
MOSQUITO ATTACKED : मुरबाड शहरात मच्छरांचा हैदोस; नागरिक बेजार, रोगराईची संभाव्य परिस्थिती, अचानक वाढत्या पैदासीला बेजबाबदार कोण?
मुरबाड : गेल्या काही दिवसांपासून मुरबाड शहरात मच्छरांनी (mosquito) मोठा हैदोस माजवला असून शहरवासीय अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.
अचानकपणे एवढ्या मोठ्याप्रमाणात मच्छरांच्या झालेल्या पैदासीचे मूळ कारण अजून स्पष्ट नसले तरी अस्वच्छता, शहरातील वाढती कचरा समस्या याला प्रथमदर्शनी जबाबदार असल्याचे बोलले जाते. तसेच अनेक प्रभागात कचरा घेऊन जाणारी घंटाघडीची अनियमितता, अर्धवट नालेसफाई तथा स्वच्छतेचा अभाव, अपुरी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या, डम्पिंग ग्राऊंडची समस्या, अशा विविध बाबी देखील यास कारणीभूत असल्याने म्हंटले जात आहे.
नगरपंचायत स्थापनेनंतर मुरबाड शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून खत निर्मितीच्या प्रयोगाचा मोठा गाजावाजा करून अगदी उद्घाटन सोहळा आयोजित केला होता. परंतु सद्यस्थितीला त्या व्यवस्थापनाचे काय होत आहे? याबाबत नागरिकांना खबर नाही.
तसेच देखभाल व साफसफाई अभावी शहरातील शासकीय शौचालयांची दुर्दशा पाहायला मिळत आहे. यासर्वातून मच्छरांच्या पैदासीला पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होत असते. त्यामुळे एकेकाळी स्वच्छतेचा मानांकन मिळविलेली मुरबाड नगरपंचायत हल्ली मानांकन टिकवून ठेवण्यास कमी पडतेय का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
![]() |
Mosquito Bite |
वाढत्या मच्छरांमुळे रात्रीची झोप मोड होते. यात कामगार वर्ग, विद्यार्थी यांचे मोठे नुकसान होते. परिणामी रोगराईला खुले आमंत्रण दिले जात असून साथीच्या रोगाची मोठी लाट मुरबाड शहरात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या वाढत्या समस्येकडे आरोग्य यंत्रणेने गंभीरपणे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी जनतेतून होत आहे. तर दुसरीकडे मच्छर नाशक अगरबत्ती, मोर्टीन मशीन, मच्छर बॅट यांचा खप मुरबाड बाजापेठेत वाढला आहे.
-Kishor K Gaikwad
0 Comments