मुरबाडकर सावधान : शहरातील 'ही' शासकीय धोकादायक इमारत कोसळण्याच्या मार्गावर..?
जनतेचे कोट्यवधी रुपये पाण्यात...
मुरबाड : [ KISHOR K. GAIKWAD ] मुरबाड शहराचा कायापालट होत असतांना अनेक नवनवीन शासकीय इमारतींची उभारणी झाली. मात्र यांच्या बांधकामा पेक्षा स्वतःचे खिसे भरण्याकडे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष दिल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
सुमारे चार वर्षांपूर्वी मुरबाड पंचायत समितीचा कारभार नव्याने बांधलेल्या शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा समोरील दुमजली इमारतीत सुरू झाला. परंतु उद्घाटना आधीच या इमारतीच्या दर्शनी भागाचा स्लॅब कोसळल्याने या बांधकामाचा बोगस दर्जा उघड झाला होता.
तर या इमारतीच्या छताला पहिल्या पावसाळ्या पासूनच गळती लागायला सुरुवात झाली असतांना आता हे प्रमाण वाढले आहे. परिणामी या मजल्यावरील स्व. शांतारामभाऊ घोलप सभागृहातील लाखों रुपयांचे नवीन फर्निचर खराब होण्याच्या मार्गावर आहे. तसेच साफसफाई अभावी या इमारतीमधील शौचालयात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले असून येथील नळांना ही कायम गळती लागलेली नजरेस पडते. पावसाळ्यात या इमारतीच्या भिंतींना कायम ओलावा असतो. त्यामुळे या भिंतींवरून गेलेल्या वायरिंगमुळे मोठा विद्युत अपघात घडण्याची शक्यता आहे. तसेच गॅलरीमध्ये असणाऱ्या सौरऊर्जेच्या पॅनेल्सकडे ही पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. फ्लोरिंगवर फरशांचे काम व्यवस्थित न झाल्याने तडकलेल्या बरेचशा फरशा बदलण्यात आल्या होत्या. मात्र या नव्याने बसविलेल्या फरशांची ही सारखीच अवस्था आता दिसून येत आहे. त्यामुळे मुरबाड पंचायत समितीची इमारत ही अनेक समस्यांचे जणू केंद्रच बनली आहे.
ही धोकादायक इमारत पाडून नव्याने मजबूत प्रशासकीय इमारत बांधण्याची मागणी शिवसेनेचे संघटक व कुडवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच रामचंद्र सासे यांनी यापूर्वी केली होती. तर या इमारतीच्या समस्यांंचा पाढा सांगणारे वृत्त माहे सप्टेंबर २०१८ मध्ये शब्द मशालने प्रसिद्ध ही केले होते.
तालुकाभरातून लोक शासकीय कामकाजासाठी येथे येत असतात. या इमारतीच्या मधल्या मजल्यावर दर पावसाळ्यात पाणी साचत असते. यावर पर्याय म्हणून येथील कर्मचारी वर्ग प्लास्टिकच्या बादल्या लावून जलमय अवस्था हाताळण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असतात. या इमारतीच्या स्लॅबला व भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले असल्याने सदरची धोकादायक इमारत केव्हाही कोसळेल? अशा भीतीत येथील कर्मचारी वर्ग जीव मुठीत घेऊन काम करतांना नजरेस पडतो.
मुरबाडमध्ये विकास कामांची फक्त क्वांटीटी नजरेस पडते, मात्र क्वालिटीचा पत्ता नाय. त्यामुळेच आतापर्यंत जनतेचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. याला एकमेव कारण म्हणजे या ठेकेदार वर्गाला संबंधित अधिकाऱ्यांचे अभय आणि अधिकाऱ्यांवरील राजकीय वरदहस्त; शिवाय मुरबाड तालुक्यात लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळतात, असा आरोप होत असतांना या निकृष्ठ कामांना नेमका जबाबदार कोण? या अनुत्तरित प्रश्न आहे.
या इमारतीच्या दुरुस्तीचा दहा लाखांचा प्रस्ताव जिल्हा परीषदेकडे पाठविण्यात आल्याचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी सांगीतले.
तर या इमारतीच्या स्लॅबला लागलेली गळती थांबवण्यासाठी टेरेसवर पत्र्याचे शेड बांधण्या करिता जिल्हा परीषदकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून मंजूरी मिळून निधी उपलब्ध झाल्यास कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता संदीप चव्हाण यांनी सांगितले. विशेष म्हणजे ज्या जिल्हा परिषद विभागाने या इमारतीचे बांधकांम केले आहे, त्यांचे कार्यालय या इमारतीमध्ये न हलविल्याने अनेक शंकांना वाव मिळत आहे.
मात्र या इमारतीच्या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिटकरून (बांधकाम लेखा परिक्षण) तिला हस्तांतरीत केली नव्हती होती का? अथवा या इमारतीला गुण नियंत्रण विभागाने प्रमाणपत्र दिले नव्हते का? हा संशोधनचा मुद्दा बनला आहे.
( किशोर गायकवाड )
______________________________________________
[ मुरबाड शहराच्या प्रवेशद्वाराचा निकाल लांबणीवर... बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा ]
[ आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]
![]() |
| Creative Science Hub - Murbad |


0 Comments