आणि म्हणूनच आपले भारतीय लष्कर जगात ग्रेट आहे... [ KISHOR K. GAIKWAD ]

COLABA MILITARI STATION, MUMBAI

आणि म्हणूनच आपले भारतीय लष्कर जगात ग्रेट आहे... 

[ KISHOR K. GAIKWAD ] 

   ऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षे नंतर अखेर अनिकेतची फायनल 'डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन' प्रक्रिया पूर्ण होऊन आज तो मध्यप्रदेशातील 'सागर' जिल्ह्याकडे ट्रेनिंगसाठी रवाना झाला. मुंबईच्या कुलाबा येथील मिल्ट्री स्टेशनमध्ये या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या. अनिकेत म्हणजे आमचे मार्गदर्शक पत्रकार जयदीप अढाईगे यांचा थोरला मुलगा; मोठ्या संघर्षाने तो नुकताच आर्मीमध्ये सिलेक्ट झाला आहे. कोरोनामुळे त्याची व त्याच्या संपूर्ण बॅचची नियुक्ती तूर्तास थांबवली होती. मात्र ही प्रतीक्षा संपली आणि वरिष्ठांचा आदेश मिळताच त्याला कुलाब्याच्या मिल्ट्री भागातील अफगाण चौक येथील मिल्ट्री कार्यालयात हजर होण्याच्या सूचना प्राप्त झाल्या. त्यानिमित्ताने मला ही त्याठिकाणी जाण्याचा योग आला, शिवाय चांगले अनुभव ही पदरी पडले. 


  पहिल्यांदाच अनिकेतला घेऊन मी आणि अढाईगे साहेब ज्यावेळी त्या मिल्ट्री स्टेशनमध्ये पोहचलो, तेव्हा तेथील वातावरण पाहून मन प्रसन्न झाले. राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने त्याठिकाणी नवोदित आर्मी जवान उपस्थित होते. सवयीप्रमाणे आम्ही त्या परिसराची पाहणी केली. प्रथमदर्शनी आकर्षित करणारे मनमोहक उद्यान परिसर प्रफुल्लित करीत होते. एका भिंतीवर भारतीय नौसेना व वायुसेनेच्या सन्मानाचे चित्र नजरेस पडले. क्षेपणास्त्रांची माहिती देणारे प्रतिकात्म मिसाईलस् चे दर्शन ही झाले. मुख्य रस्त्याच्या कडेला काही जवानांचे फोटो आदराने लावलेले दिसून आले. हे सर्व काही भारतीय जवानांच्या विरतेची साक्ष देत होते. तेथील छोटेमोठे देखावे, स्वच्छ रस्ते, फाटकांसमोरील सजावट, हत्यारांसह तैनात आर्मी जवान, आर्मी स्टेशन लगतचा समुद्र किनारा, इतर सामान्य वाहनांपेक्षा वेगळेच रजिस्ट्रेशन नंबर असलेली परिसरात फिरणारी लष्करी वाहने, अशी अनेक दृश्ये आम्ही डोळ्यांत भरली. आकर्षक रंगरंगोटी करून काही रणगाडे चौकात व रस्त्याच्या कडेला सन्मानपूर्वक दर्शनासाठी खुले ठेवले होते. एकेकाळी देश सेवेसाठी धावलेले हे रिटायर्ड रणगाडे आजही मोठ्या दिमाखात तेथे उभे असलेले पाहून अभिमानाने उर भरून आला.
 
Army Tank


  एका मैदानावर या नवोदित जवानांना रांगेत बसण्याचे सांगण्यात आले. रंगबिरंगी कपडे परिधान केलेले हे जवान सांगितल्या प्रमाणे बसत होते. हे सगळं पाहत असतांना अचानक आमचे लक्ष यातील काही जवानांवर गेले. त्याठिकाणी बसलेल्या काही जवानांना चक्क मैदानावर उलट्या कोलांड्या उद्या मारीत लांब पर्यंत जाण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. तत्पूर्वी कोणी एक धिप्पाड शरीरयष्टी असलेला आर्मी ऑफिसर त्यांची हजेरी घेत असतांना याच दरम्यान लक्ष नसलेले हे जवान होते. यावरून भारतीय आर्मीच्या कडक शिस्तीचा पाया कसा येथे रचला जातो, याचे दर्शन यानिमित्ताने आम्हाला घडले आणि म्हणूनच आपले भारतीय लष्कर जगात ग्रेट आहे...
  देशसेवेसाठी भारतीय लष्करात सहभागी झालेल्या या तमाम जवानांना व त्यांच्या कुटुंबियांना मनःपूर्वक सलाम....

जय भारत! जय जवान!

किशोर गायकवाड )
___________________________________________



पत्ता : अंजनी गॅस सर्व्हिसच्या बाजूला, मेन रोड, मुरबाडसंपर्क : ८८०५०८३९४३

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments