![]() |
शेवळा भाजी विक्री करतांना कष्टकरी महिला |
FOREST FOOD | खवय्यांची शेवळा (Shevla chi Bhaji) भाजीला पसंती..! 【 Kishor Gaikwad 】
वाचा Recipes : विविध पद्धतीने कशी बनवाल शेवळा (Shevala Bhaji) भाजी? (Recipes for Food from the Forest)
[ KISHOR GAIKWAD ]
ठाणे/मुरबाड : पावसाळी मुरबाड तालुक्यात ( Murbad Taluka ) सर्वाधिक पसंतीच्या रानभाजीचा ( Forest Vegetables ) मान आजही शेवळा ( Dragon Stalk Yam) भाजीच्या नावे नोंद असून वर्षानुवर्षे खवय्यांकडून या भाजीची मागणी वाढतच आहेत.
ही भाजी काहीशी करड्या रंगाची असून आकाराने रोपाच्या बोंड सारखी असते. जंगलात उतार भागामध्ये ही भाजी जास्त प्रमाणात मिळत असून तिला हाताने सहज काढता येते. शेवळा ( Shevala - Forest Food )( Dragon Stalk Yam) ही कंदवर्गीय वनस्पती असल्याने आपल्या विविध औषधी गुणधर्मामुळे लोक या भाजीकडे वळतात. जून महिन्यात अर्थात पावसाळ्याच्या सुरुवातीला या भाज्यांचा आस्वाद घ्यायला मिळतो. जमिनीतील एका कंदामधून शेवळा बाहेर येऊन तिला काढणे व ओळखणे सोपे जाते. असे असले तरी ही भाजी बनवण्याचे कौशल्य असणे अवश्यक आहे. ही भाजी काही गृहिणी घरामध्ये चुलीवर सुकवतात, त्यामुळे सुकलेली भाजी अनेक दिवस टिकते व खवय्यांना पावसाळ्यात अनेक दिवस खाण्यासाठी मिळते. तर काही गृहिणी ओली भाजीची भाजी बनवतात. ओली व सुकी अशी दोन्ही प्रकारची भाजी खाण्यासाठी चविष्ठ असतात. ही भाजी मांसाहरी व शकाहरी लोक मोठ्या आवडीने खातात.
"शेवळ्या काढण्यासाठी आम्हाला रानाच्या पायवाटा तुडवून आत पर्यंत जावे लागते. जंगलात साप, विंचू, काटे यांचा धोका असल्याने पायाखाली लक्ष ठेवावे लागते. शेवळी ओळखून ती व्यवस्थित जमिनीवरून काढून घ्यावी लागते. यात फार वेळ जातो. सध्या शेवळ्यांचा पीक मुबलक प्रमाणात असून ही बाजारभाव ही चांगला आहे. त्यामुळे समाधान वाटतो. मात्र अनेकदा मेहनतीचे पैसे ही हाताला लागत नाही"
-रानभाजी विक्रेत्या
कशी बनवाल शेवळा (Dragon Stalk Yam) भाजी?
RECIPES FOR FOOD FROM THE FOREST (Shevla chi bhaji)
साहित्य : शेवळ्याचे (Shevla) कंद, काकड फळे, चिरलेला कांदा, तिखट, हळद, लसूण पाकळ्या, हरभऱ्याच्या डाळीचा भरडा, तेल, मीठ, चिंच, गरम मसाला, कोथिंबीर इ.
पाककृती- हरभऱ्याची डाळ थोडी गुलाबी रंग येईपर्यंत भाजून मिक्सरवर जरासा जाडसर भरडा करावा. प्रथम शेवळा कंदावरची साल काढून, त्याचा देठाकडचा केशरी रंगाचा भाग काढून टाकावा. कंदाचे चिरून बारीक तुकडे करून स्वच्छ धुऊन घ्यावेत. नंतर तेलावर बारीक चिरलेली भाजी थोडा वेळ परतून घ्यावी. नंतर काकड फळांतील बिया काढून टाकून फळांचा रस काढावा. तेलावर बारीक चिरलेला कांदा, लसूण फोडणीला घालावा. फोडणी परतल्यावर हळद, तिखट, गरम मसाला घालून परतावे. त्यात मीठ व काकडचा रस घालावा. दोन चमचे चिंचेचा कोळ घालून थोडी वाफ आल्यावर डाळीचा भरडा घालून चांगले परतावे. चांगली वाफ येऊ द्यावी, म्हणजे भरडा थोडा सुका होतो व शिजतो. भाजी शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घालावी व तद्नंतर आपली शेवळा भाजी खाण्यासाठी तयार...
