भटकंती : व्यथा रोजगाराच्या संघर्षाची..!
मुरबाड (Murbad) तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत, दुर्गम भागात पिढ्यानपिढ्या रहिवास करणारा आदिवासी (Adivasi) समाज आजही रोजगारासाठी संघर्ष करतांना दिसत आहे. ऋतूनुसार रानोमाळात निसर्गतः उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या, रानमेवा तसेच मासे इ. त्यांच्या रोजगाराचा आधार ठरला आहे. याखेरीज अंग-मजुरीची कामे जणूकाही त्यांच्या करिताच राखून ठेवली आहेत. त्यामुळे या रोजगाराच्या साधनांची भटकंती आजही या आदिवासींच्या पदरी कायम चिटकलेली भासत आहे.
आधुनिकतेच्या युगात सर्वच क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत असल्याने शिक्षणाची कास धरलेला प्रत्येक समाज आज व्यावसायिक, सरकारी तसेच खासगी अशा विविध क्षेत्रात प्रगतिपथावर पोहचला आहे. मात्र मुरबाडचा आदिवासी बांधव आजही उदरनिर्वाहासाठी रानोमाळ हिंडून आपल्या रोजगाराचा पर्याय शोधतांना नजरेस पडत आहे.
कुटुंब उदरनिर्वाहासाठी हे आदिवासी बांधव निसरड्या रानवाटा, वन्य श्वापदे, सर्प, विंचू आदींचा धोका पत्कारून जीव मुठीत घेऊन रानोमाळ भटकंती करून; दुर्मिळ व आरोग्यदायी रानभाज्या, रानमेवा बाजारपेठेत स्वस्त दरात उपलब्ध करून देतात आणि याचमुळे उच्चभ्रू नागरिकांना या रानभाज्यांचा आस्वाद घेणे शक्य झाले आहे.
परिणामी आज ही भटकंती थांबली पाहिजे व तिला योग्य दिशा दिली पाहिजे. मुरबाडच्या आदिवासी बांधवांना शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संपूर्ण क्षमतेने प्रयत्न झाले पाहिजेत.
मात्र आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी का पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले जात नाही? यामागे स्वयंघोषित उच्चभ्रूंचा स्वार्थ तर नाही ना? प्रतिष्ठेच्या ठिकाणी त्यांना रोजगार मिळण्याच्या बाबतीत त्यांचा विचार का केला जात नाही? यावर आदिवासी समाजात का कसोशीने प्रयत्न व प्रबोधन केले जात नाही? किती टक्के आदिवासी समाज आज शासकीय, राजकीय अथवा शैक्षणिक क्षेत्रात उच्च ठिकाणी आहे? ज्या दिवशी हा आदिवासी बांधव आर्थिक, सामाजिक शैक्षणिक, राजकीय दृष्ट्या सक्षम होईल तेव्हा खऱ्या अर्थी राष्ट्रची प्रगती वेग धरेल. या सर्व बाबींवर आदिवासी समाजाने स्वयंप्रेरणेने गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे व स्वतःला मुख्यप्रवाहाकडे आणलं पाहिजे; अन्यथा पिढ्यानपिढ्या त्यांच्या वाट्याला आलेली भटकंती थांबणार नाही; हे त्रिकाळ बाधित सत्यच!
【 आदिवासींच्या व्यथा..! (भाग-१) 】
[ किशोर गायकवाड मुरबाड ]
【निराशाजनक : मुरबाडच्या ऑक्सिजन पार्कची दुर्दशा..!】
【FOREST FOOD | खवय्यांची शेवळा भाजीला पसंती..!】
【मुरबाड- RTI इम्पॅक्ट | द्वितीय अपिलाच्या सुनावणीने पीडब्लूडी उपविभाग हादरले..!】
0 Comments