मुरबाडच्या ठाकरे सेनेअंतर्गत खडाजंगी;
उबाठा पक्षातील नाराज गटा विरोधात मुरबाडमध्ये काउंटर पत्रकार परिषद
ठाणे/मुरबाड (किशोर गायकवाड) : (दि. १३) मुरबाडमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका प्रमुखपदी संतोष परशुराम जाधव यांची करण्यात आलेल्या निवडी विरोधात पक्षाच्या नाराज गटाने शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख आमदार रुपेश म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांचे खंडन करून प्रतिउत्तर देण्यासाठी नवनियुक्त तालुका प्रमुखाकडून रविवारी काउंटर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मंचावर ता. प्र. संतोष जाधव यांचे समवेत, उपता. प्र. राजेश भांगे, उपशहरप्रमुख लक्ष्मण बोस्टे, शहर प्रमुख बबलू बहाडकर, सचिव भाऊ यशवंतराव, जेष्ठ शिवसैनिक राम सासे, जेष्ठ शिवसैनिक पांडूरंग धुमाळ, समन्वयक विनायक ढमणे यांचे सह युवा सचिव मिलिंद घरत, संघटक भरत गायकर, युवा संघटक निलेश चौधरी, युवा शिवसैनिक महेश भांगे, विश्वानाथ सुर्यराव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
दि. ३० ऑगस्ट रोजी संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार कार्यालयावर आयोजित जन आक्रोश मोर्चा दरम्यान तत्कालीन ता. प्र. संतोष विशे गट व जाधव गट यांच्यातील चर्चेत असलेला पक्षांतर्गत वाद शुक्रवारच्या पत्रकार परिषदेमुळे चव्हाट्यावर आला असतांना हा वाद पुढे अधिक चिघळत जाण्याची चिन्हे दिसत आहेत. आ. रुपेश म्हात्रेंनी महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या विरोधात काम करण्याचे आदेश आम्हाला दिले असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट विशे यांनी या पत्रकार परिषदेत केला होता. तसेच नंतर आ. म्हात्रेंनी कोट्यवधींचा पॉकेट घेतल्यावर निवडणूक कामाला सुरुवात केल्याचा गंभीर देखील आरोप त्यांनी केला होता. याबाबत मुरबाडच्या जनतेसमोर आपली बाजू मांडण्यासाठी तसेच तालुका प्रमुख नियुक्ती बाबत कळविण्यासाठी जाधव यांनी कार्यकर्त्यांसमवेत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यात त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे देतांना माजी तालुकाप्रमुख यांनी जिल्हापरिषद निवडणूकीत स्वपक्षातील अधिकृत उमेदवार रामचंद्र सासे यांचेकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पेसे घेतल्याचे उघड केले. तसेच उपजिल्हा प्रमुख घुडे यांच्या समक्ष विशे हे शिवसेना वरिष्ठ नेत्यांना आर्वाच्य भाषेत बोलत असताना घुडे त्यांनी रोखणे अपेक्षित होते. परंतु, तसे न केल्याने विशेंच्या व्यक्तव्याला घुडेंची अप्रत्यक्ष मूक सहमती असल्याचा आरोप करून विशे व घुडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करणार असल्याचे या पत्रकार परिषदेतून जाधव यांनी जाहीर केले. त्यामुळे मुरबाडच्या उबाठा पक्षातील अंतर्गत गटबाजी येत्या विधानसभेत काय वळण घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments