
Black Cap In Loksabha : निर्भय महाराष्ट्र पार्टीचा प्रचार मुरबाडमध्ये दाखल; पहा कोण आहे हा ध्येयवेडा उमेदवार तरुण?
ठाणे/मुरबाड (दि. १४) : (किशोर गायकवाड) भिवंडी लोकसभेतील रंगतदार रणधुमाळी सद्या तिरंगी चर्चेत कैद असली तरी या संग्रामात एक धेय्यवेडा तरुण वेगळ्या उमेदीने आणि ऊर्जेने जनतेसमोर स्वतः उमेदवार म्हणून सादर करत आहे.
![]() |
Prof. Rahul Kathole |
गळ्यात एक चार्जिंगचा स्पीकर आणि हातात माइक, डोक्यावर काळ्या रंगाची टोपी आणि समवेत हाती काळ्या रंगाच्या पताका असलेले विचारांचे मोजके क्रांतिकारक सहकारी; असा मर्यादित जत्था घेऊन एक तरुण मुरबाड शहरात काल नजरेस पडला असेल. प्राध्यापक राहुल काठोळे (Rahul Kathole) असे या तरुणाचे नाव असून मागील वर्षी स्थापन झालेल्या निर्भय महाराष्ट्र पार्टीतील युवा प्रा. राहुल काठोळे यांनी भिवंडी मतदारसंघातून (Bhiwandi Loksabha) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बॅटरी या निशाणीवर भिवंडी मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेल्या या उमेदवारा बाबत अनेकांना कल्पना नसावी.
सिव्हिल इंजिनिअर असलेल्या या तरुणाने काही काळ प्राध्यापक म्हणून देखील नोकरी केली आहे. बरबटलेल्या व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष उभा करण्यासाठी आप सारख्या पक्षात काम केले. परंतु आपली अस्वस्थता दूर होत नसल्याने त्यांनी नव्याने स्थापन झालेल्या संस्थापक-अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या निर्भय महाराष्ट्र पार्टी या पक्षात प्रवेश करून समाज कार्याला नव्याने सुरुवात केली. समाज हिताची कार्ये करतांना विविध गंभीर आरोपातील गुन्ह्यांना त्यांना सामोरे जावे लागले. तर विविध सामाजिक, आर्थिक, राजकीय, प्रशासकीय अडथळ्यांवर मात करीत या उमेदवारी पर्यंत पोहचल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. काठोळे व त्यांच्या सहकाऱ्यांना विश्वास आहे की, भिवंडी मतदारसंघातील मायाळू जनता विकाऊ नसून निवडणूकींना पैसा लागत नाही. आमची लढाई भ्रष्टाचार व शोषणाच्या विरोधातील आहे. गरीब व गरजू जनतेसाठी भविष्यात भक्कम आधार उभा करता यावा, या उदात्त हेतूने आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून तरुणांचं संघटन उभे करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुमारे दोन स्क्वेअर फूटचे प्रचार बॅनर व जाहीरनामा पत्रकां समवेत फेसबुक लाइव्ह, व्हाट्सएप सारख्या सोशियल मीडिया फ्लॅटफॉर्मला या तरुणांनी आपल्या विचार प्रसारणाचा हत्यार बनवून लोकसभेच्या मैदानात उडी घेतली आहे. या लढ्यात प्रा. काठोळे यांचे सोबत राज्य संघटक संदीप नाईक, साद शेख, सागर अहिरे असे कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने जीव ओतून काम करीत आहेत. असे असतांना भिवंडी मतदारसंघातील सुजाण जनता या होतकरू, ध्येयवेड्या सुशिक्षित उमेदवाराला कितपत पसंती देते? हे पाहणे कौतुकास्पद ठरेल.
![]() |
Prof. Rahul Kathole |
"सत्ताधारी व मातब्बर राजकारण्यांच्या वर्चस्वाचा बिमोड करण्यासाठी, त्यांच्या धनशक्तीला जनशक्तीने पराभूत करण्यासाठी लोकशाही मार्गाने आम्ही संघर्ष सुरू केला आहे. त्याची ही पहिली पायरी. आज आम्ही मोजके चालत आहोत, परंतु भविष्यात मोजता येणार नाही, असा कारवा आमच्या सोबत असेल."
-प्रा. राहुल काठोळे, उमेदवार भिवंडी लोकसभा
0 Comments