समांतराची यशस्वी २० वर्षे |Shabd Mashal - Kishor K. Gaikwad

 समांतराची यशस्वी २० वर्षे!

 वसंतोत्सवाच्या समांतराची ही चळवळ अशीच चालू ठेवा  -जेष्ठ अभिनेते अरुण नलावडे




[ KISHOR1 K. GAIKWAD ]

मुरबाड : (दि. १२) गेली २० वर्षे समाजसेवेत कार्यरत असलेल्या समांतर प्रतिष्ठानचा वसंतोत्सव अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत काल संपन्न करण्यात आला असून यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन ही करण्यात आले.


  महिला रॅली, रक्तदान शिबिर, व्यक्तिमत्त्व विकास शिबीर, शेतकी संबंधित शिबिर असे अनेक सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या समांतर प्रतिष्ठान संस्थेने नुकताच २१ व्या वर्धापनदिनात पदार्पण केले आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा दिग्दर्शक, लेखक एकनाथ देसले यांच्या मुरबाड तालुक्यातील हिरवाई कुसुमाई या बागेत हा स्तुत्य कार्यक्रम संपन्न करण्यात आला. यावेळी जेष्ठ नाट्य, चित्रपट अभिनेते अरुण नलावडे, आमदार किसन कथोरे, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोदजी हिंदुराव, रविंद्र चंदने, जिवनदीप संस्थेचे रविंद्र घोडविंदे, सह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी 'वसंतोत्सव' या ७ व्या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नृत्य, गायन, वादन असे सांस्कृतिक कार्यक्रम, पुरस्कार वितरण, कथा, काव्य स्पर्धा विजेत्यांना बक्षीस वितरण असे विविधांगी कार्यक्रम यावेळी राबविण्यात आले.



 महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री दि. शांताराम भाऊ घोलप यांना मरणोत्तर 'छत्रपती शिवाजी राजे राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार', जेष्ठ नाट्य/चित्रपट कलाकार अरुण नलावडे यांना 'छत्रपती  संंभाजी राजे राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार', रायगड येथील पी. एन. पी. शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा नृपाल पाटील यांना 'राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय स्त्री गौरव पुरस्कार', रायगड येथील दि. प्रविण दत्तात्रेय पाटील (चित्रपट निर्माते) यांना मरणोत्तर 'हुतात्मा हिराजी पाटील राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार', नाशिकच्या प्रीटी यु फाऊंडेशनच्या संस्थापक डॉ. अनिता नरेंद्र बेंडाळे यांना 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समाजसेवा पुरस्कार', आधार फाऊंडेशनचे (मुरबाड, ठाणे ) अध्यक्ष कैलास कोर यांना महात्मा ज्योतिबा फुले समाजसेवा पुरस्कार, नाभिक सेवा संघ महाराष्ट्र अध्यक्ष माधव भाले यांना हुतात्मा भाई कोतवाल राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार, विजय शंकर सुर्यवंशी (जळगाव) यांना सेनापती हरी नारायण देशमुख राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार, दि. दिलीप लहुजी चंदने यांना मरणोत्तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्कार असे विशेष पुरस्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

  कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असलेले जेष्ठ अभिनेते अरुण नलावडे यावेळी व्यासपीठावरून बोलतांना समांतर प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करत होते. वसंतोत्सवाच्या सामंतराची ही चळवळ अशीच अविरत पुढे चालू ठेवा, असे उर्जात्मक अवाहन यावेळी नलावडे यांनी समांतर प्रतिष्ठानच्या सर्व सदस्य, पदाधिकाऱ्यांना केले आहे. तर समांतर प्रतिष्ठानवर  लोकांचे असलेले प्रेम आणि विश्वास कायम असेच राहो, यासाठी आम्ही सर्व सदस्य, पदाधिकारी जोमाने कार्यरत राहू, असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ देसले यांनी शब्द मशालशी बोलतांना केले आहे.

0 Comments