Big Breaking : MSEB च्या विद्युत तारांना चिटकून मुरबाडच्या वीज कर्मचाऱ्यांचा मृत्यू..!
[ KISHOR K. GAIKWAD MURBAD]
ठाणे/मुरबाड (दि. २२) : (किशोर गायकवाड) मुरबाड शहराच्या हद्दीलगत असणाऱ्या घुट्याची वाडी येथील वीज वितरण कंपनीच्या एका ट्रान्सफॉर्मरवर आज सायंकाळच्या दरम्यान एक व्यक्ती चिटकून मृत पावल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले असून याबाबत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीवरून, सदर मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव बाबू पवार असून तो वीज वितरण कंपनीचा कर्मचारी असल्याचे समजते. तसेच तो मुरबाड तालुक्यातील माल्हेड गावचा रहिवासी असल्याची माहिती चर्चेतून समोर आली आहे. मुरबाड वीज वितरण कंपनीच्या कार्यालया (Murbad MSEB) पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या घुट्याची वाडी येथील ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीच्या कामा दरम्यान ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
![]() |
MSEB OFFICE MURBAD |
कुडवली येथेच एमएसइबीचे सबस्टेशन असून त्या जवळ ही घटना घडली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी मुरबाड वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली. सदर घटनेचे फोटो सोशियल मिडियावर व्हायरल होताच प्रशासन खडबडून जागे झाले. मात्र जबाबदार अधिकारी वर्गाकडून अद्याप कोणतीही खात्रीपूर्वक माहिती देण्यात आली नाही. व्हायरल करण्यात आलेल्या फोटोमध्ये सदर कर्मचारी याला कोणत्याही स्वरूपाची सुरक्षिततेची उपकरणे प्रदान केली नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सुमारे पावणे दोनशे किलोमीटरपेक्षा अधिक विद्युत तारांचे जाळे मुरबाड तालुक्यात असून अपुऱ्या वीज कर्मचारी संख्येमुळे नागरिकांच्या तक्रारींचा खच वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात पडलेला पाहायला मिळतो. त्यामुळे आहे त्या कर्मचारी वर्गावर अतिरिक्त कामाचा भार लादला जातो. त्यातच एम. एस. इ. बी. कडून कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची उपकरणे दिली जात नसल्याने कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून दुरुस्तीची कामे करावी लागतात. परिणामी अनेक कर्मचारी अशा अपघाती घटनेचे बळी ठरल्याचे वास्तव समोर येत असते.
तर सदर प्रकरणात मृत कर्मचाऱ्याच्या मृत्यूचा नेमका कारण काय आहे? सदर घटनेला नेमकं दोषी कोण? या सर्व गोष्टींचा उलगडा होऊन मृतकाच्या पीडित कुटुंबियांना न्याय मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
[ किशोर गायकवाड मुरबाड ]
असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा



0 Comments