Accused arrested by Murbad Police
बंदुकबाज अटकेत : सरळगाव गोळीबार प्रकरणात ६ आरोपी; चार जेरबंद 'हे' दोन फरार, तपासीय इतिवृत्त...
ठाणे/मुरबाड (दि. २७) : (किशोर गायकवाड) मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील बहुचर्चित गोळीबार प्रकरणातील नावे उघड झालेल्या सहा आरोपींपैकी चार आरोपी जेरबंद करण्यात मुरबाड पोलिसांना यश आले असून मुख्य आरोपी सह शस्र पुरवठा करणाऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे.
याबाबत मुरबाड पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून, दि. २ जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सरळगाव येथील डॉ. रवीशंकर पाल यांच्या पार्किंग केलेल्या ह्युंदायी ऑरा कंपनीच्या कार (क्र. एम.एच. ०३ इ.बी. ८९४६) वर अज्ञातांनी गोळी झाडली होती. यात कारच्या पुढील दरवाजाला व काचेला छिद्र पडून नुकसान झाले होते. याप्रकरणी दिनांक ४ जुलै रोजी मुरबाड पोलीस ठाण्यात (Murbad Police Station) गुन्हा रजि. क्र. १५५/२०२४ अन्वये नवीन फौजदारी कायदा भा. न्या. संहिता (BNS) २०३ चे कलम ३२४(४) सह आर्म ॲक्ट कलम ३ व २५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
घटनेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तांत्रिक माहितीच्या विश्लेषणा द्वारे तसेच गुप्त बातमीदार यांचे मार्फत तपास करून सहा आरोपींचा छडा लावण्यात मुरबाड पोलिसांना यश आले आहे. शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील सुरेश पुंडलिक ओखोरे (वय ३२ वर्ष) व भूषण ऊर्फ बबल्या पुंडलिक पवार (वय २३ वर्ष) या संशयितांना तपासाकामी मुरबाड पोलिसांनी ताब्यात घेऊन अत्यंत सावधपणे विश्वासात विचारपूस केली असता मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील गौरव रामचंद्र तुंगार (वय २२ वर्ष) व ज्ञानेश्वर ऊर्फ बाळा जयवंत साबळे यांनी हा गुन्हा केल्याचे कबुल केले. मात्र गौरव व ज्ञानेश्वर यांनी सदरचा गुन्हात मुख्य आरोपीत म्हणून सरळगावातील डॉ. रामचंद्र भोईर यांचे नाव कबूल केले असून सदर गुन्ह्यात आरोपी गौरव तुंगार याने वापरलेला गावठी कट्टा (बंदुक) हा शहापूर तालुक्यातील फर्डे धसई येथील त्याचा मित्र विजय वाघ याचेकडून आणले असल्याचे सांगितले आहे.
Weapons used in crime |
तर याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी चार आरोपींसह गावठी कट्टा (बंदूक) व गुन्ह्यात वापरलेली एफझेड दुचाकी जप्त केली असून शस्र पुरवठा करणारा व मुख्य आरोपी यांचा शोध सुरू आहे. तथापि, याबाबत मुरबाड पंचायत समितीचे सदस्य अॅड. विष्णू सदाशिव घुडे यांनी पोलिस स्टेशनला पत्र देऊन झालेल्या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला होता. ठाणे ग्रामिणचे पोलीस अधिक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली तसेच मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश शिंदे व मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांचे सूचनेप्रमाणे तपास पथक उपनिरीक्षक व्ही. एस. पवार, उपनिरीक्षक एन. पी. निंबाळकर, उपनिरीक्षक एस. जे. खतीब, पोलीस हवालदार आर. एम. शिंदे, पो. हवालदार दीपक बी. हिंदूराव, पोलीस नाईक गावडे, पोलीस नाईक देवरे, पो. ना. आगिवले, पो. ना. तडवी यांनी कौतुकास्पद कामगिरी करून अल्पावधीतच गुन्हा उघडकीस आणला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
0 Comments