषधे इत्यांदीची निर्मिती करणारे तसेच पुरवठादार व त्यासाठीची साठवणूकीची गोदामे व वाहतूकसेवा
  b) बँक, एटीएम, विमा सेवा, FinTech Services आणि तद्नुषंगिक सर्व कामकाज.
  c) वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे.
 d) IT आणि  ITeS, दुरसंचारसेवा, टपालसेवा, इंटरनेटसेवा आणि डेटा सर्व्हिसेस.
  e) जीवनावश्यक (Essential commodities) वस्तूंची वाहतूक आणि पुरवठा व्यवस्था (Supply Chain) व जीवनावश्यक वस्तुंच्या साठवणूकीची गोदामे.
  f) अन्नधान्य आणि तद्नुषांगिक माल यांची आयात व निर्यात सेवा.
  g) ई-कॉमर्सद्वारे घरपोच पुरविणेत येणारी अन्न, औषधे आणि वैद्यकीय साहित्य सेवा.
  h) अन्नधान्य, दुध, ब्रेड व बेकरी उत्पादने, फळे, भाज्या, अंडी, मांस, मासळी यांची विक्री तसेच वाहतूक व्यवस्था आणि त्यांची साठवणूकीची गोदामे.
  i) बेकरी आणि पाळीव जनावरांसाठी पशुवैद्यकीय सेवा-सुविधा.
  j) पार्सल / घरपोच सेवा देणारी रेस्टॉरंट्स.
  k) पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज तसेच त्यांची गोदामे आणि त्यासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्था.
  l) अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या सर्व संस्थांना/कार्यालयांना सुरक्षा पुरविणाऱ्या व सुविधा   देणा-या सेवा (खाजगी कंत्राटदारासह).
  m) कोविड-19 विषाणूचा प्रसार रोखणेसाठी तसेच अत्यावश्यक सेवांना मदत आणि सेवा पुरविणा-या खाजगी आस्थापना.
  n) वरील सर्व बाबींसाठी आवश्यक असणारी (Supply Chain) व्यवस्था.
  o) शेतीची सर्व कामे सुरळीत चालू राहतील त्यास कोणाताही अटकाव असणार नाही. शेतीशी संबंधीत खते, बि-बियाणे, औषधे यांची सर्व दुकाने व  वाहतूक सुरु राहतील.
  p) प्रस्तुतचे आदेश हे केवळ तत्वत: लोकांची हालचाल/प्रवास प्रतिबंधित करणेसाठी असून, वस्तू व सेवांवर प्रतिबंध लादणेसाठी नाहीत. ही बाब सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी जाणीवपूर्वक विचारात घ्यावयाची आहे.
  
    ​सदर आदेशाचा उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ६०, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ व भारतीय दंड संहिता, (४५ ऑफ १८६०) कलम १८८ नुसार दंडनीय तथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सदर आदेशात ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी नमुद केले आहे.
मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचा आदेश (पान क्र. ४/४)

  नवीन ११ रुग्णांचा तपशील

मुरबाड तालुक्यात काल ४ पोलीस कर्मचाऱ्यांसह नवीन ११ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर अस्कोत गावातील एका कोरोना पॉझिटिव्ह वृद्धाचा बळी गेल्याने मुरबाड तालुक्यातील कोरोना मृतांची संख्या ३ झाली आहे. 
   
४ पोलीस रुग्ण:-

   आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मुरबाड पोलिस स्टेशनमधील एका ३० वर्षीय महिला पोलिस कर्मचाऱ्यासह ४४ व ४९ वर्षीय पुरुष पोलीस कर्मचारी तसेच २५ वर्षीय होमगार्ड कर्मचारी समाविष्ट आहेत. यापूर्वी एक पोलीस अधिकाऱ्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यावर उपचार सुरू असतांना आता नवीन ४ पोलीस कर्मचाऱ्यांची भर पडली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या आरोपींच्या संपर्कामुळे हे पुरुष पोलीस पॉझिटिव्ह आल्याची संभावना वर्तवली जाते. मात्र या सर्वांना नाशिक, बदलापूर, ठाणे अशा विविध ठिकाणी ऍडमिट केल्याचे बोलले जात आहे.

मुरबाड नगर पंचायत कर्मचारी :-

  मुरबाड नगर पंचायतच्या सियाज कारवर ड्रायव्हर म्हणून कार्यरत असलेल्या माळीपाडा येथील ३० वर्षीय कर्मचाऱ्याचे ही रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. सदर कर्मचाऱ्यांला त्रास जाणवू लागल्याने १२ दिवसांपासून तो घरात थांबून होता. सोमवारी त्याला जास्त त्रास होऊ लागल्याने त्याचे स्वॅब घेण्यात आले होते. काल त्याला पुढील उपचारासाठी ठाणे येथे रवाना करणार असल्याचे नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे मुरबाड नगर पंचायतच्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन झाली असून खबरदारी म्हणून सद्या नगर पंचायतच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला वेगवेगळ्या वारा नुसार कामावर रुजू राहायला सांगितल्याचे समजते.

नारिवली आणि साकुर्लीचे रुग्ण:-
  
  दि. २७ जून रोजी मुरबाड तालुक्यातील नारिवली गावातील एका ५६ वर्षीय व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. आज त्याच रुग्णाच्या कुटुंबातील ४५ वर्षीय महिलेचे रिपोर्ट ही पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच साकुर्ली येथील ३८ वर्षीय पुरुषाचे रिपोर्ट ही आज पॉझिटिव्ह म्हणून समोर आले आहेत. सदर व्यक्ती हा याच नारिवली गावातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या गाडीचा चालक असल्याचे बोलले जाते.

माल्हेड येथील ४ रुग्ण:-
  
   दि. २६ जून रोजी माल्हेड गावातील एका व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. आज त्या रुग्णाची ४५ वर्षीय पत्नी ७५ वर्षीय वडील, ४५ वर्षीय भाऊ व १० वर्षीय पुतण्या यांचे ही पॉझिटिव्ह रिपोर्ट समोर आले समजत आहे. 

   
  मुरबाड तहसिल कार्यालयाच्या सब जेल मधील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या ४ कैद्यांचे रिपोर्ट ही निगेटिव्ह आल्याचे समजत असून त्यांना बदलापूरच्या कोरोन्टाईन सेंटरमध्ये हलविण्यात आल्याचे बोलले जाते.

   या सर्व परिस्थितीत मुरबाड तालुक्यातील लोकांना दिलासा देण्यासाठी मुरबाड येथील शासकीय कोविड सेंटर तातडीने सुरू करण्याची गरज आहे. परंतु त्याकडे अधिकारी व लोकप्रतिनिधी पुरेसे लक्ष देत नसल्याने जनता कात्रीत सापडली आहे. मुरबाडच्या रुग्णांना उपचारासाठी तालुक्या बाहेर बेड उपलब्ध होत नसल्याने शिवाय अत्यंत गरजेचे असलेले मुरबाड येथील शासकीय कोविड सेंटर सुरू होत नसल्याने मुरबाड तालुक्यातील जनता भीतीच्या छायेत दिवस ढकलत असल्याचे भासत आहे.
--------------------------------------------------------------------
[टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]

2 Comments

  1. अचूक आणि परिपूर्ण माहिती करती एकमेव शब्दमशाल..!

    ReplyDelete