आलम साहेब तुम्ही कायम आमच्या स्मरणात राहाल..! - [ Kishor K. Gaikwad ]


आलम साहेब तुम्ही कायम आमच्या स्मरणात राहाल..!


       आसवांनी भरलेले आभाळ,

       आज धाय मोकळून रडत होते;

       विश्वास बसेना नियतीवर,

       आज विपरीत काही घडत होते!


  दिनांक १४ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे सकाळी मोबाईल हातात घेऊन व्हाट्सएप मॅसेंजरवर नजर मारायला घेतली. कोण्या एका ग्रुपवर फोटो सहित एक श्रद्धांजलीचा मॅसेज येऊन धडकला होता. लगबगीने फोटो डाउनलोड केला अन् पायाखालची जमीनच जणू सरकली. तो फोटो होता मुरबाडच्या ऍड. रत्नाकर आलम यांचा... 


  हळू हळूहळू ही वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण तालुक्यात पसरली. विविध संघटनेचे, राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार सह गावकरी ऍड. आलम यांच्या 'शिरवली' येथील घरा समोर गर्दी करू लागले.

  

  आलम साहेब आता आमच्यात नाही राहिले, यावर विश्वास ठेवणे अवघड जात होते. एखाद्या युवकाला ही लाजवेल असा सहा सव्वासहा फुटाचा तरुण तडफदार, गोरापान, बाणेदार, धिप्पाड शरीरयष्टी असलेला ४१ वर्षीय रांगडा गडी, अचानक कोण्या हृदय विकाराने आमच्यापासून हिसकावून घेतला होता... 

  

  अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मुरबाड तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील या तरुणाने उच्च शिक्षण घेत वकिलीची पदवी मिळवली आणि दिनांक ४ डिसेंबर २०१८ रोजी मुरबाडच्या दिवाणी फौजदारी न्यायालयात वकील म्हणून पहिले पाऊल ठेवले. अल्पावधीतच त्यांनी तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली. पुढे मुरबाड तहसिल शेजारी एक प्रशस्त कार्यालय ही सुरू केले. कोर्ट - वकील म्हंटले की पैसा? हा प्रश्न गोरगरीब जनतेला नेहमीच अस्वस्थ करतो. अशा गोरगरीबांना मोफत कायदेशीर मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी सामाजिक जबाबदारीने केले. 

  


  आलम यांना आयुर्वेदाची चांगलीच माहिती होती. त्यामुळे जिल्ह्यातील, तालुक्यातील गावोगावी जाऊन नागरिकांना मोफत मार्गदर्शन करण्याचे सामाजिक काम ते नित्याने करत असत.


  समतेवर आधारित विचारधारेचा त्यांनी नेहमीच पुरस्कार केला. तालुक्यातील गोरगरीब, आदिवासी, उपेक्षित, वंचित बांधव हे आलम साहेबांना कायम आपलेसे वाटत. त्यांच्यात राहून त्यांना नेहमीच मदतीचा हात ते देत. त्यामुळे या दिनदुबल्या वर्गात कायम त्यांचा आदर राहिला. 


  वकिली आणि पत्रकारिता सख्खी मावस भांवंडे; त्यामुळे काही प्रकरणे आलम साहेबांसोबत हाताळण्याचा योग येई. तेव्हा यावेळी त्यांच्यासोबतचा येणारा अनुभव हा कायदेशीर ज्ञानात भर टाकणारा ठरत. कधी चहाची हुक्की आली की, आम्ही हक्काने आलम साहेबांच्या ऑफिसला हजेरी लावणार. काही बोलण्याआधीच चहाची सोय होत असे. शिवाय आपली महत्त्वाची कामे बाजूला सारून आलम साहेब आम्हाला त्यांचा वेळ देत. यावेळी होणाऱ्या गप्पागोष्टी आपुलकीच्या असत.



  

  शिवराय - फुले - शाहू - आंबेडकर यांच्या प्रबोधनकारी विचारांचे ते खंदे पाईक होते. आपल्या चिमुकल्या लेकींच्या वाढदिवशी त्यांना आवर्जून माँसाहेब जिजाऊंच्या दर्शनाला नेत. आपल्या मुलींमध्ये माँसाहेब जिजाऊ, सावित्रीमाई, माता रमाई यांच्या विचारांचे संस्कार कायम रुजविण्याचा प्रयत्न ते करीत राहिले.


  सामाजिक कार्य असेल अथवा समाज हितार्थ आंदोलन, आलम साहेबांची उपस्थित आवर्जून दिसणार. अनेक सामाजिक आंदोलनात त्यांनी हिरहिरीने सहभाग घेतला. सामाजिक भान बाळगून जीवनाची जडणघडण केली.  आपला मायाळू आणि मृदू स्वभाव त्यांची दुसरी ओळख होती. आपल्या चारचाकीतून जातांना रस्त्यावरील सान-थोरांना आदराने आवाज देऊन विचारपूस करीत. 

  


  असा एक जिद्दी, होतकरु, नातेजोपासू, प्रसंगी मदतीला धावणारा, प्रामाणिक, प्रेमळ स्वभावाचा, कष्टकरी व्यक्तिमत्त्व, ज्याच्या नावातच रत्न आहे तो रत्नाकर हरपला; अनेक न विसरणाऱ्या आठवणी ठेऊन... त्यांच्या अंत्यविधीला असलेली मित्रमंडळी, नातलगांनी उपस्थिती त्यांच्या आयुष्यभराच्या खऱ्या कमाईची साक्ष देत होती.

   

  रोज सकाळी व्हाट्सएप उघडला की दैनंदिन आठवण म्हणून नित्यनियमाने आलम साहेबांचा एक मॅसेज कायम त्यांच्या गुणिजनांच्या व्हाट्सएपला असायचा. मात्र आज सकाळी तो मॅसेज नव्हता...

  

  आलम साहेब तुम्ही कायम आमच्या आठवणीत जिवंत राहाल... अशा जिवलग मित्राला भावपूर्ण आदरांजली

  

                 आयुष्यभर करत राहिला,

                 तो जिवा भावाच्या साठवणी;

                 अखेर उडाला फुलपाखरू,

                 अन् उरल्या फक्त आठवणी!

                 अन् उरल्या फक्त आठवणी!


         💐💐💐💐💐💐💐💐💐💐

                 - शब्द मशाल परिवार

______________________________________________

[ प्रवेशद्वाराच्या नावाने मुरबाड नगरपंचायतीची पंचाईत - बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा ]

आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]


Creative Science Hub - Murbad
Creative Science Hub - Murbad

Zoom online lectures are started. Dont  miss the chance to enroll yourself.

To Enroll Contact on Below Number
8308922200 / 9404139039 / 8779945407


(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments