वृक्ष कत्तली : आमच्या कल्याण-मुरबाड महामार्गावरील सावली हरपली; रस्ते रुंदीकरणातील अद्याप शेकडो वृक्षे लाकूडतोड्यांच्या कुऱ्हाडीखाली; तर अनियोजित रस्ते कामामुळे चिखलातून जीवघेणी वाट... -Kishor K Gaikwad


वृक्ष कत्तली : आमच्या कल्याण-मुरबाड महामार्गावरील सावली हरपली; रस्ते रुंदीकरणातील अद्याप शेकडो वृक्षे लाकूडतोड्यांच्या कुऱ्हाडीखाली; तर अनियोजित रस्ते कामामुळे चिखलातून जीवघेणी वाट...


-Kishor K Gaikwad
ठाणे/मुरबाड : (किशोर गायकवाड) एकीकडे शासन वृक्ष लागवड मोहीमेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करते तर दुसरीकडे रस्ता रुंदीकरणातून हजारो झाडांचा बळी देऊन त्याच मोहिमेला हरताळ फासण्याचे काम कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर सुरू आहे. परिणामी यातून पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले असून याकामी लाखों प्रवासी वर्गाला देखील वेठीस धरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


 कल्याण - मुरबाड दरम्यान महामार्गाच्या (Kalyan Murbad Highway) रुंदीकरणाचे काम सद्यस्थितीला सुरू असून यासाठी सदर महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या वर्षानुवर्षे जुन्या झाडांच्या होणाऱ्या कत्तलींचे दृष्य पाहणे प्रवाशांच्या पदरी आले आहे. गेल्या अनेक दशकांपासून या झाडांनी ऊन-वारा-पावसात प्रवाशांना निवारा, प्राणवायू दिला, मात्र प्रवाश्यांचा तो आसरा आता संपविण्यात आला आहे.



 अशा प्रकल्पांमुळे कृत्रिम प्रगतीकडे जरी वाटचाल होत असली तर याकामी वृक्षांशी करण्यात आलेल्या तोडजोडीमुळे फायद्यापेक्षा शाश्वत विकासाचे नुकसानच जास्त म्हणावे लागेल. या बेसुमार वृक्षतोडीने पर्यावरणाचा किंबहुना मानवाचाच नुकसान अधिक घडून आला आहे. त्याच समवेत पक्षांची घरटी, प्रजाती, वन्यजीव, दुर्मिळ किटके, वनस्पती यांचेही नुकसान घडवून आणले आहे. मात्र याबाबत शासनाने कितपत विचार केला?



 मुरबाड तालुक्याचे खऱ्या अर्थाने सौंदर्य म्हणजे मुरबाड तालुक्याची जैवविविधता आणि सह्याद्री; याठिकाणी बाहेरून लोकं त्यांवर रिसर्च व अभ्यासा करण्याकरिता येत असतात. परंतु, स्थानिक मुरबाडकर फक्त एवढाच जाणतो की पर्यटक माळशेज घाटात फिरायला व धबधब्याखाली भिजायला येतात. आपल्याकडे साधारणतः ३५० पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात. तसेच अनेक दुर्मिळ फुले, वनस्पती व औषधी वनस्पतींचे देखील अस्तित्व आहे. याचं कारण मानले जाते, ते म्हणजे फक्त आपली झाडे! मात्र जर जागृत मुरबाडकर या वृक्षतोडींबाबत असेच डोळे बंदची भूमिका घेत राहिला तर उर्वरित जैवविविधता देखील गमावून बसू, हे वैश्विक सत्यच! 



  या वृक्षतोडीमध्ये नागरिक फक्त जुनी झाडेच गमावत नसून त्यावर असणारे सुंदर ऑर्किड (Orchids) देखील हरवून बसत आहेत. कल्याण-मुरबाड रस्त्याच्या लगत असलेल्या झाडांवर पावसाळ्यात अनेक दुर्मिळ ऑर्किड बघायला मिळतात. शासनाकडून आता एवढीच अपेक्षा आहे की रस्ते विकासाच्या धोरणात जी नवीन वृक्ष लागवडीची प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर सुरू करून त्याची माहिती जणते पर्यंत पोहोचवावी व झालेली निसर्गाची हानी जलदगतीने भरून काढावी.


 शब्द मशालच्या माध्यमातून अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा पाठपुरावा नक्कीच सुरू राहील. परंतु, सामान्य नागरिकांकडून देखील मोठ्या अपेक्षा आहेत. यानिमित्ताने वृक्ष संवर्धनाची प्रभावी चळवळ मुरबाड तालुक्यातून सुरू होऊन निसर्गाचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. याबाबत शब्द मशालच्या वाचक वर्गाने आपल्या प्रतिक्रिया, सूचना कॉमेंट बॉक्स मध्ये मांडाव्यात...


ठेकेदारांच्या मांडवल्या? 

 राष्ट्रीय महामार्ग ६१ (NH 61) चे रुंदीकरण होणे गरजेचे आहेच, मात्र विकसित तंत्रज्ञानाचा आधार घेऊन किंवा अन्य एखादी शक्कल लढवून यातून होणाऱ्या वृक्षतोडी बाबत पर्याय काढता आला असता का? यावर देखील विचारविनिमय होणे तितकेच आवश्यक होते. परंतु यात ठेकेदार व अधिकाऱ्यांची टक्केवारी आडवी असल्याचा आरोप होत आहे. कल्याण-मुरबाड महामार्गावरील मुरबाड ते मामनोली आणि पुढे असे काही टप्पे पडून जंगलतोड माफियांनी मिळून ही वाटणी केल्याची चर्चा आहे. यातील मालिद्यामध्ये अधिकारी वर्ग केंद्रस्थानी असल्याचे बोलले जात आहे.


प्रवाशांचा मार्ग चिखलातून...

या महामार्गाच्या अनियोजित कामामुळे प्रवाशांना मोठ्या दुधारी संकटाला सामोरे जावे लागत आहे. नजरे समोर होणाऱ्या वृक्षांच्या कत्तली पाहत प्रवासी वास्तविक डोळ्यात अश्रू आणीत काळीज चर होणारा प्रवास करीत असल्याच्या प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. त्यातच, भर पावसाळी ऋतूत खोदून ठेवलेल्या महामार्गावर चालकांना अक्षरशः चिखलातून वाट काढावी लागत आहे. दुचाकी चालकांसाठी तर हा प्रवास चक्क 'मौत का कुँवा' मानला जात आहे. रस्त्यावर सूचना फलक व सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव दिसून येतो. सबब, चालकांना अनेक छोट्यामोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे रुग्णवाहिकेंचा प्रवास देखील जिकरीचे ठरत आहे.


मुरबाडमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद...

गेल्या काही वर्षांपासून वन अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मुरबाड तालुक्यात भरमसाठ वृक्षतोड सुरू आहे. याचा परिणाम म्हणून कधी नव्हे ते मुरबाड तालुक्याचा तापमान थेट उच्चांक गाठून ४० डिग्रीच्या पार गेला. मुळात, या सर्व बाबी पर्यावरण प्रेमींनी कायदेशीर पटलावर आणणे अपेक्षित आहे.


(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-Kishor K Gaikwad

वाचा...



Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments