ब्रेकिंग : मुरबाडच्या अस्वस्थ नगराध्यक्षावर अविश्वासाच्या ठरावाची टांगती तलवार? अध्यक्षाला आ. कथोरेंचा गोडवा सुटेना? खोबरं तिथं येळकोट भूमिकेमुळे पॅनल सदस्य संतप्त? -Kishor K. Gaikwad


ब्रेकिंग : मुरबाडच्या अस्वस्थ नगराध्यक्षावर अविश्वासाच्या ठरावाची टांगती तलवार? 

अध्यक्षाला आ. कथोरेंचा गोडवा सुटेना? खोबरं तिथं येळकोट भूमिकेमुळे पॅनल सदस्य संतप्त?

-Kishor K. Gaikwad

ठाणे/मुरबाड : (किशोर गायकवाड) आमदार किसन कथोरेंची (MLA Kishan Kathore) गैरवर्तणूक व एकतर्फी भूमिकेच्या सबब मांडून मुरबाड नगरपंचायतीच्या (Murbad NagarPanchayat) नऊ नगरसेवकांनी जूनमध्ये भारतीय जनता पक्षातून (Bharatiya Janata Party) सोडचिट्टी घेत थेट स्वतंत्र मुरबाड परिवर्तन पॅनल (Murbad Parivartan Panel) स्थापन केले व पुढे हे पॅनल शिंदे गटात (Shivsena Shinde Murbad) समाविष्ट झाले. परंतु या नगरसेवकांपैकी नगराध्यक्ष संतोष चौधरी यांना आ. कथोरेंचा गोडवा सुटत नसल्याने त्यांचा भारतीय जनता पक्षावरील प्रेम या नवीन शिंदे शिवसेना पुरस्कृत परिवर्तन पॅनलला डोकेदुखी ठरत आहे. परिणामी संपूर्ण पॅनल व पक्ष सदस्य नगराध्यक्ष चौधरी यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून आदेशाची वाट आहेत. त्यामुळे चौधरी यांचा अस्वस्थपणा आता सुस्पष्टपणे चव्हाट्यावर आला असून त्यामुळे मुरबाडचा शहरी राजकारण टीकेचा मानकरी ठरत आहे. 

 नगरसेवक रामभाऊ दुधाळे, गटनेते मोहन गडगे, उपनगराध्यक्षा दिक्षिता वारे, उर्मिला ठाकरे, नम्रता जाधव, अनिता मार्के, रविना अधिकारी, स्नेहा चंबावणे व नगराध्यक्ष संतोष चौधरी या मुरबाड नगरपंचायतीच्या नगरसेवक व नगसेविकांनी आ. कथोरें विरोधात बंड पुकारून स्वतंत्र पॅनल स्थापन केले. याबाबत जिल्हाधिकारी यांचे मान्यता पत्र ही मिळाले आहे. तदनंतर आपली भूमिका जाहीर करण्यासाठी या नगरसेवकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आ. कथोरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. या सर्वांतून त्यांनी आपसूकच आमदार कथोरे यांचा रोष ओढून घेतला व त्यामुळे या नगरसेवकांच्या वॉर्डात निधीला पूर्ण विराम लागला. परंतु ही आर्थिक आवक बंद पडल्याची नुकसानी नगराध्यक्ष चौधरी यांनी परवडणारी नसल्याची राळ उठली आहे.

 नुकताच त्यांनी नवीन सुसज्ज गृहात प्रवेश केला आहे व राजकीय ऐट मिरविण्यासाठी आणखीन एक मोठं चारचाकी वाहन ही पार्किंगमध्ये वाढवले. या सर्वांतून निर्माण झालेला आर्थिक ताण सावरण्यासाठी चौधरी यांना आ. कथोरेंशी पाठफिरवाणी परवडणारी नसल्याची चर्चा आहे. नगरपंचायतीच्या पहिल्या पंचवार्षिकमध्ये शिवसेनेतून चौधरी यांची पत्नी नगरसेविका तर दुसऱ्या टर्ममध्ये ते स्वतः भाजपातून नगरसेवक आणि नंतर नगराध्यक्ष बनले. या दरम्यान ते निवडून आलेल्या प्रभागात झालेल्या कोट्यावधींच्या कामांतून चौधरी यांनी मोठी माया उभी केली व यातून त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आल्याचे ऐकीवत आहे. याचे सर्व श्रेय त्यांनी आ. कथोरे यांना दिल्याचे अनेक बॅनर्स आपल्या प्रभागात वेळोवेळी झळकावलेले पाहायला मिळाले. असे असतांना भाजपा नगरसेवकांनी एकसंध घेतलेल्या निर्णयात ते सुद्धा सहभागी झाले. मात्र लवकरच त्यांनी यातून काढता पाय घेतल्याचे समोर आले. 

 याखेरीज नगराध्यक्ष चौधरी यांनी पंचायत समितीच्या (Murbad Panchayat Samiti) जागेत केलेल्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईचा बगडा नुकताच रोखण्यात आला आहे. मात्र हे बांधकाम जमीनदोस्त होण्यापासून वाचविण्यासाठी चौधरी आ. कथोरेंच्या आश्रयला धाव घेत असल्याचा आरोप विरोधक करीत आहे.

