एल्गार! म्हसा गावठाणासाठी मुरबाड पंचायत समितीवर श्रमजीवीचा आंदोलन [Murbad | KISHOR K. GAIKWAD ]

पंचायत समिती, मुरबाड

एल्गार! म्हसा गावठाणासाठी मुरबाड पंचायत समितीवर श्रमजीवीचा आंदोलन   

[Murbad | KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. १) खांबलिंगेश्वर यात्रेसाठी संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध असलेल्या म्हसा गावातील गावठाण जागेसाठी आज श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुरबाड पंचायत समितीच्या समोर एल्गार पुकारला.

 तालुक्यातील म्हसा गावातील काही बिगर आदिवासी स्थानिकांनी आपल्या स्वार्थासाठी १२ एकराचे गावठाण बळकाविण्याचे सत्र चालविले असून याठिकाणी कुंपण करून, काही ना काही लागवड करीत असल्याचे दाखवून गावठाण जमीनीवर कब्जा सुरू असल्याचा आरोप करीत श्रमजीवी कार्यकर्त्यांनी पंचायत समिती कार्यालया समोर ठिय्या मांडून, घोषणाबाजी करीत हे आंदोलन केले.
म्हसा गावठाण येथील परिसर

    या गावठाण भागात राहणारे कातकरी बांधव मात्र सर्व नागरी सोयी सुविधांपासून वंचित राहिले असल्याचे ही त्यांनी म्हंटल आहे. सदर परिसर गावठाण असून सुद्धा येथील गावकरी या कातकरी वस्तीतील नागरिकांना दमदाटी करीत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. 
  
  याप्रकरणी न्याय मिळावा म्हणून सुमारे ६ महिन्यांपूर्वी श्रमजीवी संघटनेने पुढाकार घेऊन ग्रामपंचायत मार्फत तेथील गावठाणाच्या मोजणीसाठी पत्रव्यवहार केला होता. नुकताच दिनांक २८ जानेवारी २०२१ रोजी सरकार तर्फे म्हसा ग्रामपंचायत मधील सर्व गावठाण जागेची मोजणी करण्याचे पत्रक म्हसा ग्रामपंचायतला प्राप्त झाले. पण ग्रामसेवक व स्थानिक राजकाऱ्यांनी शक्कल लढवून जाणीवपूर्वक तेथील कातकरी वाडीची मोजणी वगळून बाकी मोजणी केली व कातकरी वाडीची गावठाण मोजणी तशीच प्रलंबित ठेवल्याचे श्रमजीवी कार्यकर्त्यांनी सांगितले. याबाबत ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी समाधान कारक उत्तर दिले नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. नाईलाजाने जोपर्यंत गावठाणाची मोजणीचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत मुरबाड पंचायत समितीच्या दारात ठिय्या मांडून आंदोलन करण्याचा पवित्रा आज (दि. १ रोजी) श्रमजीवी संघटनेने घेतला. त्यानुसार सदर आंदोलनाची दखल घेऊन गट विकास अधिकारी अवचार यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र देऊन उद्या (दि. २ रोजी) स्थळ पाहणी करून दिनांक ५ रोजी पर्यंत म्हसा येथील गावठाणाची मोजणी करणार असल्याचे सदर पत्रात म्हंटले आहे.
पंचायत समिती, मुरबाड येथे आंदोलन
 
  यावेळी आंदोलनाचे नेतृत्व ठाणे जिल्हा कातकरी सचिव पंकज वाघ यांनी केले. तर तालुका सचिव महेश वाघ, शेतकरी प्रमुख सुरज राजपूत, युवक सचिव दिलीप शिद, कुंदा पुंजारा आदी सह मोठ्या संख्येने महिला श्रमजीवी कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

( किशोर गायकवाड )
___________________________________________





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


0 Comments