शाब्बास : पंधरा वर्षे मागणी करून कंटाळले, अखेर लेकरांच्या शाळेसाठी आदिम ग्रामस्थ उतरले वाहत्या ओढ्यात; स्वतःच मजूर - इंजिनिअर बनून काठ्या, दगडगोट्यांच्या साहाय्याने भर पावसात उभारला पूल! पहा व्हिडिओ...
ठाणे/मुरबाड (दि. ३) : (किशोर गायकवाड) मुरबाड विधानसभा क्षेत्र अर्थात 'डीपीआर तयार, निधी मंजूर, तुझ्या माहिती सांगतो, प्रस्ताव तयार. निधी कमी पडू देणार नाय, एकही खड्डा नाही' अशा अगणित वल्गनेंचे केवळ माहेरघर झाले असून नुकताच तालुक्यातील आणखीन एका सत्य परिस्थितीचे भयाण वास्तव आज पुन्हा एकदा सर्वांसमोर आले आहे.
मुरबाड तालुक्यातील (Murbad Taluka) अतिदुर्गम भाग म्हणून गणला जाणाऱ्या माळशेज घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या मोरोशी आश्रम शाळेत फांगुळगव्हाण, साखरवाडी, निरगुडपाडा या आदिवासी वाड्या-पाड्यांतील सुमारे ७० ते ८० विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी जात असतात. मात्र शाळेपर्यंत पोहचण्यासाठी या विद्यार्थ्यांना रानवाटेतून पायपीट सोबतच चक्क वाहत्या ओढ्यात उतरून गेल्या शिवाय गत्यंतर नव्हते. नुकताच काही दिवसांपूर्वी हा ओढा ओलांडताना एक शाळकरी विद्यार्थी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे सदर विद्यार्थ्याचे जीव वाचले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फांगुळगव्हाण ग्रामस्थांनी आता आमदार-खासदार, पंचायत समिती-जिल्हा परिषद सदस्य यांच्या भरवशावर न राहता थेट आपल्या स्वकष्टाने ओढ्यावर सेतू उभारला व आपल्या लेकरांना शाळेपर्यंतची वाट मोकळी करून दिली आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करून देखील प्रशासनाने या ग्रामस्थांना साकव दिले नाही. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी भर पावसात जीव मुठीत घेऊन पाणी वाहत्या ओढ्यातून वाट शोधत शाळेपर्यंत जात होते. परंतु, एकाही नेत्याला, पुढाऱ्यांना यांच्या वेदनेची कीव आली नाही. हा धोकादायक प्रवास आपल्या लेकरांच्या जीवावर बेतण्याची परिस्थिती निर्माण झालेली पाहून अखेर स्थानिकांनी मदतीच्या सर्व आशा सोडून कसलीही वाट न पाहता भर पावसात ओढ्याच्या पाणीपात्रात उतरून थेट काठ्या व दगडगोट्यांच्या साहाय्याने पिल्लर उभारले व त्यावर बॉक्स पाईपांचा वेल्डिंग करून आणलेला लोखंडी साकव स्थापित केला. त्यामुळे आता यामार्गे ये-जा करणाऱ्या विद्यार्थांचा तूर्तास प्रवासी धोका टळला असून शाळेपर्यंत पोहचण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
एकीकडे मुरबाडच्या सार्वजनिक बांधकाम (PWD Murbad) विभागा मार्फत बड्या नेत्यांच्या ठेकेदारांना पोसण्यासाठी अनावश्यक पूल बांधले जात आहेत. खाटेघर तसेच बिरवाडी फाट्या समोर स्थित उत्तम उदाहरण म्हणून असे काँक्रीट पूल हमखास नजरेस पडतात. दोन्ही बाजूंना रस्ता नसलेल्या या साकवांना नेमकं का बांधण्यात आले आहे? हा संशोधनाचा मुद्दा बनला आहे. यांचा सध्यातरी काहीही एक उपयोग नसून केवळ शासनाचा निधी गिळंकृत करता यावा, एवढ्याच उद्देशाने हे बांधल्याचे दिसून येत आहे. मात्र अधिकारी वर्गाला कोणीही जाब विचारत नाही. त्यामुळे ते स्वतःला मालक समजत असल्याचे भासत आहेत. सबब, मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागातील दुर्लक्षित आदिवासी वाड्या-पाडे आजही विकासापासून उपेक्षित असून मूलभूत सोयीसुविधांपासून कोसो दूर आहेत.
तर खाऱ्यार्थी या ग्रामस्थांनी आमदार-खासदार आणि इतर सर्वच लोकप्रतिनिधी, स्वयंघोषित समाजसेवक यांना लाजविण्या सारखी कामगिरी केली असून सोशियल मीडियावर याबाबत त्यांचे यथोचित कौतुक केले जात आहे. मात्र, असे असले तरी हा मुद्दा थेट अधिवेशनात उपस्थित केला जाऊन यावर जाब विचारला पाहिजे, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.
0 Comments