कोळंबी किंवा खिमा घालूनही बनवलेली शेवळा भाजी..!
साहित्य- शेवळाचे कंद, काकड फळे, शेंगदाणे, हरभरा डाळ, चिंचेचा कोळ, डाळीचे पीठ, गूळ, तिखट, मीठ, काळा मसाला, ओले खोबरे, हिंग, मोहरी, हळद इ.
पाककृती- शेंगदाणे व हरभऱ्याची डाळ भिजवून नंतर शिजवून घ्यावे. साल काढलेल्या कंदाचे चिरून तुकडे करावेत. ते पाण्याने धुतल्यानंतर शिजवून पाणी काढून घोटून घ्यावेत. त्यात थोडे डाळीचे पीठ घालावे. नंतर त्यात भाजीचे पाणी घालावे. चिंचेचा कोळ, गूळ, तिखट, मीठ, काळा मसाला घालून पळीवाढी भाजी करावी. ओले खोबरे घालावे. वरून तेलामध्ये हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी द्यावी. तर काही ठिकाणी ही भाजी तांदळाच्या धुवणात शिजविण्याची पद्धत आहे. अशा रीतीने शेवळा भाजी फस्त करण्यास तयार होते.
शेवळ्याच्या पानांची भाजी..!
साहित्य- शेवळ्याची कोवळी पाने, मूगडाळ, लाल मिरच्या, आमसुले, दाणेकुट, नारळ चव, गूळ, मीठ, तेल, हिंग, मोहरी, हळद, तिखट इ.
पाककृती- शेवळ्याची कोवळी पाने धुऊन बारीक चिरावीत. आमसुले पाण्यात भिजत ठेवावीत. तेलाच्या फोडणीत लाल मिरच्या व मूगडाळ घालावी. थोड्या वेळाने चिरलेली पाने घालावीत. नंतर आमसुलाचा कोळ घालावा. मीठ, तिखट, गूळ घालून भाजी शिजवावी, नंतर दाणेकूट व नारळचव घालावा. ही तयार झालेली भाजी भात, भाकरी, चपाती बरोबर चविष्ठ लागते.
![]() |
Forest Food Plant |
सुकलेली शेवळी भाजी..!
पाककृती- शेवळी भाजी आणल्यानंतर प्रथम ही भाजी लहान-लहान कापुन घेतल्यानंतर पाण्यात मिठ घालुन अर्धा एक तास शिजवली जाते.त्यानंतर शिजलेल्या भाजीतील पाणी बाहेर टाकले जाते. व फक्त शेवळा भाजी चुलीवर किंवा उन्हात सुकण्यासाठी ठेवली जाते.दोन तीन दिवस ही भाजी सुकवली जाते.नंतर ही सुकलेली भाजी अनेक दिवस खाण्यासाठी ठेवली जाते. ही सुकी शेवळा भाजी शिजवतांना तेल,कांदा किंवा लसुन यामध्ये टाकुन तव्यावर परतुन घेतली जाते. अर्धा तास तव्यावर किंवा पातेल्यात शिजवल्यानंतर रस्यासह व सुकी अशा दोन्ही प्रकारची शिजवली जाते.
[छायाचित्रे- शशिकांत तुपे, दिनेश बोटकुंडले, मुरबाड]
[ किशोर गायकवाड ]
【FOREST FOOD | खवय्यांची शेवळा भाजीला पसंती..!】
【मुरबाड- RTI इम्पॅक्ट | द्वितीय अपिलाच्या सुनावणीने पीडब्लूडी उपविभाग हादरले..!】
असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा


0 Comments