पाणीटंचाईचा शाप!|Curse of water scarcity
"माझा तालुका या पाणी टंचाईच्या शापातून कधी मुक्त होईल?" ...अंगाची लाहीलाही करणाऱ्या रखरखत्या उन्हात डोक्यावर हांडे व कमरेवर कळश्यांचं ओझं घेऊन पाण्याच्या शोधार्थ धावणाऱ्या महिलांकडे पाठमोऱ्या नजरेने जेव्हा पाहत असतो, तेव्हा आपसूकच हा प्रश्न माझ्या डोळ्यांपुढे येऊन मला अस्वस्थ करतो! दशकोंदशके खितपत पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर नेमके हरवलंय तरी कुठे? उन्हाळ्याची चाहूल लागताच महिलांच्या डोक्यावर हंड्यांचा ओझा वेताळासारखा चढून बसतो आणि सुरू होतो तो पाण्यासाठीचा संघर्ष!
उन्हाळा आणि मुरबाड (Murbad) तालुक्यातील गावोगावचं हे चित्र; तसं जुनंच समीकरण आहे... वाढत्या तापमाना सोबत दिवसागणिक तहान आणि पाण्याचे #अंतर ही वाढत जाते... आणि वाढत जाते ती यांची पायपीट..!
कोट्यवधींची उलाढाल होणाऱ्या या मुरबाड तालुक्यात अद्याप ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना या समीकरणाची उकल काढता आली नाही. फक्त यातील आर्थिक लसावी आणि मसावी वाटून खाण्याचा काम ते नेटाने करीत आल्याचा आरोप नाकारता येणार नाही?
२०० हुन अधिक महसुली खेड्या-वाड्या-पाड्यांनी आकारास आलेल्या या ऐतिहासिक मुरबाड तालुक्यात हातापायांच्या बोटांवर मोजता येणाऱ्या गावांना सोडले तर उर्वरित गावे आज ही पाण्यासाठी तडफडत आहेत. हे जिवंत चित्र पाहण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार नाही. माळ, शिरोशी, तळेगाव, मेर्दी येथील आदिवासी बांधवांची लेकरं तर कायम उन्हाळ्यात अंगा खांद्यावर हंडे-कळश्या घेऊन रस्त्यावरून धावतांना दिसतील. माळशेजच्या पायथ्याशी असणाऱ्या अनेक गावांच्या तक्रारी ही वेगळ्या नाहीत. बर हे विश्लेषण झाले खोंड्याच्या परिसरातले. मात्र मुरबाड शहरापासूनच्या १५-२० किलोमीटरच्या क्षेत्रात ही होणारी ससेहोलपट काही वेगळी नाही.
खोपीवली ते थेट महाज, मांडवत, अल्याणीची वाडी ही गावे आजही पाण्यासाठी जणू नवसच करीत असल्याचे भासते. कळंबाड, मढ ते थेट रामपूर, या गावांना उन्हाळ्यात कायम पाण्याची प्रतीक्षा असते. लाकूडपाडा, बोरवाडी, बांगर वाडी, मोहवाडी, चासोळे, जांभूळ वाडी, वडाची वाडी, भांग वाडी, बनाची वाडी, शिवेची वाडी, झाडघर पठार, पानशेत तसेच फांगणे, पेजवाडी या गावांनी तर कायम भिषण पाणीटंचाई खाल्ली आहे. इकडे पश्चिमेला किशोर, असोळे, वाघिवली, करवेळे, असोसे, हिरेघर त्यांच्या शेजारील शिरगाव, ब्राह्मण गाव, मोहरई, टेंमगाव अशी अनेक गावे बोअरवेलवर अवलंबून आहेत. त्यामुळे पाण्यासाठीचा त्यांचा संघर्ष मुरबाडच्या इतिहासात नोंद करायला हरकत नसावी. एकंदर मुरबाडच्या विकासात पाणी टंचाईचा सिंहाचा वाटा म्हणावा लागेल?
पाडाळे, म्हाडस, सोनावळे, शिरवली, खांडपे सहित अनेक छोटेमोठे डॅम; काळू, शाही, डोईफोडी, मुरबाडी, बारवी या महत्त्वाच्या नद्यां सोबत शेकडों विहिरी, कालवे यांचा वरदान या मुरबाड तालुक्याला आहे. एमआयडीसीच्या मालकीचा भव्य असा बारवी डॅम मुरबाडच्या हद्दीत आहे. मात्र त्याचा सर्वाधिक फायदा मुरबाडत्तेर तालुक्यांना होतो. या खेरीज अनेक ग्रामपंचायतींमध्ये लाखों रुपये खर्ची लावून राबविण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजना, २४७० मिमी नोंद असलेला समाधानकारक पर्जन्यमान, असे असतांना ही मार्च-एप्रिलपासूनच पाणी वाहू टँकरची लगबग तालुक्यात ठिकठिकाणी पाहायला मिळते. महिलांसहित लहानमुले पाण्यासाठी वणवण करतांना नजरेस पडतात. कुटुंबातील मुख्य माणसांचा जास्तीचा वेळ पाण्याच्या वाहतुकीत जात असल्याच्या तक्रारी ही नेहमीच आम्हाला प्राप्त होत असतात.
परिस्थिती नेमकी बदलेल केव्हा? वर्षानुवर्षे पाण्यासाठी सुरू असलेली पायपीट थांबेल का? या सर्वांना जबाबदार कोण? एक नियोजित तालुका म्हणून मुरबाडचा गौरव होण्याच्या प्रतीक्षेला पूर्णविराम लागेल का? असे अनेक प्रश्न अन् अपेक्षा आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र एकदा निसर्गाला गुन्हेगार ठरवले की, मुख्य आरोपी मोकाट; नाही का..?
-किशोर गायकवाड
____________________________________________
【मुरबाड MIDC मधील कंपनीला भीषण आग】
【मुरबाडमध्ये संविधान सन्मान मोर्चा】
【मुरबाड MIDC मधील कंपनीला भीषण आग】
【RBI Recruitment 2021 for Office Attendent】





0 Comments