
Citizen of Tulai village of Murbad Taluka
मुरबाड | तुळई गावाची जिल्हा परिषद शाळा भरवली पंचायत समितीच्या दारात..!
मुरबाडच्या सभापतींचा पंचायत समितीला घरचा आहेर?
[ KISHOR GAIKWAD MURBAD ]
मुरबाड : (दि. १०) तालुक्यातील तुळई गावात शिक्षकां अभावी जिल्हा परिषद शाळा थेट मुरबाड पंचायत समितीच्या (Panchayat Samiti, Murbad) दारात भरविण्यात आल्याची शोकांतिका सोमवारी समोर आली असून यानिमित्ताने शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. तर तुळई गावच्या ग्रामस्थ असलेल्या मुरबाड पंचायत समितीच्या सत्ताधारी भाजपा पक्षाच्या सभापती स्वरा सचिन चौधरी या आंदोलनात नेतृत्वस्थानी दिसून असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळा अखेरच्या घटका मोजत असल्याच्या तक्रारी समोर येत असताना त्यालाच हवाला देणाऱ्या घटनेची प्रचिती मुरबाडमध्ये दिसून आली. तुळई गावच्या जिल्हा परिषद शाळेला शिक्षक नसल्याने शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर आला असून तुळईच्या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी फरफट सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शिक्षण विभागाच्या वेळकाढू कारभाराला कंटाळून संयमाचा बांध फुटल्याने तुळईच्या जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांनी नाईलाजाने पंचायत समितीच्या दारात आपली शाळा भरवली. यावेळी पंचायत समितीच्या विद्यमान सभापती स्वरा सचिन चौधरी, जेष्ठ सेना नेते बाळाभाऊ चौधरी, ग्रामस्थ सुभाष जाधव, सरपंच, उपसरपंच तसेच अन्य ग्रामस्थ आदींच्या नेतृत्वाखाली सदर शिक्षण हक्क ठिय्या आंदोलन करण्यात आले.
तर थेट सभापतींना स्वतःच्या गावातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून स्वतःच्याच दालना बाहेर शाळा भरवून नेतृत्व करण्याची नामुष्की ओढवली? यातून एवढं सिद्ध होत की, पक्षातील तालुका स्तरावरील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांना लोकहितवादी निर्णयांसाठी पक्ष श्रेष्ठींवर अवलंबून राहावे लागते. तर उच्च पदस्थ असतांना ही पक्षात किती प्रभाव आहे? याची अनुभूती यानिमित्ताने येत असल्याची चर्चा आहे. मात्र शैक्षणिक आंदोलन आपल्याच गावातील लोकांचा असल्याने नाईलाजाने औपचारिकता म्हणून सभापती यांनी जड अंतकरणाने या आंदोलनाला हजेरी लावल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार हास्यास्पद किंबहुना संतापजनक म्हणून चर्चिला जात आहे. परंतु या सर्वात शालेय विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे शिक्षण विभाग लक्ष देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
"तुळई येथील शाळेमध्ये दोन पदवीधर शिक्षक रिक्त आहेत. तर ती मागणी आम्ही दोन महिन्यापूर्वी केली होती. तसेच शाळेची इमारतीची मागणी ही आम्ही केली होती. पण निधी नसल्यामुळे त्या खोल्यांचा प्रस्ताव मंजूर झालेला नाही. शिक्षकांच्या बदलीचे दहा टक्के अधिकार सभापतींना द्यावे, अशी आमची आयुक्तांकडे मागणी आहे."
-स्वरा चौधरी, सभापती पं. स. मुरबाड तथा ग्रामस्थ तुळई
"तुळई शालेय शिक्षण समिती ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने अपुऱ्या वर्ग खोल्या, अपुरा शिक्षक वर्ग, याबाबत आम्ही सहा महिन्यापासून मागणी करत असताना पत्रव्यवहार करून देखील दखल घेतली गेली नाही. म्हणून आम्ही समिती, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी आदींनी हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे."
-बाळाभाऊ चौधरी, जेष्ठ सेना नेते तथा ग्रामस्थ तुळई
-किशोर गायकवाड
_____________________________________________
वाचा...
[ मुरबाड | तुळई गावातीची शाळा भरवली पंचायत समितीच्या दारात..! ]
[ #Annihilation Of Caste : आंतरजातीय विवाह योजनेला 'फुल्लस्टॉप'? ]
[ संघर्षाचं सोनं : अन् जय हिंद अकॅडमीच्या 'प्रिया'ची MSF मैदानात 'जय' ]
[ आनंदवार्ता : नगरपंचायतीच्या दुर्लक्षित वाड्यांनी टाकली कात..! ]
[ POLICE ON ACTION MODE : सेंटरिंग प्लेट्स चोर मुरबाड पोलिसांच्या जाळ्यात..! ]






0 Comments