संतापजनक : स्वच्छता पुरस्काराने प्रकाशित झालेल्या मुरबाड नगरपंचायतच्या बुडाखालीच अंधार..! गेल्या कचरा कुंड्या कुणीकडे..?[KISHOR K. GAIKWAD]

संतापजनक : स्वच्छता पुरस्काराने प्रकाशित झालेल्या मुरबाड नगरपंचायतच्या बुडाखालीच अंधार..!  

गेल्या कचरा कुंड्या कुणीकडे..?

[KISHOR K. GAIKWAD]

मुरबाड : मुरबाड शहर आणि मुख्य बाजारपेठ स्वच्छ ठेवण्याच्या नावाखाली मुरबाड नगर पंचायतने (Murbad Nagar Panchayat) लाखों रुपयांचा खर्च दाखवून ठिकठिकाणी ओला आणि सुखा कचरा टाकण्यासाठी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या कचरा कुंड्या बसविलेल्या नजरेस पडायच्या. मात्र सद्यस्थितीला या लाखों रुपयांच्या कुंड्या नेमक्या आहेत तरी कुठे? हा मुरबाडकरांसाठी हल्ली संशोधनाचा विषय बनला आहे.

Nagar Panchayat, Murbad
Nagar Panchayat, Murbad 

  ओला - सुखा कचऱ्याच्या वर्गीकरणाची पद्धत नागरिकांना  समजावून सांगण्यासाठी नगर पंचायत प्रशासना तर्फे शहरात मोहीम राबविण्यात आली होती. शिवाय याबाबतची माहिती देणारे मोठ्या आवाजातील गाणे घंटागाडीच्या माध्यमातून दररोज सकाळी शहरात ऐकायला मिळत असते. मात्र हे निव्वळ दिखावा असल्याचे आता उघड झाले असून मुरबाडची नगर पंचायत ही लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांना केवळ पैसे लुटण्याचे कुरण झाल्याचा आरोप यानिमित्ताने पुन्हा एकदा खरा ठरत आहे.
Nagar Panchayat, Murbad
Murbad Market

   स्वच्छता मोहीमेच्या सदराखाली गतवर्षी मुरबाड नगरपंचायतीने हिरव्या ३४ आणि निळ्या ३४ अशा एकूण ६८ प्लास्टिक कुंड्या ठिकठिकाणी बसविलेल्या असून यातील प्रति कुंडी रुपये ४,२५० किंमत असल्याचे नगर पंचायतने सांगितले. त्यामुळे लाखों रुपयांचा निधी खर्ची लावून मुरबाड नगर पंचायतने या कुंड्या शहरात बसविल्या. मात्र त्यांची योग्य ती निगा न राखल्याने नागरिकांना त्यांचा उपयोग होण्या आधीच त्या अज्ञातवासात गेल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेतील व शहरातील अनेक  ठिकाणी कचराकुंड्या चक्क गायब असून त्याठिकाणी केवळ काळ्या रंगाचा लोखंडी स्टँड दिसत आहेत. बाजारपेठेतील दुकानदार आपल्या दुकानातील मालाचे प्रदर्शन करण्यासाठी या स्टँडचा पुरेपूर उपयोग करीत असून नगर पंचायतने जणू याच कामासाठी ते बसविले असल्याचे भासत आहे.
   त्यातच खुद्द नगरपंचायत कार्यालयासमोरीलच कचराकुंड्या गायब असल्याने नगरपंचायत स्वच्छतेबाबत किती गंभीर आहे? हे आता उघड झाले आहे. नुकताच नगरपंचायतीने स्वच्छतेच्या बाबतीत देशात ५४ वा तर राज्यात ३७ वा क्रमांक पटकावून ओडीएफ++ दर्जा पंचतारांकित मानांकन (Five Star Rating) मिळविले आहे. मात्र केवळ पुरस्कार लाटण्यासाठी यापूर्वी शहराची स्वच्छता ठेवली जात होती का? असा सवाल यानिमित्ताने निर्माण झाला आहे. 
   
    जनतेचे पैसे उकळण्यासाठी एखादा नवीन टेंडर काढण्या पर्यंत मुरबाड नगर पंचायतीचे लोकप्रतिनिधींमध्ये सुरुवातीला मोठा उत्साह आणि स्पर्धा असते, मात्र एकदा की त्याचे संपूर्ण बिल निघाले, त्यानंतर त्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात ही कमी पडत नाहीत. सद्या बाजारपेठेतील या कचराकुंड्या गायब असल्याने दुकानदार, भाजीपाला विक्रेते नाईलाजाने जेथे मोकळी जागा दिसेल तेथे हा कचरा टाकत असून येत्या काही दिवसांत मुरबाड शहराची अवस्था पुन्हा कुरूप आणि दुर्गंधीमय होण्याच्या मार्गावर दिसत आहे. या कचराकुंड्यांचा नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ शोध घेऊन त्यांना पुन्हा जागोजागी बसवाव्यात तथा त्यांची नासधूस करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुरबाडकर करत आहेत.
किशोर गायकवाड )
___________________________________________



(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


0 Comments