
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

भिवंडी लोकसभा : मविआचं ताळमेळ जुळेना; मात्र कपा टीमचे कार्यकर्ते लागले तयारीला..!
[ KISHOR GAIKWAD ]
ठाणे/मुरबाड : (किशोर गायकवाड) लोकसभेची राजकीय धावपळ आता वेग धरू लागली असतांना भाजप पक्षाचे कपिल पाटील (Kapil Patil) यांचे कार्येकर्ते स्वयंप्रेरणेने कामाला लागलेले दिसून येत आहेत. मात्र मविआमध्ये अद्यापही समाधानकारक तडजोड झाली नसल्याने मित्र पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.
मविआकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे (Suresh Mhatre) यांना उमेदवारी निश्चित केल्याच्या वार्ता कानावर येत असताना नुकताच काँग्रेस पक्षाचे मुरबाड तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार व अन्य पदाधिकारी यांनी भिवंडी लोकसभेची जागा काँग्रेसकडेच ठेवण्याची आग्रही मागणी केली आहे.
'सन २०१९ च्या लोकसभा निवडणूकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला ३ लाख ६७ हजार मते मिळाली होती. त्यामुळे भिवंडी लोकसभा ही पारंपारिक काँग्रेस पक्ष लढत असून या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाने आपला दावा भिवंडी लोकसभा मतदारसंघावर केला आहे. तरी काँग्रेस पक्षाचे पक्षश्रेष्ठींनी कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता प्रत्यक्षात ग्राउंड वरती काँग्रेस पक्षाचे संघटन आहे, हे संघटन मोठ्या प्रमाणात असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते गेले असल्यामुळे शरदचंद्र पवार या गटांमध्ये थोडक्यात कार्यकर्ते शिल्लक राहिले आहेत आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाकरिता काँग्रेस पक्षाच्या वतीने जो कोणी उमेदवार असेल त्याचं प्रामाणिक काम करू, परंतु सदरची जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला सोडली तर वरिष्ठांशी चर्चा करून पुढील निर्णय जाहीर करू' असे प्रतिपादन काँग्रेस तालुकाध्यक्ष पवार यांनी केल्याने अगदी लोकसभेच्या तोंडावर अशी आग्रही मागणी करून मविआला थेट घरचा आहेर दिला आहे. या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक देखील जारी करण्यात आला असून त्यावर किसान काँग्रेसचे प्रदेश सचिव तुकाराम ठाकरे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष संध्या कदम, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष धनाजी बांगर, तालुका सचिव भगवान तारमळे आदींनी सह्या करून संमती दर्शवली आहे.
तर भाजप पक्षाकडून पुन्हा तिकीटाची घोषणा झाल्याने ना. कपिल पाटील हे भाजपमधून तिसऱ्यांदा लोकसभेसाठी नशीब आजमवणार आहेत. याकरिता कपिल पाटील गटाचे कार्यकर्ते कंबर कसून स्वयंस्फूर्तीने कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत. उलटपक्षी विरोधी पक्ष आघाडी अजूनही एकत्र लढण्याच्या मानसिकतेत दिसत नसल्याने त्यांच्यातील ही धसमुस भाजप पक्षाला पोषक ठरेल, असे जाणकारांचे मत आहे. मात्र असे असतांना ही आमदार किसन कथोरे (MLA Kisan Kathore) यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा असून याकडे देखील सर्वांचे लक्ष लागेल आहे.
- Kishor K. Gaikwad
(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)
0 Comments