#सरळगावात कारवर फायरिंग : घटना सीसीटीव्हीत कैद तर गुन्ह्याची नोंद तिसऱ्या दिवशी; गोळीबार प्रकरणातील अदृश्य हात कोणते? आरोपींवर कठोर शिक्षेच्या मागणीसाठी पंचायत समिती सदस्याचे पत्र... वाचा सविस्तर! -Kishor K. Gaikwad


#सरळगावात कारवर फायरिंग : घटना सीसीटीव्हीत कैद तर गुन्ह्याची नोंद तिसऱ्या दिवशी; गोळीबार प्रकरणातील अदृश्य हात कोणते? आरोपींवर कठोर शिक्षेच्या मागणीसाठी पंचायत समिती सदस्याचे पत्र... वाचा सविस्तर!


-Kishor K. Gaikwad

ठाणे/मुरबाड : (किशोर गायकवाड) मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील बहुचर्चित डॉक्टर पाल यांच्या पार्किंग केलेल्या वाहनावर चक्क गोळी झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली असून याबाबत मुरबाड पोलिस स्टेशनमध्ये (Murbad Police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या सरळगावातील (Saralgaon) शहापूर-किन्हवलीकडे जाणाऱ्या रस्त्या शेजारी असणाऱ्या साईलीला अपार्टमेंटमधील श्रीकृष्ण हॉस्पिटलचे डॉ. रविशंकर हरिनाथ पाल हे दिनांक १ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास कल्याण येथून परतल्यावर आपल्या नेहमीच्या ठिकाणी पत्नी श्रद्धाच्या नावे असलेली ह्युन्दाई कंपनीची ऑरा कार क्रमांक एम.एच.०३ इ.बी. ८९४६ ही किन्हवली दिशेने तोंड वळवून पार्क व लॉक करून घरी निघून गेले. मात्र दुसऱ्या दिवशी (दि. २ रोजी) रात्री ८ वाजेच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सने कारची काच फुटली असल्याचे डॉ. पाल यांना सांगितले. आपल्या स्टाफ समवेत पाल यांनी स्वतः जाऊन पाहणी केली असता कारच्या पुढील पॅसेंजर बाजूकडील दरवाजाच्या काचेस बारीक छिद्र पडून काचेस तडा गेलेला आढळून आला. तसेच ड्रायव्हर बाजूकडील दरवाजाला देखील बारीक छिद्र दिसला. त्यामुळे दोन्ही छिद्र समोरासमोर दिसत असल्याने आपल्या कारवर कुणीतरी फायरींग केली असावी असा त्यांना संशय आला. याबाबत खात्री करण्यासाठी डॉ. पाल यांनी त्यांचे दवाखान्यातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरांची पाहणी केली असता सदर फुटेजमध्ये दिनांक २ जुलै रोजी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास एक सफेद रंगाची कार किन्हवली दिशेकडून सरळगाव (Saralgaon) दिशेने येताना दिसली. सदरची कार डॉ. पाल यांचे कारजवळ आल्यानंतर कारचा पुढील पॅसेंजर बाजूकडील दरवाजा थोडा उघडून त्यामधुन अज्ञात इसमाने त्याचेकडील बंदुकीने डॉ. पाल यांचे कारचे दिशेने फायर करुन निघून गेल्याचे फुटेजमध्ये दिसले. सदर कार ही सफेद रंगाची असून तिचा नंबर माहिती नसून अज्ञात इसमाने डॉ. पाल यांना घाबरविण्याच्या हेतूने त्याचेकडील बंदुकीने फायरींग करुन कारचे नुकसान केले असल्याने सफेद कारमधील अज्ञात इसमा विरुध्द डॉ. पाल यांची तक्रार असल्याचे घटनेच्या तिसऱ्या दिवशी अर्थात दि. ४ जुलै रोजी नोंदविण्यात आलेल्या आपल्या एफआयआरमध्ये त्यांनी म्हंटले आहे.



  याबाबत नवीन फौजदारी अ‍ॅक्ट भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ नुसार कलम ३२४(४), शस्र अधिनियम १९५९ नुसार कलम ३, २५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास मुरबाड पोलिस करीत आहेत. 




पं. स. सदस्याचे पत्र...

 मागील वर्षी देखील दि. ८ एप्रिल २०२३ रोजी डॉ. पाल यांची मारुती सुझुकी कार अशीच अज्ञात इसमाने रात्रीच्या सुमारास पेटवून दिली होती. त्यामुळे सदर गुन्ह्यांची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडावे व कठोर शिक्षा द्यावी, अन्यथा सरळगाव परिसरातील सर्व नागरिकांकडून झालेल्या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुरबाड पंचायत समितीचे सदस्य अ‍ॅड. विष्णू सदाशिव घुडे यांनी पोलिस स्टेशनला सादर केलेल्या पत्रातून दिला असून मुरबाड तालुक्यातील मोठी बाजारपेठ व सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या सरळगाव परिसरात मोठ्याप्रमाणात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आटोक्यात आणण्यासाठी चोवीस तास दोन पोलीस शिपाईंची नेमणूक करण्याबाबत मागणी केली आहे. तसेच संपूर्ण सरळगाव बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे व पावसाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने अंधाराचा गैरफायदा घेऊन घडणाऱ्या संभाव्य गुन्हे टाळण्यासाठी लवकरात लवकर वॉटर प्रूफ हायमास्ट व स्ट्रीट लाईट बसविण्याबाबत अ‍ॅड. घुडे यांनी सरळगाव ग्रामपंचायतीला देखील पत्र दिले आहे.


  मात्र डॉ. पाल हे गेल्या वर्ष भरापासून काहीना काही कारणाने मुरबाड तालुक्यात चर्चेत राहिले आहेत. मागील वर्षी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान रुग्ण मृत पावल्याच्या घटनांचे वृत्त जोर धरून होते. तर दुसऱ्यांदा रात्रीच्या सुमारास त्यांच्या वाहनाची नुकसानी होत असल्याने डॉ. पाल यांचे जीवितास धोका आहे का? या सर्व प्रकारामागे नेमकं कोणते अदृश्य हात दडलेले आहेत? असे विविध आवाहन मुरबाड पोलिसांपुढे उभे ठाकले असून याप्रकरणी नेमकी काय वादतथ्ये समोर येतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-Kishor K Gaikwad

वाचा...








Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments