विधानसभा : मुरबाडच्या जागेसाठी शिंदेगटात हालचाली सुरू? उमेदवार पुन्हा बदलापूर की मुरबाडचा? आमदार किसन कथोरेंचा 'प्लॅन बी' काय? वाचा...
Kishor K. Gaikwad
ठाणे/मुरबाड (किशोर गायकवाड) : अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली राज्याची विधानसभा निवडणूक यंदा मुरबाडमध्ये लोकसभेप्रमाणेच चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत असून यावेळी मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुरबाड विधानसभा मतदारसंघ गत तीन पंचवार्षिकपासून आमदार किसन कथोरे (MLA Kisan Kathore) यांचेकडेच राहिला आहे. सन २००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत आ. कथोरे हे राष्ट्रवादी पक्षातून ५८ हजार मते मिळवून विजयी झाले होते. यावेळी गोटीराम पवार यांच्या पारड्यात ५४ हजार तर वामन म्हात्रे यांना ३७ हजार मते होती. तद्नंतर २०१४ ला मोदी प्रवाहात प्रवेश घेऊन आमदार कथोरे ६९ हजार मते मिळवून पुन्हा विजयी झाले होते. तर गोटीराम पवार यांनी ५८ हजार व वामन म्हात्रे यांनी ५४.६ हजार मते प्राप्त करून अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी राहिले होते. मात्र सदर निवडणुकीत मतांची विभागणी झाल्याने आ. कथोरेंचा विजय झाल्याची चर्चा होती. पुढे २०१९ ला परिस्थिती आणखीन बदलून दिग्गज उमेदवारांनी निवडणुकीला पाठ फिरवल्याने कथोरे यांचा विजयाचा मार्ग सोपा झालेला पाहायला मिळाला.
परंतु, यंदा २०२४ च्या निवडणुकीत काहीसे वारे फिरणार असल्याचे चित्र भासत आहे. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील आ. कथोरे व माजी खा. पाटील यांच्यातील वाद, पर्यायाने भाजपातील अंतर्गत गटबाजी, शिवाय मुरबाड मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वास्तव्य असलेल्या जिल्हात मोडतो, या सर्व गोष्टी त्यावर परिणाम करू शकतील.
भिंवडी लोकसभा मतदारसंघात भाजपाचे कपिल पाटील यांना पराभवाला सामोर जावे लागल्याची कारणे अद्याप सुस्पष्ट नाहीत. असे असले तरी मुरबाडमधून शिवसेना शिंदे गटाचे नेते सुभाष पवार (Subhas Pawar) यांनी युती धर्म पाळून घेतलेल्या मेहनतीमुळे कपिल पाटील (Kapil Patil) यांना मुरबाड तालुक्यातून इतर उमेदवारांपेक्षा अधिक मताधिक्य प्राप्त झाल्याचे मान्य केले जात असल्याने मुरबाडमध्ये शिंदे गटाचे प्राबल्य अधिक असल्याचे म्हणावे लागेल. तर भाजपातून जुन्या नेते मंडळी यांचे मार्फत भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली आहे. या सर्व गोष्टींचा प्रभाव निश्चितपणे विधानसभेच्या उमेदवारी निवडीवर होणार असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. परिणामी, यंदाच्या विधानसभेला मुरबाड विधानसभेतून भाजपा ऐवजी शिंदे गटाचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र असे असले तरी, या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल? हा उत्सुकता वाढविणरा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर शिंदे गटातून इच्छुक उमेदवारांमध्ये बदलापूरचे वामन म्हात्रे यांचे नाव प्रामुख्याने ऐकिवात असून सुभाष पवार यांचे देखील प्रयत्न सुरू असल्याचे समजते. त्यामुळे, साहजिकच या सर्वांची कल्पना बाळगून असलेले भाजपा आमदार किसन कथोरे यांचा 'प्लॅन बी' काय असेल? यावर सद्या अंदाज बांधला जात आहे.
0 Comments