  नुकताच झालेल्या आमदार कथोरे यांच्या वाढदिवशी त्यांना बदलापूर येथील निवासस्थानी सपत्नीक भेट देऊन चौधरी यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांना धक्का दिला होता. मात्र वाढदिवशी भेट म्हणजे पक्ष प्रवेश नव्हे असा मुलायमा ही त्यावर समाज माध्यमातून लावण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला होता. तर नुकताच त्यांनी आ. कथोरे यांचे निकटवर्तीय भाजपा नगरसेविका देसले दांपत्य यांच्या प्रभागातील उदघाटनाला हजेरी लावली व समयसूचकता राखून उपस्थित पत्रकारांना बगल देऊन पलायन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी केवळ मी अजून पक्षाचा राजीनामा दिला नसल्याने सांगून सभ्रम निर्माण केला. उलटपक्षी आ. कथोरेंना प्रभावित करण्यासाठी मी कोणत्या पक्षात आहे अशा आशयाची सोयीस्कर बातमी लावण्याचे पत्रकारांना दबक्या आवाजात सूचित करून हळूच पिच्छा सोडवला. मात्र यामागे आमदार कथोरेंची गोडी, कि कोट्यावधींच्या कामांना मुकावे लागेल याची भीती, कि पदाची हाव अथवा आणखीन काही? हा संशोधनाचा मुद्दा बनला आहे. त्यातल्या त्यात मुरबाडच्या शिवसेना शिंदे गटात देखील दोन गट असल्याचे बोलले जाते. परिणामी या सर्वात आमदार कथोरेंची छत्रछाया ही चौधरी यांना सोयीची वाटत असल्याने त्यांनी पूछेमूड केल्याची बोंब आहे. 

 याप्रकरणी मुरबाडच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षा तर्फे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना पत्र देऊन विद्यमान नगराध्यक्ष नेमकं कोणत्या पक्षाचे किंवा गटाचे असल्याची विचारणा केली होती. त्यानुसार राष्ट्रवादी (एस. पी.) पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक वाघचौडे यांना नगरपंचायतीने दिलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीला परिवर्तन पॅनलमध्ये एकमेव नगराध्यक्ष चौधरी यांच्याच नावाची नोंद असून बाकी सदस्य शिंदे शिवसेनेत असल्याचे म्हणाले. त्यामुळे हा प्रकरण कायदेशीररित्या उघड करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी यांच्या न्यायदालनात दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा हा संभ्रम नगराध्यक्ष व सदस्यांनी वेळेत दूर करून लोकांसमोर धाडसने गुलदस्त्यातील सत्य उघड करावे अशी मागणी होत आहे.

 यासंदर्भात पॅनलचे प्रमुख रामभाऊ दुधाळे, गटनेते मोहन गडगे व त्यांच्या टीम मेंबर सोबत चर्चा केली असता नगराध्यक्ष चौधरी हे पक्षात नसले तरी पॅनलमध्ये असल्याचे सांगतात. शिवाय जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या पत्रावर त्यांची सही असल्याचे म्हणाले. मात्र त्यांची भूमिका अस्पष्ट व दुटप्पी असल्यास सर्व नगरसेवक मिळून बहुमताने त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणू असे स्पष्ट केले. त्यामुळे बंड केलेल्या आपल्या सहकारी नगरसेवकांपासून अंतर ठेऊन असलेले नगराध्यक्ष चौधरी यांची कारकीर्द भलतीच वादाची ठरत आहे. तर आपले राजकीय अस्तित्व तथा भविष्य सुरक्षित करण्यासाठी नगराध्यक्ष संतोष (बाबू) चौधरी यांची सुरु असलेली केविलवाणी धडपड यशस्वी ठरेल का? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

 "याबाबत आम्ही आमचे युवानेते खा. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सोबत चर्चा केली आहे. चौधरी यांनी पक्ष प्रवेश डिक्लेयर केले नाही. परिवर्तन पॅनलचे राम दुधाळे यांना आम्ही नगराध्यक्ष चौधरी यांचेशी बोलणे करून पक्ष प्रवेश करण्यासाठी सांगितले आहे. चौधरी यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खोपसले आहे आणि पुन्हा भारतीय जनता पार्टीशी निष्ठेच्या गोष्टी करू नये. मुरबाड नगरपंचायतीमध्ये आमचे एकूण तेरा नगरसेवक आहेत. त्यामुळे चौधरी यांनी लवकरच पक्ष प्रवेश न केल्यास आम्ही त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणू."
 -श्री. अरविंद मोरे, शिवसेना (शिंदे) जिल्हा प्रमुख ठाणे
 

 "सुभाष पवार पक्षांतर करीत असल्याने आमच्यातील काही नगरसेवक त्यांच्या सोबत जाण्याची शंका आहे. त्यामुळे सुभाष पवार यांच्या पक्ष प्रवेशानंतर नगराध्यक्ष संतोष चौधरी यांच्यावर अविश्वासाचा ठराव संमत करण्यात येईल. जिल्हा प्रमुख अरविंद मोरे साहेबांच्या सूचनेनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल."
 -श्री. रामभाऊ दुधाळे, माजी नगराध्यक्ष/विद्यमान नगरसेवक (परिवर्तन पॅनल)








-Kishor K. Gaikwad, Murbad

(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-किशोर गायकवाड, मुरबाड

वाचा...






Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments