मुरबाडकरांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी काँगेसचे नवे पाऊल|New step of Congress to solve Murbadkar's health problem
आरोग्याबाबत मुरबाडकरांना मिळणार दिलासा?
[KISHOR K. GAIKWAD]
मुरबाड : (दि. १२) मुरबाड तालुक्यात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले असतांना मुरबाडकरांसाठी दिलासादायक बातमी मिळण्याची शक्यता आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेशराव टोपे आपल्या राजकीय दौऱ्या दरम्यान नुकताच (दि. १० रोजी) कल्याण येथे असतांना मुरबाडच्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन तालुक्यातील जनतेच्या आरोग्या बाबत समस्या मांडत मुरबाड तालुक्यात प्रभावी आरोग्य यंत्रणेची असलेली नितांत गरज स्पष्ट केली आहे व मुरबाड तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता द्यावी अशा मागणीचे निवेदन काँग्रेस पक्षाचे पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात तसेच अमोल सुरोशी, नेताजी लाटे आदींच्या उपस्थितीत देण्यात आले. याप्रसंगी सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव देखील उपस्थितीत होते. तर मुरबाडकरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी या मागणीचा पाठपुरावा करून तालुक्यात उपजिल्हा रूग्णालय अस्तिवात नक्कीच आणू , जेणेकरून मुरबाडकरांना लहान-मोठ्या आजारांवर उपचार घेण्यासाठी तालुक्या बाहेर जावे लागणार नाही, असा विश्वास चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केला आहे.
सुमारे २.५० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या मुरबाड तालुक्यात शेतकरी, कामगार व शेतमजुर यांचीच संख्या सुमारे ८०% च्या जवळपास आहे. सद्यस्थितीला सुमारे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मुरबाड शहरांमध्ये आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये तालुक्यात असलेली आरोग्य व्यवस्था व वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या अपुऱ्या संखेमुळे रुग्णाचे मोठ्या प्रमाणात शहरी भागामध्ये स्थलांतर होत आहे. याचा धनदांडग्यांना काहीच फरक पडत नसला तरी गरीब जनतेला उपचारासाठी पूर्णपणे सरकारी यंत्रणेवरच अवलंबुन राहावे लागते.
'मुरबाड तालुक्यातील मायबाप जनता ही महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे. त्यामुळे आपण तात्काळ सदरील मागणी मान्य करावी,' अशी विनंती यावेळी चेतनसिंह पवार यांनी आरोग्यमंत्र्यांना केली आहे. त्यामुळे या मागणीला यश प्राप्त झाल्यास मुरबाडकरांच्या आरोग्याच्या समस्यांबाबत मोठा दिलासा मिळू शकेल.
( किशोर गायकवाड )


0 Comments