माळशेजची उपासमार..! - Kishor K. Gaikwad - Shabdmashal

माळशेजची उपासमार..! - ShabdMashal


Fruite Sellers in Malshej Ghat Area




 KISHOR K. GAIKWAD

  मुरबाड (Murbad) वरून माळशेज घाट मार्गे निघाल्यास वैशाखरे गावची हद्दएकदा का सोडली की, माळशेज घाट पायथ्याशी असलेल्या फांगणे, भोरांडे, जांभूळ वाडी, आवळ्याची वाडी, सिसेवाडी येथे महामार्गाच्या कडेला आदिवासी बांधवांची लहान मुले, महिला, वृद्ध हातात विविध प्रकारची रानफळे विक्रीसाठी घेऊन उभी असलेली हमखास नजरेस पडतात. अनेक प्रवासी आपली वाहने याठिकाणी थांबवून ही रानफळे विकत घेत असतात. काही कुतूहल म्हणून; काही आवड म्हणून; तर काही या आदिवासी बांधवांना दोन पैसाची मदत व्हावी या हेतूने ही रानफळे विकत घेत असतात. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर येऊन फळे विक्री करण्याची ही परिस्थिती या आदिवासी बांधवांवर अनेक दशकांपासून का ओढवली? हा यक्षप्रश्न आजही खितपत पडला असून याबाबत कोणताही पुढारी, लोकप्रतिनिधी चिंतन करायला पुढे सरसावत नाही.

  सुमारे १८ हजार हुन अधिक लोकसंख्या असलेल्या माळशेज घाटाच्या मोरोशी परिसरातील सुमारे २५ गावांसह ३७ पाड्यांमध्ये या आदिवासी बांधवांची लोकवस्ती आहे. रानमाळावरची पानं-फुले-फळे विकुन आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी या आदिवासी बांधवांना जीवाची पर्वा न करता सतत घनदाट जंगलात जावे लागते. यातच अनेकदा वन्य प्राणी-सर्प यांच्याशी संघर्ष होऊन जीवावर बेतण्याच्या घटना ही घडत असल्याच्या वार्ता कानावर येत असतात. त्यामुळे शासनाने या परिसरातील लोकांच्या अर्थिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून जास्तीत जास्त सुविधा या आदिवासी बांधवांना उपलब्ध कशा करता येतील, याचा प्रयत्न शासनाने केला पाहिजे. 

  मुरबाड शहर व टोकावडे पासून कोसो दूर असलेल्या या परिसरातील आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी मिळणे अवघड झाले आहे. परिणामी उपजीविकेसाठी त्यांना वनसंपदे शिवाय गत्यंतर उरत नाही. तसेच आरोग्याच्या सुविधा ही अर्धवट व दूरस्थ अंतरावर असल्याने येथील नागरिकांना बहुतांशी वनस्पतींवरच अवलंबून राहावे लागत आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येथील आदिवासी बांधवांना अनेक प्रकाराच्या अर्थिक अडचणी येत असतात. पिढ्यानपिढ्या रोजगारा पासून वंचित राहिलेल्या या बांधवांना हल्ली आरोग्याच्या समस्येशी ही झुंज द्यावी लागत असल्याचे चित्र प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात आजही मुंबईपासून जवळ असणाऱ्या माळशेज पायथ्यापाशी पाहायला मिळत आहे. या आदिवासी बांधवांच्या वाट्याला आलेल्या पारंपरिक दुःखातून त्यांची सुटका होण्यासाठी सरकार आता तरी लक्ष देईल का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.


 
-किशोर गायकवाड
____________________________________________


(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


0 Comments