अबब...अजब..! कापडाच्या टपऱ्या हटविण्यासाठी चक्क जेसीबीला बोलवण
मुरबाडच्या एम.आय.डी.सी. अधिकाऱ्यांचा प्रताप!
बेरोजगार तरुणांच्या जीवावर उठले अधिकारी?
मुरबाड (दि. २९) : लॉकडाउन काळात आर्थिक कंबरडे मोडलेल्या आणि बेरोजगार झालेल्या तरुणांनी उभारलेल्या कापडाच्या तात्पुरत्या टपऱ्या तोडण्यासाठी एम. आय. डी. सी. च्या अधिकाऱ्यांनी चक्क जेसीबी बोलाविल्याची अजब घटना मुरबाडमध्ये घडली आहे.
रोजगार हिरावल्याने तालुक्यातील काही सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी कुटुंब उदरनिर्वाहसाठी मुरबाड तहसिल कार्यालय परिसरात लोकसेवा आणि रोजगार असा दुहेरी हेतू ठेवून कापडी खोपटा उभा केला. मात्र एमआयडीसी अधिकाऱ्यांनी यावर आज अचानक कारवाईचा बडगा उचलला. यावेळी बेरोजगार तरुणांची बाजू घेऊन स्थानिक पुढाऱ्यांनी आक्रमक पावीत्रा घेतल्यानंतर एम.आय.डी.सी अधिकाऱ्यांना कारवाई तूर्तास थांबवली आहे.
लॉकडाऊनमध्ये अनेक तरुणांचा रोजगार हिरावला गेला आहे. तर अनेक कुटुंबे आर्थिक गर्तेत सापडली आहेत. यावर मात करण्यासाठी अनेक तरुणांनी आपली 'इमेज', 'स्टेटस' बाजूला ठेऊन मच्छी, भाजीपाला, कपडे, विविध गॄहोपयोगी वस्तू विक्रीची दुकाने जागा मिळेल तिथे बसून सुरू केली आहेत. त्यातच काही तरुणांनी मुरबाड एम. एस. इ. बी कार्यालयासमोर कापडी जाळीच्या तात्पुरत्या टपऱ्या उभारल्या आहेत. मात्र या तात्पुरत्या टपऱ्या अनधिकृत असल्याचा दावा करत उपअभियंता यांनी पोलिस फाटा बोलावून सोसाट्याच्या वाऱ्यातही उडून जातील अशा या टपऱ्या तोडण्यासाठी चक्क जेसीबी आणला. विशेष म्हणजे याठिकाणी आर्थिक भांडवल नसल्याने येथे एकानेही कोणताही व्यवसाय सुरू केलेला नाही. गेली महिना दिड महिना या टपऱ्या रिकाम्या आहेत. याशिवाय याच्या बाजूलाच एका हॉस्पिटलने एम. आय. डी. सी. च्या जागेत थेट पक्के अनधिकृत बांधकाम केले असतांना ते न तोडता गरीब बेरोजगार तरुणांच्या व्यवसायावर गदा आणण्याचा प्रयत्न करताच त्याठिकाणी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान पवार, शिवसेनेचे संतोष जाधव, आर. पी. आय. सेक्युलरचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने, रिपाई (आ) चे तालुकाध्यक्ष दिनेश उघडे, प्रहारचे तालुकाध्यक्ष एस. एल. पाटील, रिपाई सेक्युलरचे युवक तालुकाध्यक्ष राजेश गायकवाड सह तालुक्यातील सर्वच माध्यम प्रतिनिधी यांनी धाव घेतली व या कारवाईला प्रखर विरोध केला.
एमआयडीसीमध्ये अन्य ठिकाणी पक्की अनधिकृत बांधकामे झाली असतांना या बेरोजगार तरुणांनी उपजीविकेसाठी उभारलेल्या तात्पुरत्या निर्जीव टपऱ्यांवर तुम्ही कारवाई कसे करू शकता? असा सवाल भगवान पवार यांनी करत ते जेसीबीला आडवे झाले. त्याचबरोबर इतर कार्यकर्तेही आक्रमक झाल्याने एम. आय. डी. सी. अधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठी खडाजंगी झाली. पोलिसांनी यात मध्यस्थी करत प्रकरण हाताळल्याने हे प्रकरण शांत झाले. यावेळी अधिकाऱ्यांनी चार दिवसांची मुदत दिली आहे. मात्र फक्त या कापडी टपऱ्या पाडण्याची कारवाई झाल्यास एम.आय.डी., टपरीधारक व टपरीधारक बेरोजगारांच्या पाठीशी असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष उभा ठाकण्याची चिन्हे दिसत आहेत.
( किशोर गायकवाड )
___________________________________________









0 Comments