#Deep Fraud? | Murbad : तुमच्या ही गावातील घरकुल यादीत घोळ झाला आहे का? Kishor Gaikwad

DEMO HOUSE


Deep Fraud? | Murbad : तुमच्या ही गावातील घरकुल यादीत घोळ झाला आहे का?

[ KISHOR K. GAIKWAD MURBAD ]
ठाणे/मुरबाड : ( किशोर गायकवाड ) आपल्या गैर-कारभारासाठी कायम कुप्रसिद्ध असणारी मुरबाड पंचायत समिती ( Murbad Panchayat Samiti ) आता पुन्हा नव्याने घरकुल यादीच्या घोळामुळे वादग्रस्त चर्चेत आली आहे.

  सन २०२०-२२ या वर्षात मुरबाड तालुक्यात मंजूर करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या ( Pantpradhan Avas Yojana ) यादीमध्ये मोठ्याप्रमाणात घोळ झाला गरजू, गरीब व पात्र लाभार्थ्यांना डावलून चक्क धनदांडगे, नोकरदार, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांना घरकुल योजनेत प्रथम प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप समाजसेवक मंगल डोंगरे यांनी केला असून याबाबत सर्वेक्षणात झालेल्या हलगर्जीपणाची चौकशी करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे मुरबाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचेकडे केली आहे. तसेच सदरची मंजूर यादी स्थगित करावी व चुकीचे सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून पुन्हा नव्याने यादी तयार करण्याची मागणी ही त्यात करण्यात आली आहे.

Panchayat Samiti, Murbad

   मुरबाड तालुक्यात ( Murbad Taluka ) कष्टकरी, कामगार, भूमिहीन, बेघर, अशा लोकांची संख्या मोठी असताना वंचित, पिडीत, विधवा, विधुर, परितक्त्या, गरीब व गरजू लाभार्थ्यांना डावलून सदरची यादी तयार केली असून त्यात विविध राजकीय पक्षांचे  पुढारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, नोकरदार तसेच एकाच घरात, कुटुंबात एकापेक्षा अनेक जणांना लाभ दिल्याचे डोंगरे यांनी सांगितले आहे. वंचित घटक या योजनेपासून दुर फेकल्याच्या अनेक तक्रारी पंचायत समितीत आल्या असून त्यावर कोणतीच उपाय योजना नसल्याचे जबाबदार अधिकाऱ्यांकडून डोंगरे यांना सांगण्यात आले. याशिवाय सदर योजनेत आमचा काहीच संबंध येत नसल्याचे गटविकास अधिकारी रमेश अवचार व विद्यमान सभापती स्वराताई सचिन चौधरी यांचे उत्तर डोंगरे यांच्या पदरी पडले आहे. आॕनलाईन पात्र यादीतील लाभार्थी निवडीचे अधिकार ग्रामसभेला दिले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले असून ज्यांच्याकडे सुस्थितीतील दोन दोन घरे, जमीन मालमत्ता, नोकरी, असणाऱ्या तथा एकाच घरात तीन-तीन जणांना कुठल्या आधारावर घरकुले दिली गेली? असा सवाल डोंगरे यांनी उपस्थित केला आहे.

  यामुळे अशा घटकांना घरकुल योजनेचा  प्रथम प्राधान्याने लाभ मिळावा, यासाठी पत्रकार तथा समाजसेवक मंगल डोंगरे यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून, सध्याची  मंजूर यादी स्थगित करून चुकीचा सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी व नवीन यादी बनवून पात्र लाभार्थी, गरीब गरजू घटकांना न्याय द्यावा, अशी मागणी गटविकास अधिकारी रमेश अवचार  यांचेकडे केली आहे. मात्र गोरगरिबांना न्याय न मिळाल्यास आम्हाला प्रशासनाच्या विरोधात विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन व उपोषणा सारखे हत्यार उपसावे लागेल, असा इशाराही सदर पत्राद्वारे देण्यात आला आहे. 

तक्रारी अर्ज

   याप्रकरणी पंचायत समितीची पुढील भूमिका विचारण्यासाठी गटविकास अधिकारी रमेश अवचार यांना अनेकदा संपर्क केला असता कॉल उचलला नाही. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच संशयास्पद झाले आहे. तर मंगल डोंगरे यांच्या निवेदनामुळे मुरबाड पंचायत समितीला खडबडून जाग आली असून या गैरप्रकारामुळे तालुक्यातील सामान्य जनतेत प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

  "तालुक्यातून अनेक ग्रामपंचायत मधून नागरिकांनी लेखी तक्रारी केल्या असून रामदास चौधरी, पुंडलिक मारुती कंटे, दत्तात्रय चौधरी यांच्या तक्रारीना प्रशासना कडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. ज्यामध्ये आंबेटेंभे, कळमखांडे गावात सदन कुटुंबातील  दोन दोन लाभार्थी, चिरड येथे ही हाच प्रकार घडला असल्याची तक्रार दाखल आहे. उलटपक्षी या तक्रारींची कुठलीच चौकशी न केल्यामुळे भ्रष्टाचाराला अभय मिळत आहे."     
      -श्री. मंगल डोंगरे, तक्रारदार तथा सामाजिक कार्यकर्ते

 किशोर गायकवाड मुरबाड ]




   


असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

 


(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

 

0 Comments