काँग्रेसची पिछेमुड? बाळ्यामामाची रॅली बाजारात आणि काँग्रेसच्या नाराज गटाची बैठक फार्मात; दोन दिवसांचा अल्टीमेटम अन्यथा वेगळ्या उमेदवारा सोबत...
Kishor K Gaikwad
ठाणे/मुरबाड (दि. १०) : (किशोर गायकवाड) मुरबाड शहरात आज इंडिया आघाडीच्या बाळ्यामामांची प्रचार रॅली सुरू असतानाच दुसरीकडे मडकेपाडा येथील एका फार्मवर मुरबाड काँग्रेसच्या नाराज गटाची बैठक घेण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे माजी मुरबाड तालुका अध्यक्ष कृष्णकांत तुपे, शहराध्यक्ष योगेश गुजर, उमेश चौधरी, रोहित झुंजारराव, प्रमोद मडके, कांतीलाल गोडांबे, तानाजी घागस, रुपेश पावडे, जुबेर पठाण, राकेश भुंडेरे, संजय टोहके, तानाजी शेलवले, सुधाकर शेळके सह अनेक नाराज कार्यकर्ते उपस्थित होते.
होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीत भिवंडी लोकसभेत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना प्रचार कार्यात, निवडणूक प्रक्रियेत विचारात घेतले जात नसल्याने काँग्रेसच्या नाराज गटाची अंतर्गत बैठक घेण्यात आल्याचे बैठकी दरम्यान सांगितले.
'महाविकास आघाडीने दोन दिवसांत आमच्या सोबत चर्चा न केल्यास वेगळा मार्ग निवडू व त्यास जबाबदार उमेदवार व महाविकास आघाडी असेल. खऱ्या अर्थाने ही जागा काँग्रेसची होती पण काँग्रेसवर अन्याय होऊन जागा राष्ट्रवादीकडे गेली. सद्या प्रचाराचे दिवस कमी राहिले असून इथे बसलेला खरा काँग्रेसचा कार्यकर्ता वंचित राहतोय. इथे उपस्थित मंडळी पक्षातील प्रमुख राजकीय पदाधिकारी असून त्यांच्यावर येत्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूकीत अन्याय होऊ शकतो. त्यामुळे कार्यकर्त्याला काय उत्तर द्यायचे? यामुळे ही बैठक वेगळा विचार करण्यासाठी घेण्यात आली आहे. तसा वेगळा विचार आम्ही मूळ काँग्रेस कार्यकर्त्यांना घेण्याची वेळ आणू नये. सदरच्या निवडणूक प्रक्रियेत आमच्या कार्यकर्त्याला सामावून घेतले पाहिजे. आम्ही जिल्हा अध्यक्षांचा मान ठेऊन त्यांच्या आदेशाची वाट पाहतोय.' असे व्यक्तव्य कृष्णकांत तुपे यांनी बैठकी दरम्यान पत्रकारांशी बोलतांना केले. यावेळी बैठकीला उपस्थित असलेले खानदानी काँग्रेस कार्यकर्ता असल्याचा उल्लेख आपल्या वृत्तांकनात करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी पत्रकारांना केला.
तर याच दरम्यान बाळ्यामामा यांची रॅली देखील मुरबाड शहरात सुरू होती. परंतु अपेक्षित गर्दी रॅलीला दिसून आली नसल्याने पुन्हा एकदा अंदाज बदलत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. भिवंडी लोकसभेतील मविआमधील अंतर्गत धुसफूस दिवसेंदिवस वाढत चालली असून याचा थेट परिणाम निकालावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदाना पूर्वी आणखीन काही नवीन पैलू समोर येते का? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
0 Comments