#नेमबाजी : कपिल पाटील गटाचा मुरबाडमध्ये शक्तिप्रदर्शन; नाव न घेता आ. कथोरेंवर हल्लाबोल? -Kishor K. Gaikwad



#नेमबाजी : कपिल पाटील गटाचा मुरबाडमध्ये शक्तिप्रदर्शन


नाव न घेता आ. कथोरेंवर हल्लाबोल?


-Kishor K. Gaikwad

मुरबाड (किशोर गायकवाड) : (दि. १३) भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रविवारी मुरबाड शहरातील माऊली गार्डन येथे निष्ठवंत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र निष्ठवंतचा आडोसा घेऊन कपिल पाटील व त्यांच्या समर्थकांचा येत्या विधानसभेच्या पूर्वार्धात स्वपक्षातील आ. किसन कथोरे (MLA Kisan Kathore) यांना शक्तिप्रदर्शन दाखविण्याचा छुपा हेतू यामागे असल्याची चर्चा तालुक्यात आहे.


 यावेळी व्यासपीठावर ठाणे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, ज्येष्ठ नेते रामभाऊ पातकर, तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव, शरद म्हात्रे, जि. प. माजी सदस्य सुभाष घरत, माजी नगरसेवक अण्णा कुलकर्णी, रामभाऊ बांगर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर, दीपक खाटेघरे, नारायण गोंधळी, श्रीकांत धुमाळ आदी उपस्थित होते. 


 तर या मेळाव्यात भाषण करणाऱ्यांनी नाव न घेता आ. कथोरे यांचेवर खरपूस टीका करण्यात आली. लोकसभेत पाटील साहेबांना आपल्याच लोकांनी पाडले, तर मी पणा करणाऱ्यांनी गप्प बसावे अशा शब्दांत पातकर यांनी नाव न घेता कथोरे यांचेवर निशाणा साधला. तसेच मागील विधानसभेला गोटीराम पवार यांच्या विरोधात काम करण्याचे दुःख मोहपे यांनी शब्दाने व्यक्त करून अपल्याकडून झालेल्या या चूकीची जाहीर कबुली दिली. यावेळी पुढे बोलतांना त्यांनी बदलापूर येथे झालेल्या राजकीय विवादाच्या मुद्द्याला आपसूकच हात घातला. दोनशे ते तीनशे गुंडांना तिथे आणून मला धक्काबुक्की झाली, माझ्या अंगावर चालून आलेल्या माणसाला मी कधीच माफ केल नाही. जात दाखवायला लावली तर आम्ही मैदानात उतरू अशा चेतावणीखोर व्यक्तव्यातून मोहपे यांनी अप्रत्यक्ष कथोरे यांना इशारा दिला. 


 अंतिमतः कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कपिल पाटील यांनी विविध मुद्द्यांचा हवाला देत स्वपक्षीय आ.  कथोरे यांचेवर मनसोक्त हल्लाबोल केला. भाजपा हा सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष असून मुरबाड तालुक्यातील एका व्यक्तीचा तो पक्ष नाही. अशा व्यक्तींच्या जोखडातून भाजपाला मुक्त करणार असून पक्षाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. भाजपाच कार्यकर्ता स्वाभिमानी आहे आणि तो स्वाभिमानी राहील, अशी प्रतिपादन माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणातून केले.


 तर मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती श्रीकांत धुमाळ यांची बाजू मांडतांना, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला धमक्या दिल्या जातात, असे नाव घेता आ. कथोरे यांना उद्देशून म्हणाले. तसेच कल्याण-मुरबाड रेल्वे, माळशेज घाटातील रस्त्याचे काम, शहापूर-मुरबाड रस्ता ही कामे केंद्र सरकारची आहेत. त्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणीही करु नये, असा टोलाही कपिल पाटील यांनी यावेळी लगावला आहे. दरम्यान नवनवीन निष्ठवंत कार्यकर्ते यांना सन्मान सत्कार केला. तसेच गणेशोत्सव स्पर्धेतील विजयी मंडळांचे देखील यथोचित सन्मान केला. या मेळाव्याला महिलांची व कार्यकर्त्यांची टोलेजंग गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे मेळाव्याचे उत्तर आ. कथोरे गट कशाप्रकारे देतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.



 -किशोर गायकवाड, मुरबाड




Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments