#COUNTDOWN : भिवंडी लोकसभा 'पर्मनंट' भाजपचा बालेकिल्ला बनविण्यासाठी यज्ञ सुरू?
ठाणे/मुरबाड : (किशोर गायकवाड) लोकसभेच्या रणधुमाळीत भिवंडी मतदारसंघात राजकीय पक्ष, युत्या, आघाड्या दिमाखदार मेळावे आणि सभा आयोजित करून आपल्या मतदाराला गवसणी घालत असून व्यासपीठावरून प्रतिस्पर्धींवर टीकास्त्र डागत आहेत.
भिवंडी लोकसभेमध्ये भाजपा पक्षातून कपिल पाटील (Kapil Patil) तिसऱ्या उमेदवारी लढवित असून शुक्रवारी त्यांनी खर्चिक शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी कोंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे (Suresh Mhatre) तसेच जिजाऊ विकास पार्टीतून निलेश सांबरे (Nilesh Sambare) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. तीनही उमेदवार सद्यस्थितीला कागदोपत्री निवडणूकीच्या पटांगणात नोंद आहेत.
कपिल पाटील हे दोन टर्म राजकारणात शिजून-भिजून कसलेले खिलाडी उमेदवार म्हणून उत्साहाने निवडणूकीच्या मैदानात दंड थोपटून उभे भासत आहेत. तर उर्वरित दोन ही उमेदवार कसल्यातरी संभ्रमात अथवा निरोपाच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून दिसून येत आहे.
मविआ पुरस्कृत एनसिपी (SP) आणि व्हिबीए 'स्पोर्टिव्ह' जिजाऊ विकास पार्टी हे दोन्ही उमेदवार आपसात 'रिस्पॉन्स' देतांना आढळत नाही. त्यामुळे तळ्यात मळ्यात असलेले हे उमेदवार 'कन्फर्म' होई पर्यंत खर्च टाळत आहेत का? असा सवाल दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्ते मंडळींच्या चेहऱ्यावर उमटलेला भासत आहे.
निलेश सांबरे यांनी अपक्ष समवेत एक उमेदवारी 'फॉर्म' काँग्रेसमधून भरला असल्याची माहिती नुकताच कपिल पाटील यांनी दिली आहे. तदनुसार ऐनवेळी काँग्रेसने तसा 'एबी फॉर्म' सांबरे यांना सुपूर्द केल्यास आघाडी धर्मानुसार बाळ्यामामांना उमेदवारीमागे घ्यावी लागेल. अन्यथा आघाडीतील बिघाडी उघड होऊन स्वतंत्र तिरंगी लढत रंगेल, मात्र ती एकतर्फी होऊन कपिल पाटीलांचा रथ 'वनसाइड' विजयाकडे कूच करू शकेल. पुन्हा, तडजोड पुर्तते अंती बाळ्यामामांनी प्रसार माध्यमांपुढे परवलीची सबब मांडून उमेदवारीत माघार घेतली, तरी सांबरे यांचे बाबतीत करण्यात आलेली विविध भाकिते आरोपांच्या कचेरीत आहेत. परिणामी भाजपा पक्ष या बाजूने देखील अजिबात तोट्यात नाही, असे म्हणावे लागेल?
एकंदरीत हे संभवनीय सत्य ठरल्यास, या सर्वात भाजपाला भिवंडी मतदारसंघात चांगलाच फायदा होऊन या लोकसभे नंतर भिवंडी मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून सर्वश्रुत होईल, अर्थातच ही सर्व खटाटोप किंबहुना त्यासाठीच असावी? असा अंदाज वर्तविला जात आहे.
त्यामुळे हे तीनही तगडे उमेदवार आपसात धडकणार की अंतिमतः तिरंगीतून कोण्या एका 'सिंगल' रंगाची कपात होऊन ही लढत हळुवार दुरंगीवर येऊन थांबणार? अशी शंका जनमानसात वाढीस लागत आहे. त्यामुळे कपिल पाटील विरुद्ध बाळ्यामामा अधिक सांबरे अशी लढत पाहायला मिळण्याचे 'चान्सेस' आहेत.
0 Comments