![]() |
चोरीला गेलेली जनावरे |
#MURBAD | शेतकऱ्यांनो सावधान : जनावरे रानात चरायला सोडता? तर ही बातमी नक्की वाचा..!
शेतकरी (Farmer) लाखों रुपये मोजून ही जनावरे विकत आणतात. मोठ्या मेहनतीने त्यांचे संगोपन करतात. मात्र ऐन उत्पादन प्राप्तीच्या वेळी घात लावून बसलेले चोरटे ही जनावरे अत्यंत शिताफीने लंपास करतात. त्यामुळे मुरबाडचा शेतकरी या प्रकारांमुळे हवालदिल झाला असून दुग्धव्यवसायास हात जोडीत आहे. हे सत्र थांबले नाही तर मुरबाड तालुक्यावर (Murbad Taluka) दूध आयात करण्याची परिस्थिती निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही, असे मत जाणकार मंडळी व्यक्त करीत आहेत.
मुरबाड तालुक्यातील पवाळे, नानकस वाडी, भालुक, कोलठण परिसरात रात्रीच्या सुमारास जनावरे चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने या परिसरात पोलीस गस्तपथक चालू करण्याची मागणी पोलीस मित्र गीतेश पवार यांनी दिनांक १४ जुलै रोजी एका निवेदनाद्वारे केली होती.
![]() |
गस्त पथक चालू करण्याबाबत निवेदन |
सततच्या जनावरांच्या चोरीने मुरबाडच्या दूध उत्पादकांना मोठ्याप्रमाणात आर्थिक फटका बसला असून शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे या चोरांचा शोध घेऊन संबंध टोळीला जेरबंद करण्याची मागणी शेतकरी वर्गकडून जोर धरत आहे. वर्षभरात मुरबाड ग्रामीण परिसरात जनावरांच्या चोरीमध्ये वाढ झाली आहे. एकट्या पवाळे गावातील शेतकरी हरीचंद्र रामचंद्र पवार यांची एक गाभण व एक दुधाळ अशा दोन म्हशी, एक रेडा व एक पारडी तर बाळकृष्ण पवार यांची एक गाभण म्हैस गेल्या महिनाभरा पासून ही जनावरे बेपत्ता आहेत. दिनांक ०१ जून रोजी त्यांना नेहमीप्रमाणे रानात चरायला सोडण्यात आले होते. तसेच नानकसवाडी-नारायण पाडा येथील शेतकरी भिमा पांडू भला यांचा एक बैल, एक गाय व दोन वासरे तसेच गोपाळ नारायण भला यांचा एक बैल इ. जनावरे गायब आहेत. त्यांचा खूप शोध घेतला मात्र सापडत नसून सदर जनावरे कत्तलीसाठी चोरून नेल्याचे अनुमान शोध कार्या दरम्यान पवार यांना स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले.
लाखों रुपये किंमतीची ही जनावरे अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली असून चारही बाजूंच्या गावातील रान परिसर पालथा घालून ही जनावरे शेतकऱ्यांना सापडली नाहीत. पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेऊन चोरीस गेलेली जनावरे शेतकऱ्यांना मिळवून द्यावी व दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी न्यायिक मागणी आता दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. मुरबाड तालुक्यातील जनावरे चोरीचे हे सत्र जर थांबले नाही तर मुरबाडकरांना कृत्रिम दुधावर अवलंबून राहिल्या खेरीज गत्यंतर उरणार नाही.
"कोलठण, शिंदी पाडा, टेंभरे, पावशे पाडा, रायते, वेलदेवादी नानकसवाडी, शिरोसी पाडा, डेहणोली, पडाले, पारतले, गेगाव, असणोली, किन्हवली, सोगाव, भादाणे, माल्हेड, शिवळे, खांदारे, कलमखांडे, खाटेघर, मानिवली अशी २५ ते ३० गावे पालथी घातली. माहिती मिळेल त्याठिकाणी पोहचलो. परंतु आमची जनावरे भेटली नाही. गुरे चोरट्यांचाच हा डाव असेल, असे गावागावात आम्हाला सांगण्यात आले. आमची गुरे भेटली नाही तर कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल."-श्री. हरीचंद्र रामचंद्र पवार, दुग्ध उत्पादक शेतकरी, पवाळे
[ किशोर गायकवाड मुरबाड ]
(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)
0 Comments