![]() |
Missing Child Poster |
Missing News: ४ महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या 'त्या' लेकराचं काय झालं?
[ KISHOR K. GAIKWAD MURBAD ]
ठाणे/मुरबाड : (दि. ५) मुरबाड शहरातून सुमारे दोन वर्षांपूर्वी हरवलेल्या एका चिमुकलीचा अद्यापही तपास लागला नसतांना चार महिन्यांपूर्वी पुन्हा त्या घटनेची पुनरावृत्ती घडल्याने मुरबाड शहरात भीतीचे वातावरण आहे.
![]() |
Missing Boy Kartik Singh |
दि. ४ एप्रिल रोजी मुरबाड शहरातून (Murbad City) बेपत्ता झालेल्या कार्तिक रणजित सिंह या १२ वर्षीय चिमुकल्याला काल चार महिने पूर्ण झाले असून त्याचा शोध मुरबाड पोलिस (Murbad Police) करत आहेत. कार्तिकला एक लहान बहीण असून वडील एमआयडीसीमध्ये कामगार आहेत, तर आई गृहिणी आहे. अशीच दि. १४ जून २०२० रोजी शहरातील सोनारपाडा येथून रिया राकेश तिवारी नावाची अवघी ५ वर्षीय चिमुकली भर दिवसा बेपत्ता झाली होती. तिचा आज पर्यंत तपास लागला नाही. बेपत्ता झालेली दोन्ही ही मुले उत्तर भारतीय आहेत. त्यामुळे पर प्रांतिक मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून मुरबाडमध्ये परप्रांतीय मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीचा वावर तर नाही ना? असा अंदाज यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
![]() |
Missing FIR |
रिया नंतर आता कार्तिक, अशा आणखीन किती घटना पाहायला लागणार आहेत? असा सवाल आता मुरबाडकर करत आहेत. भर दिवसा या घटना मुरबाडमध्ये घडत आहेत. चिमुकल्या रियाची आई आजही तिच्या प्रतीक्षेत दरवाज्यात डोळे लावून बसलेली पाहायला मिळत असते. तर कार्तिकची आई गेल्या चार महिन्यांपासून संपूर्ण शहर पायदळी तुडवून आपल्या लेकराचा शोध घेतांना नजरेस पडते.
अचानक बेपत्ता झालेली ही लेकरं नेमकी गेली कुठे असावीत? कोण्या टोळीने तर पळवून नेली नसावीत? नेमकं काय झालं असेल त्यांचं? असे शेकडो निरुत्तर प्रश्न मुरबाडकरांना पडले आहेत. या घटनेनंतर मुरबाडमध्ये भीतीचे वातावरण कायम असून पालकांनी आपल्या पाल्याची जबाबदारी घेण्याची आवश्यकता आहे. तर मुरबाड पोलिसांनी उच्च स्तरावरील यंत्रणा वापरून या बेपत्ता मुलांचा लवकरात लवकर शोध घ्यावा व अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याबाबत उपाययोजना आखावी, अशी मागणी होत आहे.
"कार्तिकचा शोध सर्व स्तरावर सुरू असून त्यांचे फोटो व माहिती महाराष्ट्रातील जवळपास सर्वच सार्वजनिक ठिकाणांवर पोहचविण्यात आली आहे. चाईल्ड ट्रॅक नेटवर्कच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू आहे. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील शेल्टर हाऊस, ऑरफन हाऊस व अन्य संभाव्य ठिकाणी त्याचे फोटो, वर्णन व इतर आवश्यक माहिती पोहचली जाऊन त्याबाबत सातत्याने चौकशी सुरू आहे. तरी याबाबत कोणालाही काही माहिती असल्यास त्यांनी मुरबाड पोलिसांना सहकार्य करावे."
-अनिल सोनोने (सहाय्यक पोलिस निरीक्षक, मुरबाड पोलिस स्टेशन)
[ किशोर गायकवाड मुरबाड ]
0 Comments