मुरबाड शहरात मोठी घरफोडी; ३५ तोळे सोने चोरीला
फिंगरप्रिंट तज्ञ, श्वान पथक घटनास्थळी दाखल
-Kishor K Gaikwad
ठाणे/मुरबाड (दि. २) : (किशोर गायकवाड) ऐन दिवाळी सणात मुरबाड शहरातील छत्रपती संभाजी नगर येथे पहाटेच्या सुमारास चोरीची घटना घडली असून घरातील वडिलोपार्जित तसेच नवीन असे सुमारे ३५ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केल्याचे पीडित कुटुंबियांनी सांगितले आहे. दीपक दत्तात्रेय पाटोळे असे पीडित घर मालकाचे नाव असून पेशाने ते जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक आहेत.
शनिवारी (दि. २) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास हा प्रकार शहरात घडल्याचे समोर आले असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची झडती घेण्यास सुरुवात केली आहे. चोरी झालेल्या परिसरातील आणखी दोन घरांच्या दरवाज्यांचे लॉक व घरातील कपाटे या चोरट्यांनी तोडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तर हत्यार बंद होऊन आलेल्या चोरट्यांचा एक धारदार चाकू तसेच बनावट चाव्यांचा गुच्छ देखील घटनास्थळी आढळून आला आहे. या गुन्ह्याचा बारकाईने तपास करण्यासाठी पोलिसांकडून फिंगरप्रिंट तज्ञ तसेच श्वान पथकास पाचारण करण्यात आले आहे. प्राप्त पुराव्यांच्या साहाय्याने पोलिसांचकडून पुढील तपास जलदगतीने सुरू आहे.
मात्र गेल्या अनेक दिवसांपासून मुरबाड शहरामध्ये खून, चोऱ्या, घरफोड्या असे गुन्हे घडत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर या घटने नंतर शहरात पोलिसांची गस्त तसेच शहरातील मुख्य नाक्यांवर सीसीटीव्ही कमेऱ्यांची मागणी केली जात आहे.
-Kishor K. Gaikwad, Murbad
(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)
0 Comments