आनंदवार्ता : मुरबाड बस आगाराची लालपरी धावणार कल्याण-शहापूर दिशेने - वाचा : बस फेऱ्यांचा संपूर्ण वेळापत्रक खालील लिंकमध्ये... - [ KISHOR K. GAIKWAD ]


आनंदवार्ता : मुरबाड बस आगाराची लालपरी धावणार कल्याण-शहापूर दिशेने


[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. १२) कोरोनाने बंदिस्त केलेल्या मुरबाड आगारातील सरकारी बसेस उद्या पासून पुन्हा रस्त्यावर पाहायला मिळणार असल्याने मुरबाडमधील प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. 

  मुरबाड बस आगारातील बसेस काही फेऱ्या कपात करून कल्याण आणि शहापूर दिशेने धावणार असल्याची माहिती मुरबाड बस आगारातून प्राप्त होत आहे. मात्र मुरबाड तालुक्या अंतर्गत बस फेऱ्या केव्हा सुरू होतील? हा प्रश्न जैसे थे आहे. याबाबत आगार प्रमुखांशी संपर्क साधला असता, तालुक्यातील फेऱ्या सुरू करण्याबाबत जलदगतीने हालचाली सुरू असून लवकरच मुरबाडकरांच्या सेवेत बसेस उपलब्ध असतील, अशी माहिती दिली.
  
  त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग असणाऱ्या सरकारी बसेस लवकरच पूर्ववत धावणार असल्याने मुरबाडकरांच्या तक्रारींना काही अंशी न्याय मिळणार आहे. 

  मुरबाडमधील चाकरमानी, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने कल्याण व शहापूर दिशेने प्रवास करीत असतो. या प्रवासासाठी पूर्णपणे रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते. मुरबाड ते कल्याण व शहापूरसाठी खासगी जीप गाड्यांची व्यवस्था ही आहे. परंतु या गाड्या जुन्या झाल्याने प्रवासासाठी धोकादायक असून बेकायदेशीर रित्या प्रवाश्यांची वाहतूक करीत असतात. शिवाय पैसे ही अधिक आकारतात. त्यामुळे प्रवासी वर्ग शासकीय बसच्या प्रवासाला अधिक महत्त्व देतात. तर सरकारी बसेस सुरू झाल्याने आता मुरबाडच्या प्रवाश्यांना दिलासा मिळणार आहे.


कल्याणला जाण्या करिता प्रवाश्यांना खालील वेळेप्रमाणे मुरबाड आगारातून बसेस उपलब्ध राहतील.

स. ६:०० वा. , स. ६:३० वा., स. ७:०० वा., स.७:३० वा., स. ८:०० वा., स. ८:३० वा., स. ९:०० वा., स. ९:३० वा., स.१०:१०, स. १०:४५ वा., स. ११:३० वा., दु. १२:४५ वा., दु. १३:३० वा., दु. १४:०० वा., दु. १६:१५ वा., सायं. १६:४५, सायं. १८:२५ वा.

मुरबाड बस आगारातून शहापुरकडे जाण्याकरिता खालील वेळापत्रकानुसार बसेस उपलब्ध असतील...

स. ०७:१५ वा., स. ११.०० वा., दु. १३.०० वा., सायं.१६.३० वा.

   कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्या करिता  सर्व प्रवाश्यांनी सुरक्षित अंतर ठेवून प्रवास करावा, असे आवाहन मुरबाड बस आगाराचे आगार व्यवस्थापक अमर पंडित यांनी केले आहे.

( किशोर गायकवाड )
______________________________





Murbad

    [टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]

(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments