वैमनस्य? अरे कसा असेल वाटा... माझ्या विरोधात तुतारी आणि क्ष ची ओपन टेबले लावणाऱ्याचा... अखेर कथोरे नावाच्या प्रश्नावर के. पाटीलांचा संताप अनावर.. म्हणाले, 'त्यांचा' करेक्ट कार्यक्रम होणार आहे..! मुरबाडच्या राजकारणात वादळाची चाहूल? (पहा अखंड व्हिडिओ)
ठाणे/मुरबाड (दि. २४) : (किशोर गायकवाड) नुकतीच मतदान प्रक्रिया संपन्न झालेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात राजकीय लढतीचा सामना शमला असला तरी यातून मात्र अनपेक्षितपणे उदयास आलेल्या एका नव्या संग्रामाचे बिगुल वाजल्याचे संकेत दिसून येत आहेत.
भिवंडी लोकसभा निवडणूकी दरम्यान मुरबाड मतदारसंघातील राजकीय कलहाचं कटू वास्तव अनाहूतपणे समोर आले आहे. बदलापूर रहिवासी अर्थात मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) व भिवंडीचे खासदार कपिल पाटील (Kapil Patil) यांच्यात अदृश्य कारणांवरून शीतयुद्ध कायम होते. याचा परिणाम पक्षाच्या लोकसभा उमेदवारीवर होऊ नये, याकरिता दस्तुरखुद्द महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे समवेत राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी प्रत्यक्ष हेलिकॉप्टरने मुरबाड मतदारसंघात आगमन करून केके-केपी वॉर शमविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु ऐन मतदान प्रक्रिये दिनी दोन्ही महोदयांचे हे समस्त प्रयत्न अगदी स्वस्तात पाण्यात वाहून गेल्याचे चित्र मुरबाडवासीयांना अनुभवायला मिळाले. त्यामुळे यातून शिल्लक राहिलेल्या अनेक प्रश्नांपैकी एका मूळ प्रश्नाचे उत्तर नुकतेच पत्रकारांच्या हाती लागले आहे.
काल (दि. २४ रोजी) भाजपा उमेदवार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी शहापूर मार्गे मुरबाड तालुक्यातील निवडणूकी समयी निष्ठेने काम केलेल्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा आभार भेटी दौरा नियोजित केला होता. यावेळी मुरबाडच्या पत्रकारांना देखील पाचारण करण्यात आले होते. शिवळे येथील जनसेवा प्रतिष्ठानच्या भव्य दुमजली कार्यालयात हा युतीचा संवाद आयोजित करण्यात आला होता. या आढावा भेटीला आलेल्या वाहनांनी पार्किंग तर कार्यकर्त्यांच्या फौजफाट्याने मिटिंग हॉल तुडुंब भरला होता. या आभार संवादा नंतर उमेदवार कपिल पाटील यांनी पत्रकारांना अल्प वेळ प्रश्नावलीसाठी दिल्याने संधीचे सोने करीत पत्रकारांनी मूळ मुद्द्याला हात घातला. परंतु आमदार किसन कथोरे हे नाव मुखातून न घेण्याचे चंग बांधलेल्या पाटील यांचा अखेरच्या प्रश्नावर संताप अनावर झाल्याचे भासले.
![]() |
(विजय घोषित? निकलपूर्व कपिल पाटील यांचा सत्कार करतांना विश्वासू कार्यकर्ते हरेश खापरे) |
दरम्यान पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तरे देतांना पाटील यांनी विजयाची पूर्वघोषणा केली. तर या प्रश्नोत्तरांच्या सुरुवातीलाच कपिल पाटील यांनी बोलताना, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रात दोनवेळा करेक्ट कार्यक्रम करून महाराष्ट्रातचं सरकार आणलं. तसं ज्या महाराष्ट्राच्या नेत्याने मुरबाडला येऊन गॅरंटी घेतली आणि त्यांची गॅरंटी फेल घालविणाऱ्या माणसाला देवेंद्रजी पण माफ करणार नाही. त्यामुळे निश्चितपणे त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणारच आहे, असा शब्दां मागून पाटीलांनी अप्रत्यक्ष धोक्याचा इशारा कथोरे यांना दिला आहे. त्यामुळे या करेक्ट कार्यक्रमाचा नेमका स्वरूप काय असेल? याबाबतची धास्ती संबंधित अपराध्याला निश्चितच भरली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
तसेच प्रत्येक उमेदवार विजयाचा दावा करीत असल्याच्या प्रश्नावर, कोण काय बोलतो याच्याशी मला घेणेदेणे नसून तीनही उमेदवार मुरबाडमध्ये पुढे राहू शकत नाही. पाचशे भाजपा कार्यकर्त्यांनी आढावा दिल्यानुसार मुरबाड तालुक्यात १ लाख ९ हजार मतदान झाले असून पैकी ६० हजार महायुतीला होणार. ४७ नगरसेवकांपैकी ४६ एका बाजूला असलेल्या बदलापूरमध्ये धर्माचा आणि जातीचा फॅक्टर चालत नाही. जाती आणि धर्मावर मतदान मागणाऱ्याला जनता कधीच साथ देत नाही. त्यांनी धर्मावर मते मागितली आम्ही कर्मावर, त्यांनी कास्टवर मते मागितली आम्ही राष्ट्रवर; आणि म्हणून आम्हाला राष्ट्रावर लोकांनी मते दिली. अशांनी आगामी निवडणुकी जातीच्या आधावर लढावे, पक्षाची गरज काय? आम्ही महायुतीचे सामान्य कार्यकर्ते असून महायुतीचे आदेश पाळणारी लोक आहोत. त्यामुळे आम्ही पक्ष आणि महायुती हा धर्म पाळून काम करणारी मंडळी आहोत. ज्याला कोणाला आपण पक्षापेक्षा मोठं असल्या सारख वाटत असेल त्यांनी जातीचं समीकरण घेऊन अपक्ष लढावं, मग समजेल कोण कुठे उभा आहे ते, असे उद्गार काढले. मात्र, भाजपामधील गटबाजी संपुष्टात आणण्याच्या पत्रकाराच्या प्रश्नावर पाटील यांनी काहीसे संयम गमावून उत्तर दिले. यासाठी मी कशाला प्रयत्न करणार आणि वरिष्ठांच पण न ऐकल्याने ते तरी का प्रयत्न करतील? कुंपणाने शेत खाल्ल्याच्या बातम्या तुमच्याकडून मिळाल्याने वाचल्या असून मी व्यक्तव्य केलेलं नाही.
मतांच्या प्रश्नावर बोलताना पाटील यांनी सर्व विधानसभेच्या कार्यकर्त्यांशी बोलल्या नंतर सहा लाखमते ही महायुतीला मिळतील असा अंदाज वर्तविला. मात्र भिवंडी शहरात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भाजपापेक्षा अधिक मते मिळाल्यामुळे आमची फाइट ही महाविकास आघाडीशीच असल्याचे निःसंकोच तथा स्पष्टपणे पाटील यांनी मान्य केले. ज्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे, त्याची प्रचिती सांगून येणार नसल्याचे ते यावेळी उदाहरणा सहित बोलले.
कपिल पाटील यांच्या लीडमध्ये माननीय आमदार किसन कथोरे यांचा वाटा असेल का? या अंतिमतः विचारण्यात आलेल्या कथोरे नावाच्या प्रश्नावर कपिल यांचा अखेर संयम आणि संताप काहीसा अनावर झालेला पत्रकारांना अनुभवायला मिळाला. त्यावर उत्तरीत होतांना पाटील स्पष्ट शब्दात म्हणाले की, 'अरे कसा असेल वाटा? ओपन काम केलेल्या माणसाचा माझ्या लिडमध्ये काय संबंध? ज्याच्या माणसांनी ओपन तुतारी आणि इतर टेबले लावली, मी अजूनही त्यांचं नाव घेत नाही, नाव घेऊन कोणाला मोठं करायचं नाही. अशी उत्तरसूचक काउंटर प्रश्ने आपल्या तीव्र प्रतिक्रियेत दिली.
याप्रसंगी खासदार कपिल पाटील यांचे सोबत मुरबाडचे माजी आमदार गोटीरामभाऊ पवार, शिवसेना (S) चे उपनेते प्रकाश पाटील, माजी जि. प. सदस्य सुभाष घरत, उल्हास बांगर, किसन गिरा, सुहास मोरे या प्रमुख मंडळीं सह मोठ्यासंख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या सर्वात पुन्हा एक प्रश्न निरुत्तर शिल्लक राहिला असून कथोरे यांनी अचानक आपली भूमिका बदलून वैमनस्यला आमंत्रण देण्याचे मूळ कारण काय? एव्हाना, या उत्तराच्या पुष्टीची हमी घेण्यासाठी अनेक तर्क-अभिप्राय जन्म घेत असून त्यापैकी मुरबाड मतदारसंघातील लोकसभेची दिसेनाशी वित्तीय व्यवहारं आमदार कथोरे यांचे हाती न येता थेट त्यांना ज्युनियर असणाऱ्या पाटीलांच्या विश्वासु कार्यकर्ते यांचेकडे सोपविण्यात आल्याची संशयित चर्चा ऐकिवात आहे.
मात्र असे असले तरी विधानसभा निवडणूक तोंडावर असतांना आपल्याच सत्ताधारी पक्षाच्या खासदार यांचेशी शत्रुत्व वाढवून समवेत पक्षश्रेष्ठींचा रोष ओढून घेण्यात नेमका फायदा काय? हा संशोधनाचा मुद्दा बनला आहे.
यावर ऍक्युरेट उत्तर निश्चितपणे आमदार किसन कथोरेच देतील. परंतु, राजकीय वातावरणीय वाढता तापमान पाहता आमदार कथोरे सध्या प्रतिक्रियें पासून नॉटरीचेबल असल्याचे अघोषित असून शिवाय प्रसार माध्यमांपासून तूर्तास दूर राहणे पसंत करीत असल्याचे भासत आहे.
सबब, हजारोंच्या भर सभेत वरिष्ठां समक्ष मुरबाड मतदारसंघातून लाखभर मतांच्या लीडची हमी देऊन उलटपक्षी कृत्य केल्याने कथोरेंनी जणू पाटीलांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची वार्ता मुरबाडच्या महायुतीत सुरू झाली आहे. त्यामुळे मुरबाडच्या राजकारणात नव्या अनपेक्षित वादळाची चाहूल नागरिकांना जाणवू लागली आहे. या अघोषित द्वंद्व युद्धाचा पूर्णविराम सापडे पर्यंत जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांना आयतेच खुराक उपलब्ध होणार, एवढं मात्र नक्की.
0 Comments