लोकसभा वार्ता : 'कुछ तो गडबड है?' बाळ्यामामांची उमेदवारी व्हेंटिलेटरवर? तर सांबरेंची भूमिका गुलदस्त्यात? दोघांची स्वतंत्र लढत, कपिल पाटीलांसाठी आधारकार्ड? -Kishor K Gaikwad


लोकसभा वार्ता : 'कुछ तो गडबड है?' बाळ्यामामांची उमेदवारी व्हेंटिलेटरवर? तर सांबरेंची भूमिका गुलदस्त्यात? दोघांची स्वतंत्र लढत, कपिल पाटीलांसाठी आधारकार्ड?


ठाणे/मुरबाड : (किशोर गायकवाड) भाजप मुक्त महाराष्ट्राचा संकल्प केलेल्या महाविकास आघाडीकडून भिवंडी लोकसभेत (Bhiwandi Loksabha) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे भाजपाच्या कपिल पाटील यांचे विरोधात सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे (Suresh Mhatre) यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. या राजकीय द्वंद्वयुध्दात जिजाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे (Nilesh Sambare) देखील उडी घेणार आहेत. त्यामुळे या तिरंगी लढतीच्या निकाला बाबत नवनवीन तर्कवितर्क समोर येत आहेत.


  बाळ्यामामा हे राष्ट्रवादी (S.P.) कडून भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी निवडणूक लढवित असल्याचे सांगत आहेत. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव करणे हाच महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) धेय्य असून वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) देखील या प्रमुख मुद्द्यावर निवडणूक लढवित आहे. त्यात वंबआने (VBA) निलेश सांबरे यांना पाठिंबा दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. परंतु त्या पाठिंब्याबाबत पुढे अधिकृत माहिती नाही. एवढं मात्र नक्की, दोन्हीही उमेदवारांचे उद्देश कपिल पाटील (Kapil Patil) यांचा पराभव करणे हाच असल्याचे मानले जात आहे. परंतु एकाच उमेदवाराला पराभूत करण्यासाठी दोन उमेदवार त्यांच्या विरोधात फॉर्म भरणार, हे समीकरण जनतेच्या डोक्यावरून जात आहे.


  डाव्या आणि उजव्या मतांच्या विभाजनात एकाच विचारधारेचे दोन उमेदवार कपिल पाटील यांचे समोर उभे असल्यास आपसूकच भाजपचा विजयाचा मार्ग मोकळा होत आहे. मात्र हा मार्ग मोकळा होत आहे की जाणीवपूर्वक केला जात आहे? अशा शंकांना हल्ली पेव फुटत आहेत आणि ते साहजिकच म्हणावे लागेल.


  विविध राजकीय पक्षांचा अनुभव असलेल्या बाळ्यामामाची भूमिका लोकसभेच्या लढतीमध्ये नेहमीच दुटप्पी राहिली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर काळ्या यादीच्या सीमेवर असलेल्या जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीला निर्विवाद करण्यासाठी सांबरे देखील सेटलमेंटचा पर्याय निवडू शकतात?अशीही एकीकडे चर्चा ऐकायला मिळत आहे. 


  बाळ्यामामा हे आपल्या मेळावे व परिषदेंमध्ये केवळ कपिल पाटील यांच्या बाबतीत टीकांवर भर देत आहेत. तर शिक्षणासाठी सांबरेंचा आधार घेतलेल्या अर्थिकदृष्ट्या दुर्बल विध्यार्थ्यांच्या यशाचा श्रेय घेऊन राज्यभर जाहिरात करून सांबरे निवडणूकीत मतांचा मुद्दा रेखाटत आहेत. परंतु कपिल पाटील पक्षाचा प्रोटोकॉल अनुसरून कार्यकर्ते यांचे जीवावर निवडणूक लढवित आहेत. या सर्वात बाळ्यामामा व सांबरे यांची विभक्त लढण्याची भूमिका कपिल पाटील यांच्या धनशक्तीला आव्हान देणारी नसून लीडसाठी पोषक असल्याचे ऐकीव आहे.



   निलेश सांबरे हे कामा पेक्षा जास्त जाहिरात करीत असून स्वतःवर आधारित त्यांची गाणी वाजवून स्वतःचे कौतुक करवून घेतात, अशा विविध आरोपात ते जखडले आहेत. आपल्या जाहिरातसाठी त्यांनी ठिकठिकाणी माणसे देखील नेमली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सांबरे यांच्याकडून सुईच्या टोका इतकी देखील मदत घेतांना विचार करावा, अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच सांबरे यांच्या वैद्यकीय मदत केंद्रातून उपचारासाठी ठराविक जमातीच्या लोकांना डावलले जात असल्याचे अनुभव देखील रुग्णांच्या नातेवाईकांकडून सांगितले जात आहेत. त्यांनी केलेल्या रस्त्यांच्या विकास कामांवरून सांबरे आजपर्यंत राजकारणात ट्रोल होत आहेत. याबाबत विधानसभेत देखील मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तसेच मुरबाड तालुक्यातील कोलठण येथील त्यांच्या स्टोन क्रॅशरच्या ब्लास्टिंगमुळे गावातील कित्येक घरांच्या झालेल्या नुकसानीचा ठपका त्यांच्यावर आजही जैसे थे आहे. पीडित कुटुंबियांमध्ये आदिवासी बांधवांच्या घरांचा देखील मोठ्याप्रमाणात समावेश आहे. त्यामुळे जनतेचा नुकसान करणाऱ्या व स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या उमेदवारा प्रति जनतेची फारशी भावना जोडली जाणार नाही, असे मतमतांतर मांडले जात आहेत.


  मुरबाड मतदारसंघ हा लोकसभेचा विनिंग माईलस्टोन असल्याचे अभ्यासक नाकारत नाहीत. असे असतांना निलेश सांबरे अद्यापही मुरबाडच्या पत्रकारांसमोर उघडपणे आले नाहीत. तर बाळ्यामामा हे मविआकडून राष्ट्रवादी काँग्रेस (SP) गटाचे अधिकृत उमेदवार असतांना ही मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये अपेक्षित चैतन्य दिसून येत नाही. शिवाय भिवंडी लोकसभेत आघाडी बाबत काँग्रेसची भूमिका देखील अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघात मविआमधील बिघाडी चव्हाट्यावर आली आहे. तर मविआचे उमेदवार बाळ्यामामा यांचे मुरबाडमधील खंदे समर्थक भाजपचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रामभाऊ दुधाळे हे सर्व लोकसभेची धुरा सांभाळत आहेत. नुकताच झालेल्या मविआच्या मेळाव्यात भोजनापासूनचे नियोजन रामभाऊ यांनी पाहिले होते. मात्र ते शेवटपर्यंत स्टेजवर गेले नाही. परंतु त्याची भगिनी नगरसेविका अनिता मार्के या व्यासपीठावर विराजमान होत्या. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या वेळी रामभाऊ आपल्या भाजप पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचा धर्म पाळण्या ऐवजी विरोधी उमेदवारास बळ देण्याचे काम करीत असल्याचे म्हणावे लागेल.


  या सर्वात 'कुछ तो गडबड है?' असं म्हणायची वेळ आता संभ्रमात असलेल्या मतदार राजावर आलेली आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणुक मूळ प्रक्रिये जवळ पोहचेपर्यंत अजून कोणकोणते पैलू समोर येतात? या विवंचनेत मतदार राजा अडकलेला भासत आहे. तर बाळ्यामामा व निलेश सांबरे हे चांगले मित्र असल्याचे सांगत असून दोघेही एकाच मतदारसंघातून वेगवेगळ्या निशाणीवर स्वतंत्र लढणे, हे जणू कपिल पाटील यांना आधारकार्डच ठरेल, असे मत विश्लेषक मांडत आहेत. त्यामुळे ऐनवेळी कोणी एक उमेदवार माघार घेणार आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात सांबरेंची भूमिका गुलदस्त्यात तर बाळ्यामामाची उमेदवारी व्हेंटिलेटरवर भासत असल्याची मतदारसंघात चर्चा आहे.

 -Kishor K Gaikwad

वाचा...










Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

Kishor K Gaikwad

2 Comments