अपघात प्रवण क्षेत्र : प्रवाश्यांनो, कल्याण मार्गे प्रवासा आधी जीवन विमा नक्की उतरवा... वस्तुस्थिती..? [ KISHOR K. GAIKWAD MURBAD ]


अपघात प्रवण क्षेत्र : प्रवाश्यांनो, कल्याण मार्गे प्रवासा आधी जीवन विमा नक्की उतरवा... वस्तुस्थिती..?

[ KISHOR K. GAIKWAD MURBAD ]
ठाणे/मुरबाड : (किशोर गायकवाड) राष्ट्रीय महामार्ग ६१ वर ( NH 61 ) पाचवा मैल ते म्हारळ सोसायटी दरम्यान मोठ्याप्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून या प्रवासाला प्रवासी अक्षरशः त्रस्त झाले आहेत.


  कल्याण ( Kalyan ) दिशेचा हा मार्ग वाहतूकीच्या दृष्टीने मुरबाडसाठी अत्यंत महत्त्वाचा व मुख्य मार्ग मानला जातो. मुरबाड तालुक्यातून शेकडो प्रवासी, चाकरमानी, विद्यार्थी यामार्गे दैनंदिन प्रवास करत असतात. कल्याण ते मुरबाड ( Kalyan Murbad ) सुमारे ३० किमीचा प्रवास असून जेमतेम ४० मिनिटे कालावधी या प्रवासाला अपेक्षित आहे. परंतु मुरबाडपासून २२ किमीवर असणाऱ्या पाचवा मैल येथून ते थेट म्हारळ थारवानी सोसायटी पर्यंतचा संपूर्ण रस्ता उखडल्याने प्रवासाच्या वेळेत चक्क दुपटीने वाढ झाली आहे. त्यातच या भागात रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने ट्राफिक ही भरमसाठ होत आहे. परिणामी प्रवाशांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून दुसरा पर्याय नसल्याने प्रवासी गपगुमान प्रवास करतांना पाहायला मिळत आहेत.


कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१


  पाचवा मैल ते म्हारळ ( Pachava Mail Shiv mandir to Mharal ) या सुमारे साडेतीन किलोमीटर रस्त्यावर पडलेले खड्डे, साचलेले पाणी तसेच चौपदरीकरणचे प्रस्तावित प्रलंबित काम यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन एक ते दीड तास वाहनात बसावे लागते. तर चालकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. त्याच प्रमाणे वाहतूक कोंडीमुळे वाढीव इंधनाचा खर्च ही सोसावा लागत आहे. सबब या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे कल्याण-मुरबाड प्रवास महागला असून मोठ्याप्रमाणात वेळेचा अपव्यय होत असल्याचे प्रवाशी सांगत आहेत. शिवाय यामार्गे प्रवास करतांना शरीराची हाडे पुरता खिळखिळीत होऊन वाहनांच्या मेंटेनन्सचा भुर्दंड ही खिशाला पडत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

NH 61



  छोटेमोठे व्यापार, उद्योगधंदे तसेच भाजीपाला व अन्य वाहतूक याच मार्गावर अवलंबून आहे. तसेच कल्याण, भिवंडी, ठाणे, मुंबई ते अहमदनगर, औरंगाबाद, जालना, पैठण असे मोठमोठे तालुके-जिल्हे या मार्गाने जोडले असून दररोज हजारो वाहने या मार्गावरून वाहतूक करीत असतात. परंतु या वाहनचालकांना याच खड्यांतून आपली वाहने नेल्या खेरीज पर्याय नाही.



  रुग्णांना ने-आण करणाऱ्या ऍम्ब्युलन्ससाठी देखील हाच मार्ग आहे. मुरबाडवरुन प्रसूती महिला रुग्ण, गंभीर अवस्थेत असलेले रुग्ण यांना याच  यामार्गावरून नेले जात असते. मात्र या खड्ड्यांमुळे एखादी अनपेक्षित हानी उद्भवल्यास जबाबदार कोण? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.



  दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती प्रवाश्यांपुढे उभी ठाकते. कोणीही याबाबत लक्ष देत नाही. हजारो रुपये टॅक्स भरुनही सुरक्षित प्रवासाची हमी नसल्याने वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी नेमकं करताय काय? हा संशोधनाचा विषय बनला आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी या खड्ड्यांनी एका दुचाकीस्वराचा बळी घेतल्याची घटना वृत्तपत्रात छापून आली होती. मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेल्याचे दिसत नसून प्रशासन या खड्ड्यांकडून आणखीन कोणत्या मोठ्या हानीची अपेक्षा करतोय का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे  प्रवाश्यांनी कल्याण मार्गे प्रवास करण्याआधी जीवन विमा उतरवून या अपघात प्रवण क्षेत्रातून प्रवास करण्याचे आवाहन केले जात आहे. तर राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदरचा रस्ता जलदगतीने बनवावा, अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे.



 किशोर गायकवाड मुरबाड ]

वाचा...









   


असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

 


(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


0 Comments