हायलाइट : काउंटर शक्तिप्रदर्शनातून सुभाष पवारांचे नामनिर्देशन; मी तर नोंदणीकृत ठेकेदार, ? जंगलचोर ठेकेदार... हे नारळ केवळ निवडणुकीचा जुमला, बाबांचा समाचार दोन वेळा आता मुलाला..., कथोरेंची गर्दी - पडघा, हाजीमलंग डोळखांब, वाचा भाषणातील प्रमुख मुद्दे...
-Kishor K. Gaikwad, Murbad
ठाणे/मुरबाड (दि. २८) : (किशोर गायकवाड) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुरबाड विधानसभा उमेदवार सुभाष पवार यांनी सोमवारी काउंटर शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान शहरात प्रचार रॅली तसेच भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे खा. सुरेश म्हात्रे, माजी आ. गोटीराम पवार यांचे सह घटक पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांनी उपस्थित विराट जनसमुदायला संबोधित केले.
तर उमेदवार किसन कथोरेंनी (Kisan Kathore) निवडणूकीच्या तोंडावर फोडलेल्या नारळांवर अनेकांनी आपल्या भाषणातून खरपूस टीका केली. जाधव यांनी बदलापूर बाल अत्याचार घटनेच्या मुद्द्याला अधोरेखित करून शाळेचे संचालक व्यवस्थापन भाजपा प्रणित असल्याचा गंभीर आरोप देखील केला. तर अनेक वक्त्यांनी बदलापूरमधील समस्यांचा पाढा वाचला. रिपाइं नेते रविंद्र चंदने यांनी विनोद तावडे, प्रमोद हिंदुराव तसेच ठेकेदारी, खड्डे या मुद्द्यांना अधोरेखित करून जोरदार भाषण केले.
या सभेतील सुभाष पवारांचा भाषण सभेचा केंद्र ठरला. निवडणुकीच्या तोंडावर एवढे नारळ तुम्ही का फोडता? पंधरा वर्षे झोपले होते का? १० महिन्यांपूर्वी संगमचा नारळ आमच्या समोर फोडला होता. त्यामुळे हा केवळ निवडणुकीचा जुमला असल्याचे ते कथोरेंवर टीका करतांना म्हणाले. कामांच्या घोषणांवर बोलतांना उमेदवार पवार यांनी, एखादं काम आपण केलं नाही तर लोकांच्यात जायला लाज वाटते, मात्र कथोरेंनी घोषणा केलेली कामे अपूर्ण असल्याचे म्हणाले. मुरबाडच्या रस्त्याला कथोरे यांनी घोलप साहेबांचे नाव दिल्याचे घोषित केले मात्र, कागदावर ते दिसत नाही. मी जिल्हा परिषदेला असतांना पंचायत समितीच्या इमारतीला घोलप साहेबांचे नाव दिल्याचे ते म्हणाले.
ठेकेदारीच्या हायलाइट मुद्द्यावर बोलताना सुभाष पवार यांनी मी नोंदणीकृत ठेकेदारी व्यवसाय करत होतो, तुमचा उगम कुठून झाला? तुम्ही जंगलतोड करून ठेकेदारी केली, सगळे जंगल कोणी चोरून खाल्ले हे जनतेला माहीत आहे, असा घणाघात त्यांनी आपल्या भाषणातून नाव न घेता प्रतिस्पर्धी उमेदवार किसन कथोरे यांच्यावर केला.
तसेच बाबांचा समाचार दोनवेळा घेतलाय आता मुलाला भुईसपाट करणार, या वक्तव्यावर त्यांनी कथोरेंनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्यासाठी वडिलांचा अनेकवेळा आशिर्वाद घेतल्याचे जगजाहीर केले. तर यावेळी अडीच लाख मतदान घेऊ, कथोरेंच्या या वाक्यावर त्यांना वडिलांची उपमा देऊन वय झाल्याचे म्हणत, मतदानच पावणे तीन लाख होणार असून मग आम्ही काय इथे बसायला आलोय का? एवढ्या लीडने नाही तर तेवढ्या स्पीडने ते मागे पडणार असल्याचे प्रतिउत्तर करतांना सुभाष पवार (Subhash Pawar) म्हणाले.
तर एवढा मोठा जनसमुदाय मी माझ्या निवडणुकीच्या रॅलीमध्ये सुध्दा पहिला नसल्याचे माजी आ. गोटीराम पवार (Gotiram Pawar) आपल्या भाषणातून म्हणाले. तसेच कथोरेंच्या उमेदवारी अर्ज दाखल दिनी उपस्थित लोकं ही मुरबाड मतदारसंघा बाहेरील पडघा, हाजीमलंग, डोळखांब येथून गाड्या भरून आणल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी आपल्या भाषणातून केला. मात्र सभेच्या शेवटी दर्शविलेली खा. म्हात्रे यांची उपस्थिती केवळ औपचारिकता असल्याचे बोलले जात आहे. यावेळी त्यांनी भाषणातून एक वर्षापासून आम्ही सुभाष पवार यांना बोलवत होतो तरीही देर आये दुरुस्त आये असा गौप्यस्फोट करून महाविकास आघाडीचा निर्णय व शरद पवारांचा आदेश आमच्यासाठी सर्वकाही असल्याचे ते म्हणाले. परंतु, विरोधकांच्या टिकेवर एकही ब्र शब्द त्यांनी न काढल्याने त्यांच्या या भव्य सभेतील सौम्य भाषणाकडे आघाडीतून संशयाने पाहिले जात असल्याची चर्चा आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर आरपीआय सेक्युलरचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, मुरबाड तालुकाध्यक्ष दीपक वाघचौडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार, माजी शिवसेना (UBT) तालुका प्रमुख संतोष विशे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या डॉ. कविता वारे आदी नेत्यांसह मुरबाड, बदलापूर येथील मविआ पदाधिकारी आसनस्थ होते.
-Kishor K. Gaikwad, Murbad
(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)
0 Comments