मुरबाड : श्रद्धेच्या मनोऱ्याने दहीहंडी उत्सव साजरा
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. १२) कोरोनाच्या सावटामुळे चालू वर्षातील सर्वच सणांवर संक्रात आल्याचे चित्र सर्वदूर नजरेस पडत असतांना आज मुरबाड तालुक्यातील काही खेडोपाड्यात छोटेखानी दहीहंडी उसत्व साजरा होतांना पाहायला मिळाले.
मुरबाड तालुक्यातील गोविंदा पथक मोठ्या उत्साहाने दर वर्षी या गोपाळकाळा सणाची वाट पाहत असतात. उंचच उंच बांधलेल्या दहीहंडी फोडण्यासाठी सुमारे महिनाभरा आधीपासूनच हे पथक सरावाला सुरुवात करत असतात. मुरबाडमधील विविध राजकीय पक्ष आर्थिक बक्षिसे ठेवून शहरात दहीहंडीचे आयोजन करत असतात. ती बक्षिसे मिळविण्यासाठी या पथकांची स्पर्धाच लागलेली असते. तसेच कल्याण, बदलापूर, डोंबिवली, ठाणे यांसारख्या नगरात जाऊन ही पथके अनेक बक्षिसे ही मिळवतात. त्यामुळे आजचा दिवस या गोविंदांसाठी आनंदोत्सवच असतो. परंतु कोरोनाच्या महामारीने यंदा या गोविंदा पथकांची हिरमोड केली आहे.
मात्र असे असले तरी मुरबाड तालुक्यातील खेडोपाड्यातील छोटे गोविंदा आपल्या आनंदावर कोरोनाचे विरजण पडू न देता दहीहंडी उत्सव साजरा करतांना पहावयला मिळाले.
ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध उत्सवांपैकी दहीहंडी उसत्व हा एक मानला जातो. उंच मानवी थरांचे चित्तथरारक मनोरे पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने प्रेक्षक येथे आजच्या दिवशी उपस्थित असतात. टीव्ही चॅनेल्स देखील सकाळपासून या कामात व्यस्त असतात. मात्र यंदा या सर्व बाबींवर कोरोनाने जणू अवकळा आणली आहे. तर अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात यंदाचा गणेशोत्सव काटेकोरपणे खबरदारी घेऊन साजरा करण्याबाबत प्रशासनाकडून काही मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
( किशोर गायकवाड )
______________________________

0 Comments