सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची मागणी “मुरबाड तालुक्यामध्ये तात्काळ जम्बो कोवीड सेंटर व विलगीकरण कक्ष सुरू करा.”
बुधवार, दि.२८ एप्रिल २०२१ रोजी मुरबाडचे तहसिलदार व नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना निवेदनाव्दारे सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी मुरबाड तालुक्यामध्ये तात्काळ जम्बो कोवीड सेंटर व प्रत्येक विभागानुसार विलगीकरण कक्ष सुरू करा
अशी मागणी केली. यावेळी रि.पा.ई. (सेक्युलर) चे जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदने, काँग्रेसचेच तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार, शिवसेना शहरप्रमुख राम दुधाळे, मनसेचे तालुकाध्यक्ष कैलास चौधरी, राष्ट्रवादीचे शहरअध्यक्ष दिपक वाघचौडे, मुस्लिम एकता मंचचे अब्बास शेख आदींच्यां उपस्थितीत सदरचे निवेदन देण्यात आले . सद्यस्थितीला मुरबाड तालुक्यामध्ये रोज covid-19 च्या रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे, आजमितीस एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आठशेच्या पुढे गेली असून एकूण रुग्ण संख्या २१०० च्या वर गेली आहे. मागील वर्षापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांची जमापुंजी संपून गेली आहे अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक कुटुंबात रुग्ण सापडत आहे तरीही तालुक्यात रुग्ण संख्येचे प्रमाण कमी होईपर्यंत शासकीय कोविड केअर सेंटर व विलगीकरण कक्ष तयार करणे गरजेचे आहे तसेच जेणेकरून प्रत्येक विभागात विलगीकरण कक्ष तयार करून त्याची व्यवस्था तिथेच करणे गरजेचे आहे तसेच मुरबाड ग्रामीण रुग्णालय येथे पूर्ण क्षमतेने म्हणजे ७५ बेड हे ऑक्सीजन बेड करून दुसऱ्या स्टेजचे रूग्ण मुरबाडला हलविता येतील असे मत रवींद्र चंदने यांनी व्यक्त केले. एक-दोन दिवसामध्ये तातडीची लोकनियुक्ती प्रतिनिधी खासदार, आमदार, जिल्हापरिषद उपाध्यक्ष, सर्व पक्षीय तालुकाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, शहराध्यक्ष आदींची आपल्या दालनामध्ये बैठक लावावी तसेच लॅाकडाऊन अजुनही तीव्र स्वरुपाचा करावा अशी सुचना चेतनसिंह पवार यांनी केली.
तालुक्यात ऑक्सिजन निर्मिती करणारी कंपनी आहेत तरीही आपल्या शासकीय रुग्णालयातून (ग्रामीण रुग्णालय ,मुरबाड) व कुणबी समाज हॉल येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय जम्बो कोविड सेंटर साठी १.५- २.० टन ऑक्सिजन मोफत दयावा अन्यथा सर्व मिळुन आंदोलन करु अशी भुमिका राम दुधाळे यांनी मांडली. डॉक्टर, स्टाफ, नर्स, वार्ड बॅाय व इतर सेवा देणारे कर्मचारी यांच्या मानधनाची जबाबदारी M.I.D.C. मधील CSR फंड यावर्षीचा तालुका सहाय्यता विधीत वर्ग करुन घ्यावा असे प्रतिपादन कैलास चौधरी यांनी केले. तालुक्यामध्ये कुणबी समाज हॉल (जम्बो कोविड केअर सेंटर), N.T.T.F विद्यालय देवपे (विलगीकरण कक्ष), जनसेवा शिक्षण मंडळ शिवळे हायस्कूल(विलगीकरण कक्ष ), शासकीय आश्रम शाळा, मोरोशी (विलगीकरण कक्ष), शासकीय आश्रम शाळा मढ- धसई (विलगीकरण कक्ष), म्हसोबा देवस्थान ट्रस्ट, म्हसा (विलगीकरण कक्ष), प्राथमिक आरोग्य केंद्र, सरळगाव (विलगीकरण कक्ष व ऑक्सीजन बेड) व ग्रामीण रुग्णालय, मुरबाड (ऑक्सीजन तसेच व्हेंटिलेटर बेड) असे सुसज्ज नियोजन केल्यास रुग्ण संख्या कमी होण्यासाठी व योग्य उपचार या माध्यमातुन करता येतील तसेच तालुक्यातील नागरिकांना एक हेल्पलाईन नंबर सुरू करावी असे मत दिपक वाघचौडे यांनी मांडले. तालुक्यामध्ये घरी असलेल्या वार्डबॉय, नर्स व इतर काम करणाऱ्यांना आव्हान करून मानधनावर कोरोना योद्धा म्हणून आपली सेवा जवळील विलगिकरन कक्ष अथवा कोविड केअर सेंटरवर घेण्यासाठी निमंत्रण दयावे तसेच तालुक्यांतील दानशूर व्यक्तीनां आवाहन करून जेवणाची,पाणी इतर आवश्यक व्यवस्था करण्यास विनंती करण्यात यावी असे मत अब्बास शेख यांनी व्यक्त केले.
लवकरच मागणी केल्यानुसार लोकप्रतिनिधीं बैठक लावण्यात येईल, ग्रामीण रुग्णालय येथील सेंटर पुर्ण क्षमतेने स्टाफ सहित सुरू करु, संपुर्ण तालुक्यात लॅाकडाऊन अजुन तीव्र करु व विलगीकरण कक्ष विभागनुसार सुरू करण्यावर भर राहील आदीं निवेदनानुसार कार्यवाही करु असे आश्वासन तहसिलदार अमोल कदम व मुख्याध्याकारी परितोष कंकाळ यांनी दिले.








0 Comments