संतापजनक : भाड्याच्या पोल्ट्री चाळीत आदिवासी विध्यार्थ्यांचे शिक्षण..! [ KISHOR GAIKWAD MURBAD ]

आदिवासी माध्यमिक शाळेतील विद्यार्थी

आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा, मढ

संतापजनक : भाड्याच्या पोल्ट्री चाळीत आदिवासी विध्यार्थ्यांचे शिक्षण..!

 [ KISHOR GAIKWAD MURBAD ]
ठाणे/मुरबाड : (किशोर गायकवाड) आदिवासी विद्यार्थ्यांचा स्वतंत्र रित्या शैक्षणिक विकास व्हावा या विधायक उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आश्रम शाळा उभारण्यात आल्या असून यात आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, जेवण, सुसज्ज वर्ग खोल्या व प्रतिष्ठित राहणीमानाच्या सुविधा आदींचा समावेश आहे. जेणेकरून आदिवासी समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात यावा. असे असले तरी मुरबाड तालुक्यातील धसई परिसरात असणारी मढ आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा याला अपवाद ठरली आहे.



  गेल्या अनेक वर्षांपासून येथील आदिवासी विद्यार्थांना कोंबडयांच्या खुराडयात शिक्षण घ्यावे लागत असल्याचे चित्र जैसे थे आहे. कोंबड्यांसाठी बनविण्यात आलेल्या पोल्ट्रीच्या चाळी भाडेतत्त्वावर घेऊन आदिवासी विध्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून यात शिक्षण दिले जात आहे. परिणामी येथील आदिवासी विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय या पोल्ट्री शाळेच्या चहुबाजूंनी रान क्षेत्र असल्याने जीव मुठीत घेऊन येथील विद्यार्थी शिक्षण घेतांना दिसत आहेत. प्रसंगी सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव ही येथे भासत आहे. अशा परिस्थितीत येथील आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का? या विद्यार्थ्यांना अशा भयावह परिस्थितीत शिक्षण देण्या मागे नेमका कोणाचा स्वार्थ आहे? अधिकारी, शिक्षक, की लोकप्रतिनिधी? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उद्भवत आहेत.




  सुमारे एक लाख वीस हजार रुपयां पर्यंत भाडे देऊन ही आदिवासी विद्यार्थांची शाळा भरवली जात असल्याची माहिती मुख्याध्यापक दिपक बांगर यांचे कडून समजली असून मागील दोन वर्षांपासून कोरोना संकटाच्या कारणाने विद्यार्थांना देखील शाळेत येण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु या वर्षी सर्वच ठिकाणी शाळा नियमित पणे सुरु झाल्याने पहिली ते दहावी पर्यंत ३३२ विद्यार्थी शिक्षण घेत असून यात १६८ मुले तर १६४ मुली अशी विद्यार्थी पटसंख्या असल्याची माहिती शाळेकडून देण्यात आली आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात मढ येथील आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थांची पटसंख्या असतांना सुध्दा सुसज्ज अशी शाळेची इमारत नसल्याची खंत अनेक पालक वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या स्वार्थ आणि उदासीन धोरणामुळे चक्क खुराड्यात शिक्षण घेण्याची वेळ गरीब आदिवासी विध्यार्थ्यांवर ओढवली असल्याचा आरोप संतप्त आरोप पालक वर्गकडून होत आहे.




  खुराड्याच्या आकाराच्या वर्ग खोल्या, त्यात पुरेसा उजेडाचा अभाव, वायुवीजन (Ventilation) अभावी वर्गांमध्ये नाकपुड्यांना चुरचुरणारा वास, कमकुवत भिंती, स्वच्छतेचा बोजवारा, दुर्गंधीयुक्त किचन, पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्धवट मुताऱ्या, मुलांच्या अंगावर गणवेश नाही, अवेळी भोजन अशा परिस्थितीत ही आदिवासी बांधवांची मुले शिक्षण घेत आहेत. या आश्रम शाळेची ओळख सांगणाऱ्या फलकाचेच मजकुरच अदृश्य आहेत. मात्र ही परिस्थिती प्रत्यक्ष पाहण्यासाठी तथा शालेय व्यवस्थापनाकडून खर्चाच्या रकमेचा नेमका विनिमय होतोय कुठे आणि कसा? याची पाहणी करण्यासाठी वरीष्ठ अधिकारी फेरफटका मारीत नाही का? हा प्रश्न येथे येणाऱ्या प्रत्येकास पडत आहे.


  गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी प्रकल्प विभाग या जागा मालकाचा पोट भरत असून यात दलालगिरी तर नाही ना? मढ सारख्या दुर्गम भागात एवढी मोठी रक्कम कशी व का दिली जाते? हे प्रश्न सर्व सामान्यांना अचंबित करणारे आहे. शिवाय एवढा भाडे अदा होत असतांना या विद्यार्थ्यांच्या पदरी आवश्यक सोयीसुविधांचा वानवा का? हा ही सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे. त्यामुळे आदिवासी प्रकल्पाने मढ आश्रम शाळेच्या नविन इमारती बाबत जलद पावले उचलून येथील विद्यार्थांसाठी लवकरात लवकर नवीन सोयीसुविधा युक्त इमारत बांधून द्यावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.



(फोटो : दिनेश बोटकुंडले, शशिकांत तुपे, संकेत अढाइगे)

  "ते काम मंजूर झालेलं आहे. मागच्या ऑगस्टमध्ये त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे. त्याला जागा नव्हती, जागा आता मिळाली आहे. सदर काम १६ ते १७% बीलो आहे. आठ महिन्यांनी जागा दिल्याने एवढ्या बीलो मध्ये काम करणार नसल्याचे कॉन्ट्रॅक्टरचे म्हणणे असून त्याला भाववाढ पाहिजे. सदरचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविला आहे.  तो सचिव साहेबांच्या टेबलावर आहे. तो मंजूर झाला तर कॉन्ट्रॅक्टर काम करेल नाहीतर आम्हाला नवीन टेंडर काढावा लागेल. कॉन्ट्रॅक्टरचे म्हणणे योग्य असल्याची शिफारस आमच्या मुख्य अभियंत्यांनी शिफारस केली आहे. आता नवीन टेंडर केलं तर जास्त पैसे लागणार आणि त्यालाच काम दिल तर कमी पैश्यात काम होणार."
         -श्री. प्रदीप दळवी, कार्यकारी अभियंता, सा. बां. (आदिवासी प्रकल्प विकास) ठाणे

 

  "इमारत होणार आहे. तिला प्र. मा. मिळाली आहे. इथून पुढची कारवाई पीडब्लूडी विभाग करणार आहे. सध्या ती शाळा भाडेतत्त्वावर आहे. अधिक माहिती आमचे ओ.एस. देतील."
     -श्रीम. आर. एच. किल्लेदार मॅडम, प्रकल्प अधिकारी, शहापूर


"इमारत प्रस्तावित आहे. ऑक्टोबर पर्यंत बांधकाम सुरू होऊन जाईल. पावसाळा असल्याने ते झालं नाही. टेंडर सर्व झालेलं आहे. दुर्गापूर येथील जागा आहे. फॉरेस्टने ३५ गुंठे जागा आपल्या नावावर दिलेली आहे. सध्या खासगी आहे. भाडे दोघांमध्ये देणे असून एक लाख वीस हजार रुपये आहे.  पूर्वी पोल्ट्रीसाठी असलं तरी आता त्याला शाळेचं स्रूप आणलं आहे. पोल्ट्री त्यावेळस होती आता कम्प्लिट बांधकाम झालंय."
   -श्री. दीपक बांगर, मुख्याध्यापक, आदिवासी आश्रमशाळा, मढ

 किशोर गायकवाड मुरबाड ]

वाचा...






निराशाजनक : मुरबाडच्या ऑक्सिजन पार्कची दुर्दशा..!

FOREST FOOD | खवय्यांची शेवळा भाजीला पसंती..!




असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

 


(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments