मुरबाडमधील एसबीआय एटीएम फोडीचा पत्रकार परिषदेतून खुलासा
[KISHOR K. GAIKWAD]
मुरबाड (दि. २९) : एसबीआय बँकेच्या एटीएममधून सुमारे ४५ लाख रुपये चोरी झाल्याची घटना गुरुवारी (२५ मार्च रोजी) मुरबाडमध्ये उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत सदर आरोपींना जेरबंद केले होते. या घटनेची अधिकृत माहिती देण्यासाठी आज मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
गुरुवारी सकाळी मुरबाड शहरातील सोनारपाडा येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये ग्राहक आपले पैसे काढण्यासाठी गेले असता पैसे निघत नसल्याने त्यांनी शाखेशी संपर्क साधला. याबाबत बँक अधिकारी, कर्मचारी यांनी अधिक पाहणी केली असता सदरचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १०६/२०२१ भारतीय दंड विधान संहिता कलम ३८०, ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात येऊन तात्काळ तपासात सुरुवात करण्यात आली होती. मुरबाड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या २४ तासांच्या आत आरोपींना जेरबंद केल्याचे ठाणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. तर चोरी करण्यात आलेल्या रक्कमेतून एका आरोपीने २ लाखाचे टीडीसी बँकेचे कर्ज फेडले तर दुसऱ्या आरोपीने १ लाख १० हजार रुपये मोटर सायकल व बोलेरो गाडी दुरुस्ती यासाठी खर्च केले असून उर्वरित रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. तसेच कल्याण येथील एका मोठ्या गुन्ह्याच्या तपासाला ही यश आल्याचे यावेळी अधिक्षक देशमाने यांनी सांगितले.
मुरबाड तालुक्यातील कळंभाड येथील नरेश भाऊ मोरे, तुळई येथील नितीन चौधरी, रमेश चौधरी, सुरेश चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे असून यातील एक आरोपी हा अन्य बँक एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम करीत असल्याने सदर एटीएम मशीनला कसल्याही प्रकारे नुकसान न करता अगदी शिताफीने ही रॉबरी घडल्याचे यावेळी सांगितले. मात्र यापूर्वी या चोरट्यांनी काही गुन्हे केलेत का? किंवा यात आणखीन कोणी सामिल आहे का? याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे देशमाने यांनी पत्रकारांना सांगितले आहे. तर एवढ्या जलद गुन्ह्याचा तपास लावून एवढी मोठी रिकव्हरी केल्या बद्दल मुरबाड पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
-किशोर गायकवाड
____________________________________________









0 Comments