हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट... सांगा मित्रहो दिसतो कसा सिद्धगडचा थाट..?
[ KISHOR K. GAIKWAD ]
"हिरव्या हिरव्या रंगाची,""झाडी घनदाट!""सांग गो चेडवा,""दिसता कसो""खंडाळ्याचो घाट!"
लहानपणी हे गाणं नेहमी ऐकायला मिळायचे...
काल अचानक मुरबाड तालुक्यातील सिद्धगड किल्ला परिसरात गेलो होतो. पावसाळ्यात या परिसरातील जे सौंदर्य पाहिले ते पाहून मला त्या जुन्या कवितेच्या ओळींवरून नवीन ओळी सुचल्या...
"हिरव्या हिरव्या रंगाची,""झाडी घनदाट!""त्यातून दिसती कड्यावरचे,""धबधबे अफाट!""सांगरे मित्रा,""दिसतो कसा,""आपल्या सिद्धगडचा थाट?"
आम्ही मुरबाडहुन निघालो. येथून पुढे म्हसा व जांभुर्डे गाव सोडले आणि भीमाशंकर अभयारण्याची हद्द सुरू झाली. त्या वेशीत प्रवेश केला व दाट झाडीतून नागमोडी वळणाचा रस्ता सुरू झाला. तो पार केला व पठारावर आलो. तेथून दिसणारा परिसर डोळ्यात काय साठवू आणि काय नको? असे झाले. त्या कड्यावरून सहजगत्या दरीमध्ये उडी मारणारे धबधबे, नजर पोहचेल तेथपर्यंत दिसणारी दरीतील हिरवाई व विस्तीर्ण कड्याला हळूच कवेत घेणारी धुक्याची दुलई... काय पाहू नी काय नको? याच विचार करतच पुढे कसे निघालो ते कळलेच नाही.
पुन्हा झाडीतून वळणे घेत जाणारा सपाट रस्ता सुरु झाला व बोरवाडी नावाची वस्ती आली. त्या वस्तीच्या पठारावरून पुन्हा पूर्वेला सिद्धगड तर दक्षिणेला भीमाशंकरचा हिरवागार निसर्ग दृष्टीत साठवून घेतला.
बोरवाडी सोडली अन् सिद्धगडच्या झाडीतून वळणे घेत हळुवार पणाने धावणारे झरे सुरू झाले. मध्येच कोसळलेल्या कड्यातून तयार झालेला रस्ता पार करताच पुढच्या वळणा नंतर त्या घनदाट जंगलात एकाकी उभे असलेले वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील यांचे स्मारक हिरव्यागार झाडीच्या कोंदणात बसलेले दिसले आणि नेहमीप्रमाणे अंगावर शहारे आले. कसे झाले असतील या हुतात्म्यांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार?
तेथे माथा टेकवून पुन्हा पुढे कू केली. काही अंतर जाताच रस्त्याच्या कडेला गेली ७७ वर्षे एकाच जागी स्थिर उभा असलेला तो दगड दिसला. ज्याचा आडोसा घेऊन ब्रिटिश पोलिस अधिकारी हॉल याने सन २ जानेवारी १९४३ रोजी हुतात्म्यांवर गोळीबार केला होता.
तेथून बरोबर सरळ रेषेत दिसणारी क्रांतिज्योत पहिली व तेथे नतमस्तक होण्यासाठी पुढे निघालो. क्रांतिज्योतीच्या सपाट भागावरून वर नजर टाकली तर कड्यावरून कोसळणारा धबधबा तीन टप्पे घेत क्रांतिज्योतीच्या पायाशी लोळण घेत पुन्हा खालच्या बाजूला कर्जत तालुक्यातील क्रांती भुमिमध्ये जाण्यासाठी आतुर असल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
या वर्षीच्या पावसाळ्यात केवळ पाहिलेले नाही तर अनुभवलेले ते दृश्य माझ्या मनातील नजरेने तुम्हाला शब्दांनी दाखवण्याची मला इच्छा झाली म्हणून हे लिहिले. ते तुम्हाला कसे वाटले, हे मला नक्की कळवा...
( किशोर गायकवाड )
______________________________________________
[ मुरबाड शहराच्या प्रवेशद्वाराचा निकाल लांबणीवर... बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा ]
[ आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]
![]() |
| Creative Science Hub - Murbad |





0 Comments