भाग - २ | शेतकरी सहकारी संघाच्या भात खरेदी पसाऱ्याने घेतला वळण...
सविस्तर : नवीन भाताची या' ठिकाणी व्यवस्था; वाचा शेतकऱ्यांची व्यथा!
ठाणे/मुरबाड : (भाग १ वरून) सन २०२१ मध्ये अवकाळी पाऊसाने हजेरी लावल्याने मुरबाड शहरातील बाजार समितीच्या मैदानातील बराचसा भात भिजला होता. सदर भात वाचविण्यासाठी प्लास्टिक ताडपत्री वापरून पोती झाकण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न देखील निष्फळ ठरला होता. याबाबत शब्द मशालने वृत्त प्रसारित केले होते. मात्र झालेल्या नुकसानीचे शेतकरी संघाला काहीही सोयरसुतक नसल्याचे भासत आहे.
![]() |
सन २०२१ मध्ये पाऊसाने भिजलेला भात |
आजमितीला सुमारे ८० हजार क्विंटल पर्यंत भात खरेदी करण्यात आला असून अजूनही भात खरेदी सुरू आहे. तसेच उघड्यावरील भाताची समस्या असल्याने त्याकरीता गोदामे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आल्याचे मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन किसन गिरा यांनी सांगितले. आतापर्यंत सुमारे ५,३०० हून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून त्यापैकी हजारो शेतकऱ्यांचे भात खरेदी करणे अद्याप शिल्लक आहे. तर नोंदणीची मुदत दि. २९ फेब्रुवारी पर्यंत असून त्याकरिता नुकताच काकडपाडा येथे जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. शासन २ रुपये ४० पैसे प्रति क्विंटल दराने केवळ दोन महिन्यां करीता भाडे देत असते. मागील वर्षी शेतकऱ्यांकडून १ लाख २ हजार क्विंटलपर्यंत भात खरेदी करण्यात आला होता. रुपये २,१८३/- प्रति क्विंटल प्रमाणे शेतकऱ्यांना हमीभाव दिला जातो, अशी माहिती चेअरमन गिरा यांनी दिली.
![]() |
कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील धान्य साठा |
परंतु शेतकरी बांधवांना आपला नंबर येईपर्यंत मोठा धीर धरावा लागत आहे. पहाटे अथवा रात्रीच येऊन वजन काट्यावर आपली वाहने भल्यामोठ्या रांगेत प्रतीक्षेत ठेवावी लागतात. या सर्वात बऱ्याचदा पूर्ण दिवस अपुरा ठरतो. शिवाय वाहतूकीच्या खर्चाचा भुर्दंड देखील शेतकऱ्यांना सोसावा लागतो.
![]() |
भात वाहतूक करणारे वाहन |
मुरबाड तालुक्यात (Murbad Taluka) एवढ्या मोठ्याप्रमाणात भात खरेदी होत असल्याने या कारभारात अनेक एजेंट माफियांची घुसखोरी झाल्याचे बोलले जात आहे. तर सन २०२०-२१ सालातील ५२५ शेतकऱ्यांचे बोनसचे पैसे व भाताच्या गोणी संदर्भात शेतकऱ्यांना न्याय मिळण्याकरिता उपोषणकर्ते रमेश हिंदुराव यांनी आपल्या सहकाऱ्यां सोबत नागपूर येथे उपोषण केले होते. मात्र गेली २५ वर्षे संघ भात खरेदी करत असून त्यांना अजूनही या भातासाठी सुसज्ज गोदामांची व्यवस्था का करण्यात आली नाही? असा सवाल उपोषणकर्ते रमेश हिंदुराव यांनी शब्द मशालशी बोलतांना केला आहे. तर याबाबत लेखी तक्रार मंत्रालयात करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
-किशोर गायकवाड
वाचा...
आदिम वार्ता : वाह! वीटभट्टीवरील लेकरांच्या हाती आली पाटी पेन्सिल [KISHOR GAIKWAD]
0 Comments