#Amenable : वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी मुरबाड पोलिसांचा स्तुत्य उपक्रम!
[ KISHOR K. GAIKWAD]
मुरबाड : (दि. २५) वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी सतत काही ना काही उपक्रम राबविणाऱ्या मुरबाड पोलिसांनी 'अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियान' च्या अनुषंगाने चालकांच्या सुरक्षिततेसाठी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
ठाणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे, महामार्ग पोलिस केंद्र उमरोलीचे सहायक पोलिस निरीक्षक किरण मतकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंन्फिगो आय केयर हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मुरबाड पोलिसांनी आज सकाळ पासून मुरबाड तालुक्यातील दुचाकी, रिक्षा चालक, परिवहन महामंडळाचे वाहक, चालक, टेम्पो व अन्य चालकांची मोफत तपासणी करून घेतली. तिनहात नाका पोलिस चौकी येथे हा उपक्रम राबविण्यात आला असून सुमारे १५० चालकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. यामध्ये काही चालकांच्या नजरेत मोतीबिंदू, टेरिझियम, रिफेक्टिव्ह इरर अशा अनेक नेत्र त्रुटी आढळून आल्याचे नेत्रतज्ञ राजू तालुकदार यांनी सांगितले असून त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करून खबरदारीच्या सूचना केल्या आहेत.
याप्रसंगी मोटारसायकल चालक यांना हेल्मेट चे महत्व पटवून देणे, जड-अवजड वाहन चालकांना वाहन चालविणे संदर्भात घ्यावयाच्या दक्षता याबाबत नमूद केलेली माहितीची पत्रके वाटण्यात आली. तसेच वाहतूक नियमांची माहीती व ते जीवनात रुजू करण्यात यावे, याबाबत मार्गदर्शन व आवाहन करण्यात आले.
तर या स्तुत्य उपक्रमासाठी तालुक्यातील वाहन चालकांकडून मुरबाड पोलिसांचे कौतुक केले जात आहे. या उपक्रमासाठी पोलिस कर्मचारी विजय गांजले व सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली असून राष्ट्रीय महामार्ग पोलिस माळशेज यांचा मोलाचा सहभाग असल्याचे पोलिस कर्मचारी कोकाटे यांनी सांगितले.
"वाहन चालवितांना डोळ्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे चालकांनी आपल्या डोळ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. डोळ्यांचे महत्त्व चालकांना कळावे तसेच सामाजिक जबाबदारी म्हणून चालकांच्या डोळ्यांच्या बाबतीत खबरदारी घ्यावी, या प्रामाणिक उद्देशाने आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आज वाहन चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केला आहे."
- श्री. दत्तात्रेय बोराटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुरबाड
( किशोर गायकवाड )
___________________________________________






0 Comments