आदिम वार्ता : वाह! वीटभट्टीवरील लेकरांच्या हाती आली पाटी पेन्सिल
सेवा संस्थेचा पुढाकाराने वीटभट्टीवर उपेक्षितांसाठी भरली शाळा
[KISHOR GAIKWAD]
मुरबाड : (किशोर गायकवाड) पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित होणाऱ्या वीटभट्टीवरील कामगार कुटुंबियांच्या मुलांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न आता काही अंशी मार्गी लागताना दिसत असून मुरबाडमध्ये या अभियानाला सुरुवात झालेली दिसून येत आहे.
रोजंदारीसाठी वीटभट्टीवर बहुतांशी आदिवासी कुटुंब स्थलांतरित होत असतात. त्यातच या कुटुंबीयांचा वर्षातील मोठा कालावधी याकामात निघून जातो. मात्र अशात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न अनेक वर्षांपासून खितपत पडलेला होता. परंतु आता ही आदिवासी मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभाग व सेवा संस्था अर्थात 'सोशल एम्प्लॉयमेंट अँड व्हॉलंटरी असोशिएशन' (SEVA) यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्थलांतरित वीटभट्टी कामगार यांच्या मुलांसाठी शिक्षा अभियान' राबविला जात आहे.
या अभियाना अंतर्गत मुरबाड तालुक्यातील (Murbad Taluka) शिरवली येथील जगदीश हिंदुराव यांच्या वीटभट्टीवर सुमारे २४ विध्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. तसेच नढई, पोटगाव, घोरले येथे देखील हा अभियान राबविला जात असून एकूण ६० विध्यार्थी या प्रोजेक्टमध्ये समाविष्ट केल्याचे सेवा संस्थेच्या कम्युनिटी सोशियल वर्कर (CSW) तथा शिक्षिका रोहिणी चौधरी यांनी शब्द मशालशी बोलतांना सांगितले. तसेच इयत्ता १ ते ७ वी पर्यंत विद्यार्थ्यांना सेवा संस्थे मार्फत प्राथमिक शिक्षण दिले जात असून त्याकरिता शैक्षणिक साहित्य देखील संस्थे तर्फे दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
"स्थलांतरित वीटभट्टीवरील कामगार यांच्या मुलांसाठी आम्ही त्यांना वीटभट्टीवर जाऊन शिकवतो. तसेच मुलांना आम्ही शाळेत देखील दाखल केलेले आहे. सेवा संस्थे अंतर्गत स्थलांतरित वीटभट्टीवरील कामगारांच्या मुलांना शिकविण्याचे काम मुरबाड, भिवंडी आणि शहापूर मध्ये सुरू आहे. याव्यतिरिक्त बाल तस्करी, बाल मजुरी, बाल विवाह तसेच बाल लैंगिक शोषण यांचे विरोधात सेवा संस्था सन २०१३ पासून काम करत आहे."
-रोहिणी चौधरी, CSW (SEVA संस्था)
-किशोर गायकवाड
वाचा...
आदिम वार्ता : वाह! वीटभट्टीवरील लेकरांच्या हाती आली पाटी पेन्सिल [KISHOR GAIKWAD]
0 Comments