हृदयद्रावक : वणव्यामुळे आदिवासी संसारं जळून खाक तर पाळीव मेंढ्याचा होरपळून मृत्यू...
[ Murbad | KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. ३१) वन्य परिसरात लागलेल्या एका वणव्याने वन्य संपत्ती गिळता गिळता थेट मानवी निवारा जाळून खाक केल्याची घटना काल रात्री मुरबाड तालुक्यात घडली आहे.
प्राप्त माहितीवरून तालुक्यातील अस्कोत येथील राहणारे शंकर श्रावण मुकणे व त्यांच्या मुलाचे घर रानातून वेगाने आलेल्या वणव्याच्या विळख्यात सापडून यात दोन्ही आदिवासी कुटुंबांची अर्ध कच्ची घरे पूर्णपणे जाळून खाक झाली आहेत. तसेच एका पाळीव मेंढ्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर प्रसंगावधान राखल्याने या कुटुंबातील माणसे बचावली असून घरातील तमाम साहित्य मात्र होत्याचं नव्हतं झालं आहे. जळून खाक झालेल्या संसारात घरातील जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भांडी, अन्य जिन्नस आदींचा समावेश आहे.
काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा वणवा वन्य परिसरातून धाव घेत थेट या आदिवासी कुटुंबांच्या घरा पर्यंत येऊन पोहचला. गावकऱ्यांच्या मदतीने वन कर्मचाऱ्यांना रात्री उशिरा पर्यंत या वणव्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले. घटनेची माहिती मिळाल्या नंतर संबंधित तलाठी यांनी सकाळी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला असून यात सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती सरपंच नितीन गंभीरराव यांनी दिली आहे.
मात्र असे वणवे लागतात कसे? दर वर्षी वणव्यां संदर्भात प्रबोधन करण्यासाठी वन विभाग लाखों रुपये खर्च करीत असतो. असे असतांना तालुक्यातील वणव्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत असून लाख मोलाची वन्य संपदा यात जाळून खाक होत आहे. तर वन्य प्राणी, पक्षी होरपळून नाहक बळी जात आहेत. अज्ञात वन माफिया आपल्या स्वार्थासाठी असे वणवे रानात लावत असल्याची चर्चा कानावर येत असून वन अधिकारी, कर्मचारी यांनी यावर गंभीरपणे लक्ष देणे अपेक्षित आहे. वन्य जीवांची हानी होता होता आता थेट या वणव्यांमुळे मानवी जनजीवन ही धोक्यात आल्याने वन विभागापुढे तालुक्यातील हे वणवे नियंत्रणात आणणे आता मोठे आव्हानाचे ठरले आहे.
( किशोर गायकवाड )
___________________________________________





0 Comments