भात खरेदी संघाचा गलथान कारभार चव्हाट्यावर
शेतकऱ्यांच्या घामाने पिकलेला भात भिजला पावसात
[KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. १९) सद्या महाराष्ट्र अनेक आस्मानी संकटांच्या कचाट्यात सापडला असून यातून महाराष्ट्राला वाचविण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असतांना त्याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात एक संतापजनक प्रकार सामोर आला आहे.
मुरबाड तालुका भात खरेदी विक्री संघाने यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांंचा अनेक टन भात खरेदी केला. मात्र त्यांचे पैसे अद्याप खात्यावर जमा झाले नसल्याच्या तक्रारींना पूर्णविराम लागण्या आधीच या खरेदी केलेल्या भाताची दुर्दशा झालेली पाहायला मिळत आहे.
सदर भात बाजार समितीच्या मैदानात उघड्यावर ठेवण्यात आला आहे. तर जागा अपुरी पडत असल्याने संघाने मुरबाड एमआयडीसी मधील बंद कारखान्यांमध्ये तसेच कारखान्यांच्या बाहेर या भाताचा साठा केला आहे. राज्यभर सुरू असलेल्या पावसाच्या रौद्र अवताराची पूर्व सूचना ज्ञात असतांना ही संघाचे पदाधिकारी मात्र काही घेणं देणं नसल्या सारखे वागत असल्याचे भासत आहेत.
दोन दिवस झालेल्या या पावसात सदर उघड्यावरील भात मोठ्याप्रमाणात भिजला असून शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला भात डोळ्यांसमोर नासाडी होतांना पाहायचे दुर्दैव मुरबाडकरांच्या वाट्याला आले आहे. संघाने यावर औपचारिकता म्हणून सदर भातावर ताडपत्री टाकली असली तरी पावसाच्या तडाख्याने त्यांचे पितळ उघडे पाडले आहे. आधीच निसर्गाने वाढलेल्या संकटांशी दोन हात करून कसाबसा शेतकरी भात पिकवतो. त्यातही दरवर्षी होणाऱ्या मोठ्या नुकसानी सामोरे जावे लागते. यातून पिकविलेला भात जनतेच्या मुखात जावा म्हणून विश्वासाने भात खरेदी संघाच्या हवाली करतो. मात्र तेथेही या भाताची कदर केली जात नसल्याने योग्य संरक्षणा अभावी जनसामान्यांचा घास मातीमोल झाला आहे. तर भात खरेदी संघाच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या या नुकसानीवर काय कारवाई होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-किशोर गायकवाड
____________________________________________




0 Comments