रामरट्टा : बावनकुळेंच्या पत्रात भाजपाचे नगरसेवक निष्कासित: निलंबना नंतर दुधाळेंची भूमिका मुरबाडच्या चौकात; 'रामाच्या हकालपट्टीचा शाप लागेल...'
ठाणे/मुरबाड (दि. ८) : (किशोर गायकवाड) मुरबाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदावरून नुकताच पाय उतार केलेले भाजपाचे विद्यमान नगरसेवक राम दुधाळे यांना आज पक्षातून निष्कासित केल्याचे पत्र सोशियल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाजपा पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आ. चंद्रकांत बावनकुळे (Chandrakant Bavankule) यांच्या सहीचे पत्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभेच्या मुरबाड मतदारसंघात येऊन धडकले आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रामध्ये "आपण भारतीय जनता पार्टीचे मुरबाड नगरपरिषदेचे 'नगरसेवक' तसेच जबाबदार कार्यकर्ते असताना पक्षशिस्त व अनुशासन भंग करणारे कृत्य केले आहे. आपली ही कृती पार्टीचा अनुशासन भंग करणारी असून आपल्याला पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे." असा आशय नमूद आहे.
मुरबाड नगरपंचायतीचे डेरिंगबाज नगरसेवक म्हणून राम दुधाळे यांना ओळखले जाते. शिवसेनेच्या मुरबाड शहराध्यक्ष पदावरून जनतेच्या पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावर भांडता-भांडता अनपेक्षितपणे भाजपमधून नगर अध्यक्षपदी विराजमान झालेले नगरसेवक दुधाळे यांनी सदर पक्षीय कार्यवाही नंतर शहरवासीयांना मुरबाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सायंकाळी ५ वाजता जमण्याचे आवाहन केले होते. परंतु, अपेक्षित संख्येने कार्यकर्ते मंडळींची उपस्थिती दिसून न आल्याने राम दुधाळे यांची भूमिकेचा निवडणूकीत मतदानावर फारसा फरक पडणार नाही, अशी चर्चा रंगली आहे.
भिवंडी लोकसभेतील भाजपा पक्षाचे उमेदवार कपिल पाटील (Kapil Patil) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे [Suresh (Balyamama) Mhatre) व निलेश सांबरे (Nilesh Sambare) यांच्यात खडाजंगी रंगत चालली असून उमेदवार विजयासाठी पक्षातील नवीन जुन्या कार्यकर्त्यांना सक्रिय करत आहेत. अशातच बाळ्यामामा यांचे निकटवर्तीय मुरबाड नगरपंचायतीचे भाजपा पक्षाचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक रामचंद्र दुधाळे हे बाळ्यामामा यांच्या निवडणूक प्रचार प्रक्रियेमध्ये लक्षणीय भूमिकेत आढळून आले आहेत. आपल्या पक्षीय उमेदवारा विरोधात कारवाया करण्याचा ठपका त्यांच्यावर असून याबाबत दुधाळे यांनी आपली प्रतिक्रिया सोशियल मीडियावर प्रसारित केली आहे.
'गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून बाळ्यामामा यांचेशी आमचे घरचे संबंध असून भाजप विरोधी काम करणारा खासदार कपिल पाटील आहे. आपला पूर्ण पाठिंबा विरोधकांना देऊन आमच्या हक्काची कृषी उत्पन्न बाजार समिती हातातून घालवली. मुरबाड नगरपंचायतीच्या निवडणूकीत नाकारलेल्या उमेदवारांसाठी चार-चार पाच-पाच दिवस वॉर्डात थांबूनही त्यांना निवडून का आणू शकले नाही? भिवंडी लोकसभेत जनतेचा राग मोदींवर नसून कपिल पाटलांवर आहे. पक्ष विरोधी काम करणाऱ्या काही हेकेखोर कार्यकर्त्यांना पाच वर्षे आपली मनमानी करणे सोपे जावे, म्हणून नवीन उमेदवाराचा चेहरा मिळाला नाही. राम नावाची हकालपट्टी करून रामच्या नावाने देशात मते मागता, याचा शाप इथल्या लोकसभेच्या उमेदवाराला लागेल. तुमच्या मनमानीने नेमलेल्या जिल्हा प्रमुखांना आम्ही मानत नाही. येत्या २० तारखेला कपिल पाटलांची लोकसभेतून हकालपट्टी करू' असे व्यक्तव्य सदर प्रतिक्रियेमध्ये दुधाळे यांनी केले आहे.
मुरबाड नगरपंचायतीच्या पहिल्या पंचवार्षिकला आपल्याच वॉर्डातून पराजित झालेल्या राम दुधाळे यांना दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये भाजपाने उमेदवारी सह पहिल्या नगराध्यक्ष पदाचा मान देखील दिला होता. मात्र या प्रकारानंतर नगरसेवक दुधाळे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे मार्गक्रमण करतील असा, अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे नगरपंचायतीमध्ये नव्याने काही उलथापालथ होते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments