![]() |
Kisan Kathore and Subhash Pawar |
Murbad Assembly : के.के. Vs एस.पी. सामन्यात शरद पवारांची उडी? सव्वादोन लाखांच्या टार्गेटची कथोरेंना डोकेदुखी तर बॅकवर्ड सिटीझन्सवर सुभाष पवारांचे भवितव्य? वाचा, २००९, २०१४, २०१९ ला काय झाले?
-Kishor K. Gaikwad, Murbad
ठाणे/मुरबाड (दि. २७) : (किशोर गायकवाड) सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रबळ दावेदारा अभावी मुरबाड मतदारसंघातील निवडणूक एकतर्फी झालेली पाहायला मिळाली होती. मात्र यावेळी राज्यभरातील विधानसभा निवडणुकीमध्ये केवळ उमेदवारांमध्ये लढत नसून तर त्यांच्या पाठीशी असलेल्या महायुती व महाविकास आघाडी या दोन बलाढ्य राजकीय शक्तींमध्ये ही लढत असल्याचे चित्र आता मुरबाडमध्ये अनुभवला मिळत आहे. त्यामुळे यंदा मुरबाडची विधानसभा ही लक्षवेधी ठरत आहे.
नुकताच भाजपा उमेदवार किसन कथोरे (Kisan Kathore) यांचे नामनिर्देशन दाखल दिनी आयोजित सभेत भाजपा राष्ट्रीय पदाधिकारी विनोद तावडे यांनी मंत्रीपदासाठी सव्वादोन लाखांच्या आघाडीचे टार्गेर कथोरेंना दिले आहे. त्यामुळे कथोरे टीम चांगलीच चौफेर कामाला लागलेली पाहायला मिळत आहे. तर मविआ उमेदवार सुभाष पवार (Subhash Pawar) यांचेकडून मतदारसंघात गेम चेंजर शरद पवारांच्या (Sharadchandra Pawar) सभेचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. तेव्हा मुरबाड विधानसभेतील राजकीय चित्राचे तूर्तास अंदाज लावणे विश्लेषकांसाठी अवघड होणार आहे?
शिवाय, किसन कथोरेंवर पक्षातील, युतीतील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते नाराज आहेत. मात्र सुभाष पवारांच्या बाबतीत ही स्थानिक मविआमध्ये काही विशेष गोड मत म्हणता येणार नाही. परंतु, 'दगडा पेक्षा वीट मऊ' या उक्तीला अधोरेखित करून सद्या मुरबाडचा सुज्ञ मतदार राजा आपली भूमिका बाजावण्याच्या मानसिकतेत असल्याची चर्चा आहे.
ठाणे जिल्ह्यातील विशेषतः मुस्लिम, बौद्ध व इतर बॅकवर्ड सिटीझन समाजाने भिवंडी लोकसभा निवडून आणली व मविआच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे [MP Suresh (Balyamama) Mhatre] यांना खासदार बनवून संसदेत पाठविल्याचे त्याच पक्षातून मान्य केले जाते. तेव्हा याचीच पुनरावृत्ती सन २०२४ च्या मुरबाड विधानसभा निवडणुकीत घडणार असल्याचा आशावाद राष्ट्रवादी एस.पी. पक्षातून व्यक्त केला जात आहे.
विधानसभा २००९ ते २०१९...
सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोटीराम पवार अर्थात सुभाष पवार यांच्या वडिलांचा पराभव करून राष्ट्रवादी पक्षातून किसन कथोरेंनी मुरबाड विधानसभेत आपला खाता उघडला होता. पुढे, सन २०१४ मध्ये किसन कथोरे यांनी भाजपामध्ये प्रवेश करून दुसऱ्यांदा आमदारकी जिंकली होती. तर सन २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या प्रमोद हिंदुराव यांचा दारुण पराभव करून कथोरेंनी हॅट्रिक पूर्ण केली होती. दरम्यान सुभाष पवार यांनी महायुतीच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने युतीधर्मातून कथोरेंना मदत केली होती. मात्र आता चिरंजीव पवार व कथोरे आमनेसामने असतांना राष्ट्रवादीच्या विभक्त अजित पवार गटातील प्रमोद हिंदुराव यांना युतीधर्मातून कथोरेंचे काम करावे लागणार आहे. एकेकाळी वडिलांना पराजित केलेल्या उमेदवाराला मदत व पुन्हा त्याविरोधात रणशिंग पुकारलेले सुभाष गोटीराम पवार तर त्याच पटलावरील कथोरेंकडून दारुण पराभवाचा आवंढा गिळलेले हिंदुराव पुन्हा कथोरेंच्या व्यासपीठावर आसनस्थ पाहायला मिळतात; हाच मुरबाडच्या आयात-निर्यात राजकारणाचा खरा चेहरा आज मतदार अनुभवतोय. मात्र कार्यकर्ते केवळ सतरंज्या आणि पोकळ कौतुक थापांतून छाताड फुगवून आपसी वैरात पक्षनिष्ठा शोधतांना नजरेस पडत आहेत.
0 Comments